'संजू'मधला संजय दत्त किती खरा किती खोटा?

    • Author, मिहीर पंड्या
    • Role, चित्रपट समीक्षक

सुकेतू मेहता यांच्या 'मॅक्सिमम सिटी'मध्ये एक गंमतीशीर किस्सा आहे. 'मिशन काश्मीर'च्या शूटींगच्या वेळी घडलेला.

"चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये भल्या सकाळीच एक फोन येतो - 'अबू सालेमनं तुमची आठवण काढली आहे.' संध्याकाळपर्यंत कुणीही या निरोपाला उत्तर म्हणून फोन न केल्यानं पुन्हा तिकडून फोन येतो आणि धमकावण्यात येतं. 'उसका भेजा उड़ा दिया जाएगा,' असा निरोप यावेळी मिळतो. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत तो सगळा काळ फारच भयानक होता."

"त्यांचा मित्र मनमोहन शेट्टी यांच्यावर नुकताच अंडरवर्ल्डकडून हल्ला झाला होता. राकेश रोशन यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या होऊन जास्त काळ लोटलेला नव्हता. घाबरलेल्या विधू विनोद चोप्रांनी सगळ्या मित्रमंडळींना फोन केला. त्यांच्यापैकीच एकाच्या मार्फतीनं ते तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत पोहोचतात. अडवाणी त्यांच्या हरतऱ्हेच्या सुरक्षेचं आश्वासन देतात."

दुसऱ्याच दिवशी सुकेतू मेहता यांना चोप्रा एकदम टेन्शन फ्री दिसले. त्यांना एक फोन आला होता आणि समोरच्या माणसानं 'तुम्ही तर मला भावासारखे' असं म्हटलं होतं.

विनोद चोप्रा म्हणाले, "हा चमत्कार गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे झालेला नाही. त्यांच्या चित्रपटाचा हिरो संजय दत्तमुळे तो चमत्कार झालाय."

संजय दत्त आणि अबू सालेम हे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सहआरोपी होते. संजय दत्तच्या गॅरेजमध्ये हत्यारं भरलेल्या गाड्या आणून सोडणारी व्यक्ती अबू सालेमच होती. त्यामुळेच जेव्हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी नंबर 87ने आरोपी नंबर 117ला फोन लावून सांगितलं की "मी तुझ्यासाठी दोन वर्षं जेलमध्ये काढली आहेत. विनोद माझ्या भावासारखा आहे. तुरुंगात असताना तो माझ्यापाठीशी उभा राहिलाय," तेव्हा ही धमकी मागे घेण्यात आली.

विधू विनोद चोप्राचं आभार प्रदर्शन

राजकुमार हिराणी यांच्या 'संजू' या चित्रपटात संजय दत्तची जी प्रतिमा साकारण्यात आली आहे, त्यात हा किस्सा फिट बसत नाही.

रणबीर कपूरनं साकारलेला संजय दत्त तर 'बाबा' आहे. तो स्वत:च अनेक संकटांत घेरला गेला आहे. चित्रपटात ही संकंट कधी त्यांचे स्वार्थी मित्र तयार करतात, कधी अनाहूत फोन तर कधी देशातले पत्रकार.

संजय या कथेत शिकार आहे. प्रत्यक्षात, संजय दत्तचा जुना मित्र विधू विनोद चोप्रा हाच या सिनेमाचा निर्माता आहे. त्यामुळे या सिनेमाकडे चोप्रांचं दत्तसाठी आभार प्रदर्शन म्हणूनच पाहायला हवं.

हा सिनेमा संजय दत्तची बाजू मांडणाराच असणार हे तर उघडच. पण आजच्या जमान्यातील यशस्वी आणि लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी स्वीकारलेलं तडजोडवादी धोरण दु:खद आहे.

कोट्यवधी रुपये, अॅडव्हान्स तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता हे सारं खर्च करून बनवलेला 'संजू' हा सिनेमा अभिनेता संजय दत्तच्या PR सिनेमापेक्षा पुढे जात नाही. म्हणजे सिनेमात सगळं लपवलं किंवा खोटी गोष्ट सांगितली आहे, असं नाही.

'संजू'च्या पूर्वार्धात ड्रग्जच्या आहारी गेलेल्या संजय दत्तचं आयुष्य बऱ्यापैकी जसंच्या तसं दाखवलं आहे. अमेरिकेहून फ्लाईटने येताना बुटांमध्ये ड्रग्ज लपवून आणणं किंवा मरणाच्या दारात असलेल्या आईच्या खोलीत ड्रग्ज घेणं, हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

पण कोणत्या गोष्टी कोणत्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या आहेत, याचाच हा सगळा खेळ आहे.

हिराणी स्टाईल

उदाहरण म्हणून पाहायचं तर, प्रोमोमध्ये वापरण्यात आलेलं संजयचं कन्फेशन की तो 350 मुलींबरोबर झोपलाय, हे सिनेमात कसं येतं बघा.

संजयचा स्वार्थी मित्र त्याचं चरित्र लिहिण्यास आलेल्या अनुष्का शर्माचे कान भरतो आणि तेव्हाच ही शेकडो मुलींसोबत झोपल्याची गोष्ट तिला सांगतो. शिवाय तो असा दावाही करतो की संजयला याबद्दल विचारल्यावर तो खोटंच सांगेल.

लेखिका हा विषय संजयशी बोलताना काढते, तर तो मान्य करतो आणि तेही पत्नीचा उपस्थितीत. म्हणजेच प्रत्यक्षात संजयच्या प्रतिमेला धक्का देणारी गोष्टच त्याच्या खरेपणाची साक्ष ठरते.

अख्ख्या सिनेमात महिलांची खिल्ली उडवण्यात आली आहे आणि हे काही संजयची त्यांच्याप्रति वागणूक दाखवण्यासाठी नाही तर त्यांचा फक्त सवंग मनोरंजनासाठी चित्रपटात वापर करून घेण्यात आला आहे.

हिराणी यांच्या '3 इडियट्स'मधली 'चमत्कार-बलात्कार' सारखी दृश्यं तुम्हाला आठवत असेलच.

तसाच प्रकार संजय दत्तच्या अंडरवर्ल्ड डॉनबरोबरच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगबद्दलही केला आहे. एका अशातशा संपादकाच्या माध्यमातून ही गोष्ट ऐकवली जाते. त्यामुळे त्याचा सगळा प्रभाव ओसरतो.

प्रत्यक्षात, 2000 सालापर्यंतचा संभाषणाची नोंद झालेली आहे. बहुतेक दारू पिऊन छोटा शकीलशी थट्टामस्करीत बोलणारा संजय दत्तच होता. तेही टाडा कायद्यात अटक होऊन सात वर्षं झाल्यावरही.

संजय दत्तची सिनेमा कारकीर्द

असं सांगतात की, दाऊद इब्राहिमबरोबर संजयची ओळख झाली ती 1991मध्ये. फिरोज खान यांच्या 'एल्गार'चं शूटिंग करत असताना ही ओळख झाली. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याच्याशीही त्याची भेट व्हायची.

यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या आणि जगरनॉट प्रकाशनानं काढलेल्या संजय दत्तच्या चरित्रात संजय दत्तनं दिलेल्या कबुलीचा उल्लेख आहे. तो कबुलीनामा नंतर संजय दत्तनं मागे घेतला होता. नुकतंच या चरित्राच्या प्रकाशकाला संजय दत्तकडून कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली.

या सगळ्या गोष्टी 1992मध्ये बाबरी मशीद पडण्याआधीच्या आहेत. पण त्याचा सिनेमात उल्लेख नाही.

2013 मध्ये तहलकाच्या पत्रकार निशिता झा यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, लेखक सुकेतू मेहता यांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. कारण काय सांगितलं तर, संजय दत्तबद्दल त्यांनी लिहिलेल्या प्रकरणावरून त्यांचे एक जवळचे मित्र नाराज आहेत.

मेहता यांना नातेसंबंधांमध्ये आणखी ताण नको आहे. हाच तर सिनेमाचाही धागा आहे. संबंध बिघडू द्यायचे नाहीत, हेच 'संजू'मध्येही साध्य होतं.

एका अभिनेत्याविषयीचा सिनेमा असूनही त्यात 'रॉकी' आणि 'मुन्नाभाई MBBS' या दोन सिनेमांचाच उल्लेख आहे. खलनायकचं पोस्टर सर्वत्र दिसलं तर काही ठिकाणी मिशन काश्मीरमधला पोशाख दिसला.

संजय दत्तनं 180 सिनेमांत काम केलं आहे. पण त्यापैकी महेश भट यांच्या 'नाम' किंवा 'सडक'चा उल्लेख नाही.

अॅक्शन हिरो म्हणून असलेली ओळख बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'साजन'चाही त्यात उल्लेख नाही. शिवाय, 'फिल्मफेअर' मिळवून देणाऱ्य 'वास्तव'चाही उल्लेख नाही.

याचं कारण काय असावं? या सगळ्या हिट सिनेमांत त्याची 'बॅड बॉय' हीच प्रतिमा कॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. मग 'संजू' मध्ये यांचा उल्लेख करणं म्हणजे सिनेमाच्या उद्देशालाच हरताळ फासण्यासारखं झालं असतं.

मुस्लीम ओळख

संजय दत्तची गोष्ट म्हणजे तुकड्यांत विभागलेलं शहर आणि कायापालट होत असलेल्या भारताची गोष्ट आहे.

संजय दत्तला ज्या Arms Act मध्ये शिक्षा झाली, त्याचं निकालपत्र बारकाईनं वाचलं तर त्याच्या वकिलांनी केलेला बचाव लक्षात येतो - 'बाबरीच्या पतनानंतर मुंबईत अल्पसंख्यांच्या मनात निर्माण झालेल्या भयाचा दाखला देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यानं बंदूक बाळगली. त्याचा बॉम्बस्फोटांशी संबंध जोडला जाऊ नये.'

एवढंच नव्हे तर, तो स्वत:च दहशतवादाचा बळी आहे. अशात त्याच्यावर टाडा अंतर्गत कारवाई करणं हा कायद्याच्या गाभ्याशीच खेळ ठरेल. हिंसाचार करणारे आणि त्याला बळी पडलेले, यांना एकाच तराजूत ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

पण, संजू या सिनेमात कुठेही संजय दत्तचाही मुस्लिम चेहरा आणलेला नाही. त्याच्या शरीरात मुस्लिम आईचं रक्त वाहतंय, एवढाच संदर्भ एका ठिकाणी गुंडाच्या धमकीत येतो.

हे कमी होतं म्हणून की काय, या सगळ्या सिनेमातून सत्तारूढ नेत्यांना अतिशय चलाखीने कथानकात धुसर करण्यात आलं आहे. बाबरी मशीद पाडल्याचा उल्लेख आहे, पण ती पाडणाऱ्यांचा नाही.

1993 मध्ये मुंबईतल्या दंगलीत मुसलमानांच्या झालेल्या नुकसानीचा उल्लेख आहे, पण त्याला जबाबदार असलेल्यांचा नाही.

हिराणी यांच्याच आधीच्या सिनेमात असलेल्या जहीर, मकसूद, फरहान आणि सरफराज यासारख्या मुस्लिम व्यक्तिरेखांचाही या सिनेमात उल्लेखच नाही.

आणि ज्या 'हिंदूहृदयसम्राटां'च्या घरात जाऊन संजय दत्त यांनी स्वत:च्या मुक्तीचा मार्ग शोधला होता, त्यांना तर हा सिनेमा स्पर्शही करत नाही.

उपलब्ध गोष्टींचं सादरीकरण करण्यासाठी लेखक अभिजात जोशी आणि संकलक हिराणी यांनी केलेली कमाल पाहण्यासारखी आहे.

वाईट याचं वाटतं की कलाकार मित्रांनी संजय दत्तच्या PRगिरीसाठी त्यांची कला वापरली.

राजू यांच्या 'त्या' हिरोचा शेवट

राजकुमार हिराणी यांचे आधीचे सिनेमे प्रेषकांना नैतिकतेचे धडे देतात. चांगला माणूस बनण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी काय करायला हवं, हे त्यांचे सिनेमा सांगतात. म्हणून लोकही ते स्वीकारतात आणि तिकीटबारीवर त्यांना डोक्यावर घेतात.

पण 'संजू' या सिनेमाचा फॉर्मच वेगळा आहे.

'मुन्नाभाई MBBS'पासून 'PK' पर्यंत चारही सिनेमांत राजू हिराणी यांनी व्यवस्थेतल्या चुका दाखवल्या आहेत. चांगुलपणाचा दाखला देण्यासाठी मुख्य व्यक्तिरेखेला व्यवस्थेच्या बाहेरचं दाखवलं आहे.

मुन्नाभाई डॉक्टर, कॉर्पोरेट मॅनेजर्स, नफेखोर व्यावसायिक, ज्योतिषी, बाबा, सिव्हील सोसायटी यांचं मतलबीपण समोर आणतो. तो सर्वहारांच्या नायकासारखा आहे.

'3 इडियट्स'मध्ये शिक्षण पद्धतीनं तरुणांना कसं ग्रासलं आहे आणि शिक्षण व्यवस्थेला न जुमानणारा फुंगसुक वांगडू त्यावर कशी मात करतो, हे दाखवलं आहे.

'PK'मध्ये तर त्यांनी या प्रवचनाचा कळसच गाठला. समाजातल्या अंधश्रद्धांवर, धार्मिक संस्थांच्या बाजारीकरणावर त्यात प्रहार करण्यात आला आहे.

या गोष्टी सांगताना राजू हिराणी नैतिकतेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यातली प्रत्येक प्रमुख व्यक्तिरेखा अपरिचित आहे. त्यामुळेच त्यानं केलेलं भाष्य प्रामाणिक वाटतं आणि पाहणाऱ्याचा मनात उतरतं.

संजूचाही वेगळा फॉर्म्यूला हाच आहे, पण संजय दत्तची व्यक्तिरेखा तशी नाही. त्याची गोष्ट याचीच साक्ष देते की, आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला समाज आणि त्याची इंडस्ट्री वेळोवेळी संधी देतो.

जेव्हा या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून संजू प्रेक्षकांना न्याय व्यवस्था आणि माध्यमातले दोष सांगू लागतो, तेव्हा आरोपीच स्वत:चा न्यायाधीश झाल्यासारखा वाटतो. आणि तिथेच 'संजू' त्याचा प्रामाणिक आवाज गमावतो. सोबतच दिग्दर्शक राजू हिराणीही.

या सिनेमात संजय दत्तच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी दुसऱ्याला दोष देण्यात आल्याचं दिसतं - ड्रग्जच्या आहारी गेला दोस्तांमुळे, मित्राच्या प्रेयसीबरोबर संबंध प्रस्थापित केले त्याती तिची चूक आहे, घरात बेकायदेशीरपणे AK-56 साठवली ती धमकीच्या फोनकॉल्समुळे,

अंडरवर्ल्डशी संबंध ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे झुगारत, उलट माध्यमांनी आपल्याला 'दहशतवादी' ठरवलं, असं स्पष्टपणे दाखवण्यात आलं आहे.

नवा खलनायक - माध्यमं

होय, या चित्रपटामुळे एक नवीन खलनायक सापडला आहे. आजच्या काळातील सर्वांत सोपं लक्ष्य, मीडिया!

क्लायमॅक्समध्ये अभिनेता संजय दत्त तुरुंगात रेडिओवर 'वर्तमानपत्रा'ची गोष्ट सांगत असतो. 'खपाच्या स्पर्धेत असल्यानं वर्तमानपत्र चटपटीत बातम्या देतात. त्याच पीत पत्रकारितेचा तो बळी आहे.'

'संजू'मधला हा प्रसंग 'लगे रहो मुन्नाभाई'ची आठवण करून देत प्रेक्षकांशी एक वेगळाच भावनिक खेळ खेळतो, प्रत्यक्षातल्या संजय दत्तला मुन्ना या काल्पनिक व्यक्तिरेखेत बसवण्याचा प्रयत्न करतो.

पण संजय दत्तनं केलेलं गुन्हे, हे गोष्टीत बदल केल्यानं बदलणारे नाहीत.

चित्रपटाच्या शेवटी, 'बाबा बोलता है अभी बस हो गया' हे गाणं येतं. त्यात मिडियावरच ठपका ठेवण्यासाठी रणबीर कपूरसह स्वत: संजय दत्त पडद्यावर येतो.

प्रसारमाध्यमांवरील त्याचा राग पाहिल्यावर असं वाटतं की या शेवटच्या गाण्याचे दिग्दर्शक हिराणी नाहीत, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आहेत.

सत्य हेच आहे की सिनेमा उद्योगातले PR स्वतःच प्रसारमाध्यमांकडे तशा बातम्या पुरवतात. बातमीला प्रचाराचं रूप देण्याचा ही विकार पेज-3 मधून आता वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आला आहे.

सिनेमा उद्योगातल्या नकारात्मक बातम्यांबद्दल प्रसारमाध्यमांना जबाबदार धरणं, हे म्हणजे आजकालच्या प्रभावी राजकीय पक्षांनी फेक न्यूज आणि ट्रोलिंगसाठी माध्यमांनाच जबाबदार धरण्यासारखं आहे.

हे खरंतर त्यांनीच पेटवलेलं आहे. सिनेमा हे माध्यम उद्योगाचा महत्त्वाचा भाग आहे. जर माध्यमं खोटं वास्तव दाखवतात हे खरं असेल तर संजू हे त्याचं नेमकं उदाहरण आहे.

(हे लेखकाचे वैयक्तिकमत आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)