महाड : 'लग्नाच्या तयारीचं आईशी शेवटचं बोललो आणि....'

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी, महाडहून

''आठ दिवसांपूर्वी आईशी शेवटचं बोलणं झालं होतं. आई माझ्या लग्नाची तयारी करत होती. लग्नासाठी काय काय आणलंय हे तिनं मला सांगितलं. तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं.''

महाड मधील आदिस्ते गावच्या ज्या सरपंच महिलेचा खून करण्यात आला त्यांचा 25 वर्षाचा मुलगा सांगत होता. आईच्या मृत्यूमुळे तो हादरुन गेला आहे. कामानिमित्त तो मुंबईला असतो.

आदिस्ते महाडमधील एक दुर्गम गाव आहे. अवघ्या 20 ते 25 घरांची ही वाडी आहे. गावात रेंज नाही त्यामुळे अनेक दिवस मुलाचे आईशी बोलणे होत नव्हते.

बीबीसीची टीम जेव्हा गावात पोहचत होती, तेव्हा गावाच्या अलिकडेच काही अंतरावर लाकडाचे फाटे पडलेले होते. एक फाटा झाडाला टेकून ठेवण्यात आला होता तर दुसरा जमिनीवर होता. खाली असलेल्या फाट्यावर रक्ताचे डाग दिसत होते.

रस्त्याच्या कडेला काही अंतरावरच आरोपी महिलेला घेऊन गेला होता. तिथे त्याने अत्याचार करुन दगडाने वार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्या ठिकाणी सुद्धा रक्ताचे डाग दिसून आले.

पुढे आम्ही गावात गेलो तेव्हा सरपंच महिलेचा मुलगा घरासमोर बसला होता. गावात 20- 25 घरं असली तरी त्यातील 15 ते 16 घरातच लोक राहतात. या गावातील तरुण कामानिमित्त मुंबई आणि इतर ठिकाणी राहतात.

गावात बहुतांश नागरिक हे वयोवृद्ध आहेत. गावाच्या चहूबाजूंनी घनदाट झाडी आणि डोंगर आहेत. रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवरचं हे गाव आहे. आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा गाव सामसूम होतं.

सरपंच महिलेच्या मुलाशी संवाद साधला तेव्हा त्याने हकीकत सांगितली.

''मला घटनेबद्दल गाववाल्यांनी फोन करुन माहिती दिली. त्यांनी मला थेट सांगितलं नाही परंतु काहीतरी अघटित घडलंय याची मला शंका आली. प्रवासात मला घटनेची माहिती मिळाली. कोलाडला रुग्णालयात मला आईचा मृतदेह दाखवण्यात आला.

''माझ्या आईचे कोणाशीच कधी वाद नव्हते. माझी आई माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायची. माझ्या लग्नाची तयारी आई करत होती. तिने अनेक वस्तू आणल्या होत्या,'' सरपंच महिलेचा मुलगा सांगत होता.

सरपंच महिला शांत स्वभावाच्या होत्या, असं गावकरी सांगतात. गावात त्यांच्याशी कोणाचं भांडण नव्हतं. सगळ्याच लोकांशी त्या चांगलं बोलायच्या. सरपंच म्हणून त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांचं कोणाशी राजकीय वैर नव्हतं, असं देखील गावकरी सांगतात.

ज्या लोकांनी पहिल्यांदा सरपंच महिलेचा मृतदेह पाहिला त्यापैकी गणेश खिडबिडे हे एक. घटनेच्या दिवशी त्यांनी काय पाहिलं ते बीबीसी मराठीला सांगत होते. घटनेच्या काही वेळापूर्वी ते आणि त्यांची पत्नी त्या भागातून बकऱ्या घेऊन गेले होते.

गणेश म्हणाले, ''बकऱ्या चरुन आलो तेव्हा काही दिसले नाही. काही वेळाने आमच्या एका नातेवाईकाचे निधन झाल्याचं आम्हाला कळालं. त्यांच्या घरी जाण्यासाठी मी आणि पत्नी निघालो तेव्हा रस्त्यात आम्हाला लाकडाच्या भाऱ्या पडलेल्या दिसून आल्या. त्या भाऱ्या सरपंच बाईंच्याच असतील असा आम्हाला संशय आला. भाऱ्यांच्या जवळ गेलो तर भाऱ्यांवर आणि रस्त्यावर रक्त पडल्याचे दिसून आलं.

''आम्ही गावात परत आलो आणि सरपंच बाई गावात आहेत का याची चौकशी केली. त्या गावात नव्हत्या. गावातल्या एकाला सरपंच महिलेचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर दिसला. त्याने गावात माहिती दिली, त्यानंतर आम्ही सगळे घटनास्थळी गेलो.''

पोलिसांनी चोवीस तासात एका आरोपीला अटक केली. अमीर जाधव (वय 30) असं आरोपीचं नाव आहे. चौकशीत अमीरचा संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. त्यावेळी त्यानं गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

सरपंच महिलेच्या घरापासून काही अंतरावरच आरोपीचे घर आहे. अमीर मु्ंबईमध्ये एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मार्च 2020 मध्ये त्याचे लग्न झाले होते. लॉकडाऊननंतर तो गावात आला होता. लॉकडाऊनपासून तो घरीच होता. घरची गुरं सांभाळणं आणि इतर छोटी मोठी कामं तो करत होता. दोन महिन्यापूर्वी त्याची पत्नी कामासाठी मुंबईला गेली होती.

घटनेच्या वेळी अमीर गावात नव्हता असं त्याच्या भावाचं म्हणणं आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी तो आणि गावातले इतर काहीजण दुसऱ्या गावात गेले होते, असं तो सांगतो.

आरोपीचा भाऊ म्हणाला, ''घटना घडली तेव्हा तो गावात नव्हता. तो दुपारी 3 नंतर गावात आला. त्याला गावकऱ्यांकडूनच घटनेची माहिती मिळाली. त्याच्या पत्नीचे आणि त्याच्या कुरबुऱ्या होत होत्या. त्याचा स्वभाव रागीट जरी असला तरी तो खून करणार नाही.''

दरम्यान, पोलिसांनी अमीरला अटक करुन न्यायालयात हजर केल आहे. त्याला 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा देखील तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)