महेश बाबू : 'मी परवडणार नाही' म्हणत बॉलिवूडला आव्हान देणारा हा तेलुगू स्टार कमावतो किती?

महेश बाबू

फोटो स्रोत, Facebook/Mahesh Babu

    • Author, पराग छापेकर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

काही महिन्यांपूर्वी तेलुगू सुपरस्टार महेश बाबू त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला होता.

'हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मी परवडणार नाही, त्यामुळे मी हिंदी चित्रपट करून वेळ वाया घालवू इच्छित नाही,' असं महेश बाबूनं माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

एकीकडे बॉलिवूडला साउथ इंडियन सिनेमामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेची चर्चा सुरू असतानाच महेश बाबूनं केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या.

'मेजर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी माध्यमांशी बोलताना महेश बाबूला बॉलिवूड डेब्यूबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं बॉलिवूडमध्ये काम करण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगताना आपलं परखड मतच व्यक्त केलं होतं.

"मला हिंदीमधून अनेक ऑफर येतात, पण त्यांना मी परवडेन असं मला वाटत नाही. ज्या इंडस्ट्रीला मी परवडत नाही, तिथे काम करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये," असं महेश बाबूनं म्हटलं.

त्यानं पुढं म्हटलं, "जे स्टारडम आणि आदर मला इथे मिळतो, तो प्रचंड आहे. त्यामुळे मी ही इंडस्ट्री सोडून इतर कोणत्याही इंडस्ट्रीत जाण्याचा विचार करणार नाही."

महेश बाबू

फोटो स्रोत, Facebook/Mahesh Babu

सध्या देशभरात साउथ इंडियन सिनेमाची क्रेझ वाढतीये. त्याबद्दल महेश बाबूनं म्हटलं होतं, "मला नेहमीच तेलुगू चित्रपट करायचे होते आणि देशभरातील लोकांनी त्या पाहाव्यात असं मला वाटतं. आता ते होत आहे याचा मला आनंद आहे."

तेलुगू सिनेमा ही माझी ताकद आहे आणि मी तेलुगू सिनेमातील ज्या भावना आहेत त्या समजून घेऊ शकतो, असंही त्यानं म्हटलं होतं.

हिंदी फिल्म इंडस्ट्री मला 'अफोर्ड' करू शकत नाही, असं जेव्हा महेश बाबू म्हणतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ हाच निघतो की, बॉलिवूडकडे महेश बाबूला कास्ट करता येईल एवढा पैसा नाहीये. म्हणजेच महेश बाबू इतका महागडा आहे.

अर्थात, आपल्या या विधानावर महेश बाबूने नंतर स्पष्टीकरणही दिलं होतं.

'मी सर्व भाषांचा आदर करतो. पण मी आता जे काम करत आहे, त्यात खूश आहे असं माझं म्हणणं होतं,' असं महेश बाबूनं म्हटलं.

महेश बाबू हिंदी पट्ट्यातल्या प्रेक्षकांसाठी काही नवं नाव नाहीये. कोल्ड ड्रिंक आणि एका वादग्रस्त तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातीच्या माध्यातून महेश बाबूचा चेहरा अनेकांनी पाहिला असेल. पण त्याआधीही हिंदीमध्ये डब झालेल्या त्याच्या चित्रपटांमुळेही तो दक्षिण भारताच्या बाहेरही पोहोचला होता.

वादात न अडकणारा 'फॅमिली मॅन'

प्रिन्स ऑफ टॉलिवूड या नावानं प्रसिद्ध असलेल्या महेश बाबूला कोणत्याही वादात न अडकणारा 'फॅमिली मॅन' म्हणूनही ओळखलं जातं.

47 वर्षांच्या महेश बाबूची अभिनयातली कारकिर्द वयाच्या चौथ्या वर्षीच सुरूच झाली होती. महेश बाबू तेलुगू इंडस्ट्रीतले प्रसिद्ध अभिनेते कृष्णा यांचा धाकटा मुलगा. बाल कलाकार म्हणून त्यानं पहिल्यांदा नीडा या चित्रपटात काम केलं. त्यानंतर आठ चित्रपटांत त्यानं बाल कलाकार म्हणून काम केलं. लीड अक्टर म्हणून त्यानं 'राजाकुमारुडू' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला अवॉर्डही मिळालं होतं.

2003 मध्ये रिलीज झालेल्या 'ओक्काडू'मध्ये त्यानं कबड्डीपटूची भूमिका केली होती. हा चित्रपट तेलुगूमधील सर्वाधिक हिट सिनेमांपैकी एक समजला जातो.

महेश बाबू

फोटो स्रोत, PARAG CHHAPEKAR

त्यानंतर दोन वर्षांपैकी प्रदर्शित झालेल्या 'अथाडु'नेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'मुरारी', 'पोकिरी', 'ननेक्कोडाइन', 'सरिमंथुडू', 'व्यापारी', 'सीथम्मा वकितलो सरिमल्ले चेट्टू' सारख्या हिट सिनेमांनंतर महेश बाबूच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तबच झालं.

2005 साली महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं. त्यांना गौतम आणि सितारा अशी दोन मुलं आहेत.

सोशल मीडियावर आपले कुटुंबासोबतचे फोटो शेअर करणाऱ्या महेश बाबूची आलिशान लाइफस्टाइल सगळ्यांनाच माहीत आहे.

महेश बाबूची नेटवर्थ

2012 साली फोर्ब्जच्या सेलिब्रिटी 100 च्या यादीत महेश बाबूचंही नाव होतं. त्याचं हैदराबादमधलं घर हे तिथल्या महागड्या प्रॉपर्टींपैकी एक आहे. ज्युबिली हिल्स भागात त्याचे दोन आलिशन बंगले आहेत. बंगळुरूमध्येही त्याच्या काही प्रॉपर्टी आहेत.

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान

एका डॉटकॉम कंपनीनं दिलेल्या वृत्तानुसार महेश बाबूची नेटवर्थ जवळपास 135 कोटी रुपये आहे. तो एका सिनेमासाठी 55 कोटींहून अधिक मानधन घेतो, त्याशिवाय सिनेमाच्या प्रॉफिटमध्येही त्याचा शेअर असतो.

ब्रँड एन्डोर्समेंटसाठीही तो 15 कोटींहून अधिक कमाई करतो.

त्याची स्वतःची 7 कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन आहे.

गेल्या 20 वर्षांत 40 हून अधिक चित्रपट करणाऱ्या महेश बाबूचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊसही आहे.

बॉलिवूडचे स्टार्स किती कमावतात?

फिल्म ट्रेड एक्सपर्ट अतुल मोहन सांगतात, "आता तुम्ही 100-150 कोटी रुपये मागत असाल. पण 10 वर्षांपूर्वी तुम्ही किती पैसे घेत होता? सलमान खानसारखे स्टार्स तर दहा वर्षांपूर्वीही प्रत्येक सिनेमासाठी 50 कोटींची डील करायचे. अजय देवगण आणि सलमानसारख्या स्टार्सना 10 चित्रपटांच्या डीलसाठी 400 कोटी रुपयांपर्यंत मिळाले आहेत. आता तुम्ही आताच्या जनरेशनला रजनीकांतसोबत कम्पेअर करू शकत नाही. त्यांचा जगभरातील फॅन बेस आणि कमाई दोन्ही वेगळ्याच पातळीवरच आहे."

महेश बाबू

फोटो स्रोत, Getty Images

"सध्याचा विचार करता ऑफ द रेकॉर्ड माहितीनुसार अक्षय किंवा ऋतिक रोशन 120 कोटींपर्यंत कमावतात. साउथ इंडियन अभिनेत्यांना इतका पैसा कोण देणार? हे विधान व्हायरल व्हावं या उद्देशानेच केल्यासारखं वाटतं. काही दिवसांपूर्वी सुदीपला एवढी प्रसिद्धी मिळाली होती, आता आपलीही होऊ दे, असा विचार दिसतो. हे बालिश विधान आहे आणि तुम्हालाच बॉलिवूडमध्ये काम करायचंय असं यावरून दिसतं," असं अतुल मोहन म्हणतात.

साउथचे चित्रपट आणि तिथल्या कलाकारांचं स्टारडम जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार ज्योती वेंकटेशही महेश बाबूचं विधान बालिश असल्याचं मानतात. ते म्हणतात, "महेश बाबूला बॉलिवूडमधून कोणतीही ऑफर नसावी. तो केवळ तेलुगू इंडस्ट्रीतच चालतो, तमीळमध्येही नाही. त्याचं स्टारडम आता तितकंस राहिलं नाहीये."

पण एकूणच साउथ इंडियन कलाकारांची अशी विधानं ही प्रसिद्धीच्या बहाण्यानं पॅन इंडिया मार्केटमध्ये आपलं स्थान अधिक बळकट करण्यासाठीची मार्केटिंग स्ट्रॅटजी तर नाही ना असा प्रश्नही पडतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)