RRR : रामचरण-NTR ज्यांच्या भूमिकेत आहेत ते भीम आणि सीताराम राजू खरंच जिवलग मित्र होते?

RRR, कुमराम भीम, अल्लुरी सीता राम राजू, राजामौली

फोटो स्रोत, PEN STUDIO

    • Author, बाला सतीश, शुभम प्रवीण कुमार, शंकर वडीसेट्टी
    • Role, बीबीसी तेलगू

कुमारम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू ही पात्रं असलेला RRR हा सध्या सिनेमा गाजतोय. आंध्र प्रदेशचे 'द हिरो ऑफ मनयम' अल्लुरी सीताराम राजू आणि तेलंगणाचे कुमारम भीम ज्यांना आदिवासी आपले दैवत मानतात त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आता सर्वांचीच उत्सुकता चाळवली आहे.

अल्लुरी यांनी मनयममधील आदिवासींना संघटित करून ब्रिटीशांचं कंबरड मोडलं, तर तिकडे कुमारम भीम यांनी गोंड आदिवासींच्या हक्कांसाठी निजामाशी लढा दिला.

दिग्दर्शक राजामौली यांनी RRR चित्रपटात या दोघांची घनिष्ट मैत्री दाखवलीय. राजामौली यांनी या दोन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या हिरोंचा उपयोग त्यांच्या चित्रपटातील मुख्य पात्रांना उंचीवर नेण्यासाठी केलाय.

हे दोन हिरो कोण आहेत? त्या दोघांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? इतिहासात आपलं नाव अजरामर करणाऱ्या या दोघांबद्दल आज जाणून घेऊया.

कुमारम भीम

22 ऑक्टोबर 1902 रोजी संकेपल्ली गावातील गोंड आदिवासी कुटुंबात कुमराम भीम यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव कुमारम चिमना असं होतं.

त्याकाळी हैद्राबाद संस्थानात निजामाची सत्ता होती. पण निजामी सत्तेवर ब्रिटिशांचा अंमल असल्याने, ब्रिटिश शासन आणि निजामाची जुलमी राजवट यांची सांगड हैदराबादमध्ये होती. 18व्या आणि 19व्या शतकापासून या जुलमी सत्तेमुळे आदिवासींना नव्या संकटांचा सामना करावा लागला. वनसंरक्षण कायद्याच्या नावाखाली त्यांच्या जमिनी व शेतजमिनी हिसकावून घेतल्या जात होत्या.

कुमारम भीम

भीमचे कुटुंब हे अनेक गोंड आदिवासी कुटुंबांपैकी एक होतं. साहजिकच त्यांनाही या संकटाचा सामना करावा लागला. भीम 15 वर्षांचे असताना संकेपल्ली इथल्या वन अधिकारी आणि व्यापाऱ्यांमुळे त्याच्या कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला.

"भीमच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब सुरदापूर इथं स्थलांतरित झालं आणि उदरनिर्वाहासाठी शेती करू लागलं. जेव्हा पीक कापणीला आलं तेव्हा भीम यांचं कुटुंब शेती करत असलेल्या जमिनीवर एक मुस्लिम व्यक्ती आपला मालकी हक्क सांगू लागला. त्यावेळी भीम यांनी सादिक नावाच्या व्यक्तीच्या डोक्यात घाव घातला. त्यानंतर या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात भीम आसामला पळून गेले आणि तिथल्या चहाच्या मळ्यांमध्ये काम करू लागले.

इथेच ते लिहायला, वाचायला शिकले. देशातल्या राजकारणाशी आणि बंडाशी त्यांची ओळख झाली."

अल्लम राजैया आणि साहू यांनी त्यांच्या 'कोमुराम भीम' या पुस्तकात हे लिहून ठेवलंय.

आसाममधील बंडात सहभागी झालेल्या भीमला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण या पोलिसांना चकवा देऊन भीम आसिफाबाद जवळील काकणघाटकडे निसटला. तिथं तो लच्छू पटेल यांच्या हाताखाली काम करू लागला. त्यानंतर त्याने सोमबाईशी लग्न केलं.

वन हक्कासाठी संघर्ष

दरम्यानच्या काळात भीमच्या काकांनी इतर आदिवासींना सोबत घेऊन बाबेझरीच्या आजूबाजूच्या 12 गावांमधील जंगल साफ करून ते लागवडीखाली आणलं. पण तिथं लवकरच दडपशाही सुरू झाली. पोलिसांनी ती गावं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. या 12 गावांच्या वतीने सरकारविरोधात लढण्यासाठी भीम पुढे आला.

सरकारी अधिकार्‍यांच्या वाढत्या त्रासाला कंटाळलेल्या, पिकवलेलं पीक काढता न आलेल्या, जंगलावरील हक्क नाकारला गेलेल्या या 12 गावांना एकत्र आणून भीमने एक चळवळ सुरू केली.

RRR, कुमराम भीम, अल्लुरी सीता राम राजू, राजामौली

फोटो स्रोत, TWITTER/SSRAJAMOULI

यात महत्वाचं म्हणजे भीम यांचा मुद्दा होता की जंगल, जंगलातील जमीन आणि प्रवाहातील पाण्यावर आदिवासींचे अधिकार असले पाहिजेत.

या निमित्ताने त्यांनी 'जल-जंगल-जमीन' ही प्रसिद्ध घोषणा दिली. त्यांनी या तिघांवर हक्क मिळवण्यासाठी चळवळ सुरू केली. त्यांनी 'मावा नाते मावा राज' अशी घोषणा देऊन 'आमची भूमी आमचं सरकार' हा मुद्दा पुढं आणला.

अल्लम राजैया लिहितात, "परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून तत्कालीन निजाम सरकारने तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांना जोडेघाट इथं चर्चेसाठी पाठवलं. या 12 गावांना जमिनीचे हक्कपत्र, कर्ज रद्द करण्यासारखी आश्वासन देण्यात आली. मात्र, भीम यांनी या 12 गावांसाठी स्वराज्याची मागणी केली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली."

चर्चा निष्फळ ठरल्यानं निजाम सरकारने आंदोलन थोपवण्यासाठी विशेष पोलिस दल पाठवलं. भीमच्या नेतृत्वाखाली आदिवासी आणि निजाम यांच्या तब्बल सात महिने युद्ध सुरू राहील. शेवटी 1 सप्टेंबर 1940 रोजी सैन्याने भीमला गोळ्या घालून ठार केलं.

तो दिवस अश्वयुजा पौर्णिमेचा होता. (अश्वयुजा महिन्यातील पौर्णिमेचा दिवस) तेव्हाच ते जोडेनघाट गाव सध्याच्या कोमराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील होतं. त्यादिवशी निजाम पोलिस दलातील 300 हून अधिक सैनिक मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन त्या गावात आले.

कुमारम भीम यांच्या पत्नी सोमबाई
फोटो कॅप्शन, कुमारम भीम यांच्या पत्नी सोमबाई

त्या गावातील कुर्डू पटेल फितूर झाला होता. त्यानं दिलेल्या माहितीनुसारच सशस्त्र पोलीस त्या टेकडीजवळ आलं. तिथं भीम त्यांच्या साथीदारांसह मागच्या टोकाकडे राहत होते. तिथंच पोलिसांनी भीम आणि इतर 15 जणांना गोळ्या घालून ठार केलं आणि इतरांना अटक केली. भीमचं बंड त्या दिवशी संपलं होतं.

भीमच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कुर्डू पटेलला 1946 मध्ये तेलंगणा शेतकऱ्यांच्या सशस्त्र संघर्षाच्या सशस्त्र दलांनी गोळ्या घालून ठार केलं.

फक्त हिरोचं नाही तर तो देव होता...

बाकीच्या जगासाठी भीम कदाचित एक क्रांतिकारी असतील. पण, गोंड लोकांसाठी ते केवळ क्रांतिकारक नव्हते. त्यांच्यासाठी ते देवापेक्षा कमी नव्हते.

आसिफाबाद जिल्ह्यातील कुमारम भीम इथले गोंड आजही त्यांच्या स्मरणार्थ गाणी गातात. ते दरवर्षी अश्वयुजा पौर्णिमेच्या दिवशी त्याच स्मरण करतात. त्याची पूजा करतात.

"कुमारममध्ये जादुई शक्ती आहे. कोणताही दगड किंवा गोळी त्याला काही करू शकत नाही," असा विश्वास तेथील गोंडांमध्ये आहे. गोंड भीम यांना पूजतात यावरूनच गोष्टी स्पष्ट होतात.

RRR, कुमराम भीम, अल्लुरी सीता राम राजू, राजामौली

सिदाम आरजू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "असं म्हणतात की कोणतीही गोळी भीम यांना भेदू शकत नाही. त्यांना बुडवता येत नाही. दगड त्यांना इजा करू शकत नाहीत. म्हणून त्यांना मारण्यासाठी, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणार्‍या कापडाचा तुकडा बंदुकीच्या गोळीसाठी आवरण म्हणून वापरावा. तरच ती गोळी त्याचा ठाव घेऊ शकते."

ही गोष्ट भीम यांच्याकडे ईश्वरी शक्ती आहे या गोंडांच्या श्रद्धेची साक्ष देते.

अल्लुरी सीताराम राजू

तेलुगू भूमीत ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्यांपैकी अल्लुरी सीताराम राजू हे एक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी मनयमध्ये आदिवासींना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं. त्यांनी काही वर्षे लढाऊ चळवळींचे नेतृत्व केलं. पण अखेरीस त्यांना इंग्रजांनी मारलं. महात्मा गांधींनी त्यांच्या 'यंग इंडिया' मासिकात अल्लुरी सीताराम राजू यांचा प्रशंसनीय उल्लेख केला होता.

अल्लुरी यांचा जन्म 4 जुलै 1897 मध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यातील पांडरंगी गावात झाला. त्यांच मूळ गाव पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगल्लू हे होतं. त्यांच्या वडिलांच नाव वेनका राम राजू. त्यांचे वडील फोटोग्राफर होते. सूर्यनारायणम्मा ही त्यांची आई. थोडक्यात ते एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. त्यांनी आपलं शिक्षण गोदावरी प्रदेशातील नरसापुरम, राजा महेंद्रवरम, रामचंद्रपुरम, तुनी, काकीनाडा आणि इतर ठिकाणी पूर्ण केलं.

RRR, कुमराम भीम, अल्लुरी सीता राम राजू, राजामौली

अल्लुरी सहावीत होते तेव्हा गोदावरी पुष्करलूचा काळ होता. त्यावेळी कॉलराची साथ पसरली होती. 1908 मध्ये त्यांच्या वडिलांचा त्या साथीत मृत्यू झाला. त्यानंतर अल्लुरी यांचं शिक्षण थांबलं. 1916 मध्ये ध्यानधारणा करण्याच्या उद्देशाने अल्लुरी यांनी उत्तर भारत भ्रमणाला सुरुवात केली.

त्यांचा अध्यात्मिक प्रवास संपवून 1918 ला ते त्यांच्या मूळ गावी परतले. 1919 पासून त्यांनी कंपनी क्षेत्रातील आदिवासींवर होणारा अत्याचार पाहिला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली. आदिवासींच्या वनउत्पादनाचा लाभ घेणे, ते करत असलेल्या कामाचा योग्य मोबदला न देणे या मुद्द्यांवर त्यांनी सरकारकडे विचारणा केली. त्यांनी आदिवासींना संघटित करून चळवळ पुढे नेली.

कंपनीच्या विरोधात तीन वर्षांचा सशस्त्र संघर्ष

जेमतेम वीस वर्षांच्या अल्लुरींनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध उठाव केला. मुख्यतः मनयम प्रदेशात मुताधार म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थानिक उच्चभ्रू लोकांसोबत मिळून ब्रिटिशांनी जे शोषण केलं होतं त्याविरोधात हे बंड होत. स्थानिक सावकार आणि कंत्राटदार यांच्या हिंसाचाराला कंटाळलेल्या आदिवासींना संघटित करून अल्लुरी यांनी बंडाचं बिगुल वाजवलं.

अल्लुरी सीता रामा राजू यांचं स्मारक
फोटो कॅप्शन, अल्लुरी सीता रामा राजू यांचं स्मारक

शस्त्रे हस्तगत करण्यासाठी मनयमच्या क्रांतिकारकांनी अल्लुरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यांवर छापे टाकले. अल्लुरी आणि त्यांच्या साथीदारांनी राजावोमांगी, अडतेगला, देवीपट्टनम, चिंतापल्ली, कृष्णा देवीपेटा आणि इतर पोलीस ठाण्यांवर छापे टाकले. तेव्हा एकाच दिवसात शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या या पोलीस ठाण्यांवर छापे टाकल्याने खळबळ उडाली होती. अल्लुरींबद्दल लोकांमध्ये आपुलकी आणि आदर वाढला. काहींचा असा विश्वास होता की त्याच्याकडे जादूई शक्ती होती.

तत्कालीन सरकारने याला मनयम पिथुरी मानले. सशस्त्र चळवळ सलग तीन वर्षे सुरू राहिली. अल्लुरीच्या आंदोलनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने पहिल्यांदा मलबार विशेष पोलिस दल पाठवले. ते चळवळ रोखण्यात अपयशी ठरल्याने आसाम रायफल्सनेही लढाईत एन्ट्री केली.

RRR, कुमराम भीम, अल्लुरी सीता राम राजू, राजामौली

आसाम रायफल्सने अल्लुरींना पकडलं. कोय्युरुजवळील माम्पा इथल्या झऱ्याजवळ जखम धुताना अल्लुरी सापडल्याची नोंद आहे. पण, इतिहासकारांच्या मते, अटक केलेल्या अल्लुरी यांना जिवंत सोबत आणायचं असताना त्यांना वाटेतच गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.

मेजर गुडाल नावाच्या एका अधिकाऱ्याने आपल्या अहवालात घोषित केलं की, 7 मे 1924 रोजी अल्लुरी यांना जोखीम म्हणून गोळ्या घालून ठार करण्यात आलं. अल्लुरी यांचा मृतदेह कृष्णादेवी पेटा येथे हलवण्यात आला. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा परिसर आता अल्लुरी मेमोरियल पार्क म्हणून विकसित झाला आहे.

RRR, कुमराम भीम, अल्लुरी सीता राम राजू, राजामौली

ब्रिटीशांच्या विरोधात धैर्याने लढलेल्या अल्लुरी यांना वयाच्या 27 व्या वर्षी प्राण गमवावे लागले. त्यांना 'मनयमचे क्रांतिकारक' म्हणून गौरवले जाते. शेकडो लोक नेहमी अल्लुरी मेमोरियल पार्कला भेट देतात. तिथं त्यांचं स्मरण केलं जातं.

ब्रिटिश सरकारने चळवळीचा भाग असलेल्या अल्लुरीच्या 17 क्रांतिकारकांपैकी काहींना अटक केली. त्यांना अंदमानसारख्या कारागृहात बंदी म्हणून डांबण्यात आलं. आंदोलनात काहींना जीव गमवावा लागला. त्यानंतर आंदोलन संपलं मात्र त्यांचं नाव आजही अमर आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)