सुदीप : मी हिंदी चित्रपटांकडे तुच्छतेनं पाहतो किंवा मला इगो आहे असं नाही, पण...

फोटो स्रोत, Instagram/Sudeep
"सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, पॅन इंडिया फिल्म म्हणजे आम्ही केवळ एकाच भाषेला टार्गेट करतोय असं नाहीये. हिंदी भाषेतला चित्रपटही पॅन इंडिया असतो. मी त्या चित्रपटांकडे तुच्छतेनं पाहतो किंवा मला इगो प्रॉब्लेम आहे, असं अजिबात नाहीये."
कन्नडा अभिनेता किचा सुदीप यानं आपलं मत मांडलं.
सुदीप याचा 'विक्रांत रोणा' हा चित्रपट प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्ताने बीबीसीच्या भारतीय भाषांच्या टीव्ही एडिटर वंदना यांनी सुदीपशी संवाद साधला. त्यावेळी त्यानं पॅन इंडिया चित्रपट, दक्षिण भारतीय सिनेमाला मिळणारी सापत्न वागणूक, सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग याबद्दल आपली भूमिका मांडली.
'विक्रांत रोणा' या तुझ्या नवीन सिनेमात काय नवीन, युनिक आहे?
सुदीप- जर नवीन काही नसेल तर मी चित्रपट करायला तयार होणारच नाही. ही फिल्म करण्याचं मी अनेक वर्षांपूर्वीच ठरवलं होतं आणि ज्या वेळेत ती पूर्ण झालीये त्याचा मला आनंद होतोय. हा चित्रपट तेव्हा पूर्ण होऊन येतोय जेव्हा अनेक नवीन गोष्टी घडत आहेत. नवेपणाचं स्वागत होत आहे.
काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की, केजीएफ, पुष्पा, आरआरआर, बाहुबली यांसारख्या चित्रपटांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतही खळबळ उडवून दिली. तुम्ही या करिष्म्याकडे कसं पाहता?
सुदीप- तुम्ही RRR पाहिला आहे का? या सिनेमांची खासियतच ती आहे...तुम्ही ते पाहायला थिएटरलाच जाता. अनेकजण चित्रपट बनवतात, पण हे चित्रपट तुम्हाला घरातून बाहेर पडून थिएटरमध्ये यायला भागच पाडतात. माझ्या मते, हिंदी किंवा त्यांच्या भाषेतले मग ते भोजपुरी असो की पंजाबी चित्रपट सोडले तर उत्तर भारतातल्या लोकांनी अशाप्रकारचे चित्रपट थिएटरला पाहिलेच नव्हते.

फोटो स्रोत, Getty Images
आता हे चित्रपटही इथल्या प्रेक्षकांना थिएटरला पाहता येत आहेत आणि हे त्यांच्यासाठी नवीन आहे. कारण जेव्हा एखाद्या वेगळ्या भागातून एखादा चित्रपट येतो तेव्हा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. स्टोरी वेगळी असते, त्यातली संस्कृती वेगळी असते. त्याचाच हा परिणाम असावा.
तुमचा 'विक्रांत रोणा' हा चित्रपट हिंदीमध्ये सलमान खान, तेलुगूमध्ये चिरंजिवी, मल्याळममध्ये मोहनलाल रीलीज करत आहेत. यातून भाषा, प्रांत यांना ओलांडून जाणारा भाव दिसत आहे. पण काही दिवसांपूर्वीच हिंदी भाषेवरून तुझे अजय देवगणसोबत मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांना अशाप्रकारे प्रत्युत्तर का द्यावं वाटलं?
सुदीप- अजय देवगण यांनी मी केलेल्या एका भाषणावर प्रतिक्रिया देताना ते ट्वीट केलं होतं. त्यांनी 'सुदीप मेरे भाई' असं थेट मला उद्देशून म्हटलं होतं. जर मी त्यावर व्यक्त झालो नसतो, दुर्लक्ष केलं असतं तर त्यांचा अपमान केल्यासारखं झालं असतं आणि माझाही दृष्टिकोन समोर आला नसता. मी तसं का बोललो होतो हे पण कळलं नसतं.
सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, पॅन इंडिया फिल्म म्हणजे आम्ही केवळ एकाच भाषेला टार्गेट करतोय असं नाहीये. हिंदी भाषेतला चित्रपटही पॅन इंडिया असतो. मी त्या चित्रपटांकडे तुच्छतेनं पाहतो किंवा मला इगो प्रॉब्लेम आहे, असं अजिबात नाहीये.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पण मला वाटतंय अजय देवगण सरांपर्यंत मला जे म्हणायचं होतं, त्याच्या बरोबर उलटा अर्थ पोहोचला. त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि मी माझं मत मांडून त्यांना प्रत्युत्तर दिलं.
पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीला जास्त महत्त्व मिळतं का? मी चिरंजिवींचा एक इंटरव्ह्यू वाचला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, एखादा नॅशनल फिल्म फेस्टिव्हल वगैरे असेल तर तिथे हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स लागलेले असायचे, पण इतर भाषांमधले नसायचे. तेव्हा मी दुखावलो जायचो.
सुदीप- ही वागणूक तिसऱ्याच कोणाकडून तरी मिळत असते. हिंदी इंडस्ट्रीनं कधी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीला वाईट वागवलं नाही आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीनंही कधी हिंदीसोबत दुजाभाव केला नाही. कलाकार, लेखक, स्क्रीप्ट या इंडस्ट्रीतून त्या इंडस्ट्रीत येतात-जातात. आमच्या कथा तिकडे चालल्या आहेत, त्यांच्या स्टोरी आम्ही केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही इंडस्ट्रीमध्ये सगळं आलबेल आहे.
पण दोन्ही इंडस्ट्रीत भेदभाव तिसऱ्याकडून होतो. उदाहरणार्थ- एखादा पुरस्कार सोहळा असतो, तेव्हा हिंदीसाठी एक कॅटेगरी असते आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठी दुसरी कॅटेगरी असते. भेदभाव तिथून सुरू होतो.
तुम्ही जर राष्ट्रीय पुरस्कार पाहिलेत, तर ते सर्वांना समान पातळीवर पाहतात. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता हा कोणत्याही इंडस्ट्रीतला असू शकतो. सर्वोत्कृष्ट चित्रपटही कोणत्याही भाषेतला असू शकतो. हे खूप प्रामाणिक आहे.

फोटो स्रोत, Instagram/Sudeep
पण जेव्हा काही पुरस्कार सोहळ्यांमध्ये अशी वर्गवारी केली जाते, तुम्ही कोणाशी तरी तुलना करायला लागताच ना. मग चिरंजिवी सरांनी जे म्हटलं त्यात काय चुकीचं आहे? ते असे कलाकार आहेत, ज्यांच्याकडे आम्ही आदरानं पाहतो.
तसंच आम्ही हिंदीमधल्या कलाकारांकडेही आदराने पाहतो. मी सलमान सरांचा चाहता आहे. मी दबंग-3 मध्ये त्यांच्यासाठी व्हिलनची भूमिका केली. ते माझं त्यांच्यासाठीचं प्रेम होतं.
माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की, आम्हा कलाकारांच्या मनात काही भेदभाव, दुजाभाव नाहीये. पण कोणत्यातरी तिसऱ्यामुळे या अशा पद्धतीचे वाद निर्माण होतात.
तुमच्या आजूबाजूला जेव्हा काही सामाजिक-राजकीय मुद्दे उपस्थित होतात, तेव्हा कलाकारांनी त्यावर व्यक्त व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं का? कारण असे अनेक लोक असतात जे तुमच्याकडे अपेक्षेनं पाहात असतात, तुमच्या मतावर विश्वास ठेवतात.
सुदीप- व्यक्त होणं याचा अर्थ सोशल मीडियावर व्यक्त होणं असा नसतो. आजकाल असं झालंय ना, की तुम्ही सोशल मीडियावर बोलला नाहीत, ट्वीट केलं नाही तर तुम्ही काही करत नाही असं वाटतं. कदाचित मी थेट मंत्र्यांशी बोललो असेन किंवा संबंधित अधिकाऱ्याशी बोललो असेन. तुम्हाला हे माहीत आहे का?
अशीही परिस्थिती असू शकते की, काही मुद्द्यांबाबत मला कमी माहिती आहे. मला एखाद्या गोष्टीवर आवाज उठवायचा आहे, पण त्याबद्दल पुरेशी माहिती नाही, ज्ञान नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे जशी तुमची स्तुती करणारे लोक असतात, तशीच तुमच्यावर टीका करणारेही असतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला माहितीये, तुम्ही योग्य आहात तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून व्यक्त होत नाही, हे जोपर्यंत तुम्हाला माहीत असतं तोपर्यंत ठीक आहे.
पण आजकाल एखाद्या विषयावर न बोलल्यामुळे सेलिब्रिटींना ट्रोल केलं जातं. पण कशावरही बोलण्यापूर्वी त्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. कोण पहिल्यांदा ट्वीट करतंय याची काय स्पर्धा लागली आहे का?
असे कोण कलाकार आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही आदर्श म्हणून पाहता?
सुदीप- खूप कलाकार आहेत.
अमिताभ बच्चन आहेत. मी हिंदी शिकलोच किशोर कुमार आणि अमित सरांसाठी. ते दिग्गज आहेत.
किशोर कुमार यांच्या गाण्यांतून मी हिंदी शिकलो आहे. त्यांच्या आवाजातच असं काही आहे. मी अगदी लहानपणापासून त्यांची गाणी ऐकायला आणि समजून घ्यायला सुरूवात केली.
मी रजनीकांत, कमल हासन, मोहनलाल, चिरंजिवी यांनाही मानतो. त्यांच्याबद्दल काही बोलण्यासाठीही मी लहान आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








