संजय दत्त : कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर 'मुन्नाभाई'ने काय म्हटलं?

अभिनेता संजय दत्त कॅन्सरमधून बरे झाले आहेत. स्वतः संजय दत्तने ट्विटरवरून ही माहिती दिली.

संजय दत्तने ट्वीट करून म्हटलं, "गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होते. पण, म्हणतात ना देव सर्वांत कठीण लढाई आपल्या सर्वांत कणखर योद्ध्यालाच देतो. आज माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने मला हे सांगताना आनंद होतोय की, मी हे युद्‌ध जिंकलं आहे."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "तुम्हा सर्वांचा विश्वास आणि पाठिंबा याशिवाय हे शक्यच नव्हतं. या कठीण काळात माझ्यासोबत असणारे आणि मला कायम बळ देणारं माझं कुटुंब, मित्रपरिवार आणि माझे चाहते, या सर्वांचा मी ऋणी आहे. तुम्ही दिलेलं प्रेम, माया आणि आशीर्वाद या सर्वांबद्दल तुमचे आभार."

संजय दत्त यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉ. शेवंती, त्यांचे सहकारी डॉक्टर्स आणि नर्सेस यांचेही आभार मानले.

काही आठवड्यांपूर्वी पत्नी मान्यता दत्त यांनी संजय दत्त यांना कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती

काही दिवसांपूर्वीच संजय दत्त यांचे हेअर स्टायलिस्ट आलिम हकीम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून संजय दत्त यांचा एक व्हीडिओ पोस्ट केला होता.

या पोस्टमध्ये आपण लवकरच कॅन्सरला हरवू, असं संजय दत्त यांनी म्हटलं होतं. आपली नवीन हेअर स्टाईलही त्यांनी दाखवली होती. संजय दत्त नोव्हेंबरपासून शूटिंगला सुरुवात करणार आहे.

61 वर्षांच्या संजय दत्त यांनी आजवर 150 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)