RRR- एस. एस राजामौली: 'अॅडमॅन' ते बाहुबली, RRR सारख्या सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक

फोटो स्रोत, RRRMOVIE/FB
- Author, चित्तथूर हरीकृष्ण,
- Role, बीबीसी तेलुगू
चित्रपटसृष्टीमध्ये यश ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. एखादा चित्रपट धडाक्यात चालला, तर लोक डोक्यावर घेतात, आणि एखादा चित्रपट पडला तरी संबंधित कलाकारांकडे पाठ फिरवतात. पण एस. एस. राजामौली यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये दिग्दर्शित केलेले बाराच्या बारा चित्रपट मोठी कमाई करणारे ठरले. सध्या देशभरात गाजत असणाऱ्या 'आरआरआर' या चित्रपटाचं दिग्दर्शनही राजामौली यांनीच केलं आहे.
कोडुरी श्रीशाल श्री राजामौली असं पूर्ण नाव असणारे राजामौली सुरुवातीला चित्रपटसृष्टीत एडिटिंगचं काम करत असत, त्यानंतर ते जाहिरातींचं दिग्दर्शन करू लागले, मग मालिकांचं दिग्दर्शन करू लागले आणि त्यानंतर ते यशस्वी चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित होत गेले.
गेल्या 20 वर्षांमधील त्यांच्या कामामुळे तेलुगू चित्रपटसृष्टी आंतरराष्ट्रीय पटलावर गेली आहे. या सातत्यपूर्ण यशाच्या बळावरच त्यांनी भारतीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवला.
बांधीव कथानक आणि थक्क करून सोडणारं चित्रिकरण, हे राजामौली यांच्या यशाचं सूत्र आहे. चित्रपटांमध्ये तारेतारकांचं प्रदर्शन असता कामा नये तर पात्रांचं दर्शन त्यातून घडायला हवं, असं राजामौली यांचं ठाम मत आहे.
राजामौली यांच्या प्रत्येक चित्रपटाची कथा पूर्णतः भिन्न असते, किंबहुना त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा चेहरामोहराच पूर्णतः भिन्न असतो, त्यामुळेच बहुधा त्यांना प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यश मिळालं आहे.
स्टुडंट नंबर-1, सिम्हाद्री, साये, छत्रपती, विक्रमारकु़डू, याम डोंगा, मगधिरा, बाहुबली आणि आता RRR असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट राजमौली यांच्या नावावर आहेत.
एडिटिंगपासून सुरुवात
पदवी शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करणार, असा प्रश्न राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी त्यांना विचारला. तेव्हा आपल्याला चित्रपट दिग्दर्शक व्हायचं असल्याचं राजामौली यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, RRR Movie
वडिलांच्या सल्ल्यानुसार आधी त्यांनी चित्रपट उद्योगाच्या इतर विभागांमध्ये कामाचा अनुभव घ्यायचं ठरवलं आणि त्यानुसार एडिटिंगचं प्रशिक्षण घेतलं. चित्रपटनिर्मितीच्या विविध पैलूंवर पकड आल्यानंतर ते के. राघवेंद्र राव यांचे सहायक दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. स्वतःच्या वडिलांना त्यांनी कथालेखनासाठी सहाय्य केलं (सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाची कथा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती).
के. राघवेंद्र राव यांच्या मार्गदर्शनाखाली काही जाहिरातींसाठी काम केल्यावर राजामौली यांनी यांनी ईटीव्हीसाठी के. राघवेंद्र राव यांनी निर्मिती केलेल्या संथी निवासम या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
स्टुडन्ट नंबर वन या 2001 साली आलेल्या चित्रपटाद्वारे त्यांचं चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. राघवेंद्र राव यांनी पटकथा लिहून आणि दिग्दर्शनाबाबत सल्ला देऊन राजामौली यांना पाठबळ पुरवलं.
राजामौली यांनी त्यांच्या पहिल्या संधीचं सोनं केलं. ते रोज सकाळी स्वतःच्या यामाह मोटरसायकलवरून राघवेंद्र राव यांच्या घरी जात असत आणि चित्रपटासाठी लिहिलेला नवीन प्रसंग त्यांना दाखवत व त्यांच्या सूचना ऐकून घेत. मग ते चित्रीकरणासाठी सेटवर जायचे.
स्टुडन्ट नंबर वन या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीने राजमौली यांनी अधिक कष्ट घेऊन सिंहाद्री हा दुसरा चित्रपट दिग्दर्शित केला, त्यातही त्यांनी ज्युनिअर एनटीआर यांना घेतलं. तोवर आदि या चित्रपटामुळे ज्युनिअर एनटीआर यांना प्रचंड लोकप्रियता मिळालेली होती. त्यामुळे सिंहाद्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात गाजायला हवा, असा दबाव राजामौलींवर होता. या निमित्ताने त्यांचा चित्रपट पहिल्यांदाच 'ब्लॉकबस्टर' ठरला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
त्यानंतर त्यांनी दर वर्षाला एका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. यात नितीन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या सायेपासून पुन्हा एकदा ज्युनिअर एनटीआरची भूमिका असणाऱ्या यमदोंगापर्यंत विविध चित्रपटांचा समावेश आहे.
विक्रमारकुडू या चित्रपटात त्यांनी पोलिसांना केंद्रस्थानी ठेवणारी कथा ताकदीने सांगितली आणि त्यांच्या नावावर आणखी एक धडाकेबाज कमाई करणारी चित्रपट जमा झाला. या चित्रपटाद्वारे ते इतर भाषांमधील चित्रपटउद्योगांमध्ये प्रवेश करते झाले. या चित्रपटाचे तामिळ, कन्नड व हिंदी भाषांमध्ये रिमेक झाले आणि त्यांनाही तिकीट खिडकीवर चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर पुन्हा एकदा ज्युनिअर एनटीआर यांना घेऊन त्यांनी सामाजिक आशय असणारा यमदोंगा हा फॅन्टसी चित्रपट तयार केला. राजामौलींच्या या सहाव्या चित्रपटानेही मोठी कमाई केली.
चित्रपट उद्योगातील विक्रम
बाहुबली प्रदर्शित होण्यापूर्वी राजामौली हे मगधिराचे दिग्दर्शक म्हणून चाहत्यांना ज्ञात होते. वडील विजयेंद्र प्रसाद यांच्याच कथेवर आधारित असणारा मगधिरा हा चित्रपट बनवण्यासाठी आपण 15 वर्षं वाट पाहिली, असं राजामौली म्हणतात. साठाद्रुवंशातील योद्धायच्या आयुष्यावरील या चित्रपटाने मुख्य अभिनेता राम चरण तेजा याला लोकप्रियता मिळवून देण्यासोबतच चित्रपटउद्योगातील सर्व विक्रम मोडले.

फोटो स्रोत, facebook
मगधीरासारखा ब्लॉकबस्टर चित्रपट केल्यानंतर राजामौली यांच्या पुढील चित्रपटाची सगळेच वाट बघत होते. पण त्यांनी सुनील यांच्यासोबत 'मर्यादा रामण्णा' हा चित्रपट करणार असल्याचं जाहीर करून सर्वांना चकित केलं. आपण दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट आपल्या सर्वाधिक आवडता असल्याचं ते म्हणतात.
आपण कोणत्याही अहंकारी भांडणांमध्ये पडत नाही, असं राजामौली म्हणतात. तारेतारकांच्या लोकप्रियतेचं मूल्य आपल्याला माहीत आहे, असं ते म्हणतात.
परंतु, 'ईगा' या पुढच्या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा सर्वांना धक्का दिला. या वेळी एका माशीवर चित्रपट करून तोसुद्धा आपण चालवून दाखवू शकतो, एवढंच राजामौलींना सिद्ध करायचं असल्याची टीकाही झाली. पण यात काही तथ्य नाही, कथा परिपूर्ण असेल तर कोणताही चित्रपट चालू शकतो, असं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटलं आहे.
'ईगा' हा चित्रपट तयार करणं बाहुबलीपेक्षाही अवघड होतं, असं राजामौली मानतात. या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आत्मविश्वास वाढला, असं ते म्हणाले होते.
नुसत्या लोकप्रियतेचा उपयोग नाही, कथाच सर्वांत महत्त्वाची असते
कोणत्याही नट-नट्यांच्या लोकप्रियतेपेक्षाही कथा सर्वांत महत्त्वाची असते, असं राजामौली मानतात. त्यामुळे रजनीकांत, आमीर खान यांच्यासारख्या अभिनेत्यांनी दिलेले प्रस्तावही त्यांनी स्वीकारले नाहीत, कारण या अभिनेत्यांसाठी सुसंगत कथा आपल्याकडे नाही, असं ते सांगतात.

फोटो स्रोत, facebook
राजामौली पुरुष अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची तुलना शून्यांच्या मालिकेशी करतात. या शून्यांच्या आधी एक अंक आल्याशिवाय या शून्यांच्या मालिकेला मूल्य प्राप्त होत नाही, आणि चित्रपटाच्या बाबतीत या अंकाइतकं महत्त्व कथेला असतं. आपल्याकडे चांगली कथा नसेल आणि केवळ एखाद्या पुरुष अभिनेत्यावर विसंबून चित्रपट करायचा असेल, तर ते आपल्याला जमणार नाही, असं ते सांगतात.
राजामौली लेखकाच्या कल्पनाशक्तीपलीकडे जाऊन अचंबित करणारे चित्रपट निर्माण करतात, अशी प्रशंसा त्यांच्या वडिलांनी केली होती.
राजमौली यांच्या चित्रपटांमधील प्रमुख अभिनेतेही त्यांच्यावर पूर्णतः विश्वास ठेवतात आणि पटकथा न ऐकताही त्यांच्या सोबत काम करायला होकार देतात. 'आरआरआर' चित्रपटासंदर्भात अलीकडे दिलेल्या मुलाखतीत ज्युनिअर एनटीआर व राम चरण तेजा यांनी याची कबुली दिली होती.
'आरआरआर'संबंधी राजामौली यांनी आपल्याला संपर्क साधला तेव्हा कथा न ऐकताच आपण छायाचित्रं काढून या प्रकल्पाची घोषणा केली होती, असं ते मुलाखतीत म्हणाले.
'बाहुबली'ने केलेला चमत्कार
'बाहुबली' हा चित्रपट राजमौली यांच्या कारकीर्दीतला आत्तापर्यंतचा सर्वांत भव्यदिव्य आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला आहे.
'बाहुबली- द बिगिनिंग' या या चित्रपटमालेतला पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर 'कट्टाप्पाने बाहुबली को क्यों मारा?' या एका संवादाच्या आधारे प्रेक्षक दुसऱ्या भागाची वाट पाहात दोन वर्षं थांबले.

फोटो स्रोत, facebook
'बाहुबली' चित्रपटमालेद्वारे राजामौली यांनी तेलुगू चित्रपट उद्योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. त्यांनी 'बाहुबली' हा एक सुपरहिरोच जगाला दिला आहे. आपण मुळातच या चित्रपटाकडे केवळ तेलुगू कलाकृती म्हणून पाहत नव्हतो, असं ते म्हणतात.
तेलुगू चित्रपटउद्योगाला राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणं, ही आपली मनिषा नव्हती, असं ते म्हणतात. परंतु, ते बाहुबलीकडे एक भारतीय चित्रपट म्हणून पाहत होते, त्यामुळे त्यांनी या चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी त्या दृष्टीने लोकांना रुजू करवून घेतलं.
'बाहुबली'ला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रशंसा मिळाली असली, तरी या चित्रपटातील भावात्मक घटक आणखी चांगल्या रितीने दाखवता आला असता, असं राजामौलींना वाटतं. अनेक मुलाखतींमध्ये ते याबद्दल बोलले आहेत.
'बाहुबली' हा एक धाडसी प्रयत्न होता, असं कोणी म्हणाल्यास ते असहमती दर्शवतात. सर्व जण केळी विकत असताना आपण आंबा विकावा, असं मार्केटिंगचं तत्त्व ते सांगतात. हे तत्त्व यशस्वी ठरतं, असंही म्हणतात.
कुटुंबाकडून मिळणारं सामर्थ्य
राजामौली 10 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या पन्नाशीत प्रवेश करतील. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यामधलं कोव्वरू हे त्यांचं मूळ गाव असलं तरी त्यांचा जन्म 1973 साली कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात झाला.

फोटो स्रोत, RRRMOVIE/FB
आपलं कुटुंब आपल्याला यशाचं सामर्थ्य देतं, असं राजामौली म्हणतात. त्यांचे वडील मुलाच्या चित्रपटांसाठी कथा पुरवतात. त्यांचे मोठे भाऊ एम. एम. कीरवणी सुरुवातीपासून त्यांच्या चित्रपटांचं संगीत देत आले आहेत.
प्रत्येक चित्रपटाच्या आधी व नंतर आपण आपल्या कुटुंबीयांसोबत चर्चा करतो, असं राजामौली सांगतात. कुटुंबातील सर्व सदस्यांना कथा आवडल्यावरच चित्रीकरण सुरू होतं. चित्रपटाचा प्रकार कोणता आहे, आकार केवढा आहे, याची त्यांना फिकीर नसते, पण आपल्या कुटुंबीयांकडून त्यावर संमतीचा शिक्का मात्र मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यानंतर ते मुख्य अभिनेत्याचा आणि मार्केटिंगचा विचार करतात.

फोटो स्रोत, SS RAJAMOULI/FB
राजामौली हातात घेतलेला चित्रपट पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या चित्रपटाचा विचार करत नाहीत. त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये बरंच अंतर असतं, अशी टीका केली जात असली, तरी प्रत्येक नवीन चित्रपटाचा विचार करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी आवश्यक असतो, असं ते मानतात.
राजामौली यांनी तयार केलेल्या चित्रपटाची मिळकत चांगलीच होईल, असा विश्वास निर्मात्यांच्या मनात निर्माण झाला आहे. पण केवळ पैसा कमावणं हे आपलं उद्दिष्ट नसल्याचं राजामौली म्हणतात. अर्थात, आपण काही पैसा नसलेला योगी नव्हे, असंही ते स्पष्ट करतात.
आपल्या चित्रपटात गुंतवणूक करणाऱ्या निर्मात्यांनी पैसा कमावण्यापेक्षा कथेला किमान एक टक्का तरी जास्त महत्त्व द्यावं, अशी त्यंची इच्छा असते. आपल्या चित्रपटावर पैसा लावणाऱ्या निर्मात्यांना चांगल्या चित्रपटांबद्दल आस्था असायला हवी, असं त्यांचं मत आहे.
त्यांना चित्रपट दिग्दर्शनासाठी किती मानधन दिलं जातं, याबद्दल अजूनही त्यांच्या चाहत्यांना फार काही माहीत नाही. याबद्दल तेही काही स्पष्टपणे बोललेले नाहीत. चित्रपटाच्या मिळकतीमधील काही टक्के वाटा आपण घेत असल्याचं ते एका मुलाखतीत म्हणाले होते, तितकंच.
महाभारतावर चित्रपट करण्याची महत्त्वाकांक्षा
राजामौली हा आपल्या कारकिर्दीमधील सर्वाधिक मिळकत करणारा चित्रपट ठरेल, अशी राजामौली यांना आशा आहे. त्यांच्या चित्रपटातील प्रमुख अभिनेते ज्युनिअर एनटीआर व राम चरण तेजा यांनी दोन भिन्न प्रवृत्तीची पात्रं निभावली आहेत. चित्रपटाची टॅगलाइन आहे- रौद्रम, रुधिरम, रणम्. ब्रिटीशकालीन कथानक दाखवणारा हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला आहे.
कोव्हिडमुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, SS RAJAMOULI/FB
ज्युनिअर एनटीआर व राम चरण तेजा यांच्या सोबतचं छायाचित्र प्रसिद्ध करून 18 मार्च 2017 रोजी राजामौली यांनी आरआरआरची घोषणा केली होती. 22 मार्च 2018 रोजी त्याची अधिकृत घोषणा झाली. चित्रीकरण पूर्ण होऊन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला तेव्हा कोव्हिडची साथ उद्भवली. त्यानंतर प्रदर्शन लांबत गेलं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. 2022 सालच्या संक्रातीची तारीखही पुढे ढकलली आणि 25 मार्च 2022 रोजी अखेर चित्रपट प्रदर्शित झाला.
या चित्रपटाचा निर्मितीखर्च 300 ते 400 कोटी रुपयांदरम्यान असावा, असा अंदाज आहे. डीव्हीव्ही एन्टरटेन्मेन्ट या कंपनीच्या डी. व्ही. व्ही. दानिया यांनी चित्रपटामध्ये गुंतवणूक केली आहे. तेलंगण व आंध्र प्रदेश या दोन्ही राज्य सरकारांनी वाढीव दरामध्ये तिकीटविक्री करण्याची परवानगी निर्मात्यांना दिली.
महाभारताचं दिग्दर्शन करण्याची इच्छा राजामौली यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. तो त्यांच्या स्वप्नातला प्रकल्प आहे, असंही ते म्हणाले आहेत. लहानपणापासून आपण महाभारतातील कथा ऐकत मोठे झालो, त्यामुळे हा महाप्रकल्प कायमच आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात असतो, असं ते म्हणतात. असा चित्रपट केला तर तो प्रचंड गाजेल याची आपल्याला खात्री असल्याचंही ते म्हणतात.
अशा प्रकारच्या महाप्रकल्पासाठी किमान दहा वर्षं लागतील, असं त्यांना वाटतं. इतका वेळ देणं आपल्याला शक्य होईल का, याबद्दल ते साशंक असले तरी त्यांना हा चित्रपट करायचा आहे एवढं नक्की.
कामात व्यग्र
राजामौली प्रचंड यशस्वी असले, तरी त्यांच्यावरही टीका होतेच. त्यांच्या चित्रपटांमध्ये भयंकर हिंसा दाखवलेली असते, हा टीकेचा एक मुद्दा असतो. त्यांच्या वास्तवाहून अद्भुत पात्रनिर्मितीमध्ये ते खूप जास्त 'सिनेमॅटिक लिबर्टी' घेतात, असंही मत काही चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केलं आहे.
त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये बरंच अंतर असतं, अशी एक गोड तक्रार तर त्यांचे चाहतेसुद्धा करतात.
पहिल्या चित्रपटानंतर सिंहाद्री तयार करायला आपण दोन वर्षं घेतली, त्यानंतर यमदोंगा व मगधिरा यांच्या निर्मितीसाठीसुद्धा दोन वर्षं लागली, असं राजामौली म्हणतात.
ईगा आणि बाहुबली- द बिगिनिंग यांच्यातील कालावधी तीन वर्षांचा होता. आणि बाहुबलीचा पहिला भाग आल्यानंतर बाहुबली- द कन्क्लूजन प्रदर्शित व्हायला दोन वर्षं गेली. इतका वेळ जात असल्यामुळे त्यांच्या चित्रपटांमधील अभिनेते-अभिनेत्र्यांचं वेळापत्रक इतर प्रकल्पांनी भरून जातं, असंही तेलुगू माध्यमांमधून ऐकू येतं.
राजामौली यांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आपण उत्सुक असतो, त्यामुले ते चित्रीकरणादरम्यान जो काही छळ करतील तो सहन करायची आपली तयारी असते, असं त्यांच्या चित्रपटांमधील अभिनेते मिश्कीलपणे म्हणतात. आपल्या मनाप्रमाणे प्रसंगाचं चित्रीकरण होत नाही, तोर राजामौली अभिनेत्यांना शांत बसू देत नाहीत.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








