सोशल - 'संजू' सिनेमातून संजय दत्तसारख्या 'गुन्हेगाराला महापुरुष करू नये'

लव्ह स्टोरी, क्राईम, कॉमेडी, ट्रॅजेडी... एका हिट चित्रपटासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी संजय दत्तच्या आयुष्यात घडल्या आहेत. त्यामुळे राजकुमार हिराणींनी संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट बनवला यात काहीच नवल नाही.

'संजू' या चित्रपटाने 3 दिवसात 100 कोटींची कमाई केली खरी पण, सोशल मीडियावर या चित्रपटावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

राजकुमार हिराणी यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर, मनिषा कोइराला, परेश रावल, दिया मिर्झा, सोनम कपूर, विकी कौशल, जिम सौरभ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'संजू' या चित्रपटातून संजय दत्तची भलामण केली आहे, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न आम्ही आमच्या वाचकांना विचारला. त्यावर आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

कौस्तुभ जंगम आपल्या प्रतिक्रियेत लिहितात, 'तो देशद्रोही आहे. 257 निष्पाप मुंबईकरांच्या मृत्यूला आणि कोट्यवधीच्या मालमत्तेच्या विनाशाला तो कारणीभूत आहे. अशा माणसावर चित्रपट काढणंच मुळात चूक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणं हे आपली बुद्धी गहाण पडली असल्याचं लक्षण आहे.'

'कोणत्याही व्यक्तीवर मसाला चित्रपट होऊ शकतो. किती मनोरंजन, ज्ञान घ्यायचं अणि किती पैसे, वेळ द्यायचा हे सर्वस्वी आपल्यावर आहे. अशा सिनेमासाठी U/A सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.' असं मत महेंद्र जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

उमेश केशवे यांनी, 'गुन्हेगाराला महापुरुष करू नये' असं म्हटलं आहे. "चित्रपटात एक बाजू दाखवली गेली. त्याच्या घरी सापडलेली हत्यारं, गुंड लोकांशी असणारा सलोखा आणि त्याच्यामुळे निष्पाप लोक मारले गेलेत. चित्रपट काढला म्हणजे केलेलं पाप कमी होत नाही," असं ते लिहितात.

संदीप जाधव यांनी देखील 'संजू' चित्रपट म्हणजे वाईट गोष्टींचा गौरव आहे, हे व्हायला नको, असं म्हटलंय. "जेव्हा नथुराम गोडसेबद्दल बोलताना लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटी त्याला ही बोलायचं अधिकार आहे म्हणून नाटकाला विरोध करणं चूक आहे", असं मत मांडलं आहे.

प्रेक्षकांनी हा चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून पाहावा, असा सल्ला उदयसिंह राजेभोसले यांनी दिला आहे.

'कोणी कोणत्या विषयावर चित्रपट काढायचा आणि कोणी बघायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. आता या चित्रपटातून काय चांगलं (ड्रगचं व्यसन कसं सोडलं किंवा माज कसा उतरला/उतरवला) घेण्यासारखं आहे ते महत्त्वाचं. आणि गुन्हेगारी संबंध आपल्याला कसे अपायकारक आहेत, हेही या चित्रपटातून लक्षात येतं', असं मत प्रसाद यांनी ट्वीट करून व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)