You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुजरात मुंद्रा पोर्ट कोकेन ड्रग्ज : मीठ असल्याचं सांगत आणलेलं 500 कोटींचं ड्रग्ज जप्त
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. मीठ असल्याचं सांगत आणलेलं 500 कोटींचं कोकेन मुंद्रा पोर्टवर जप्त
मीठ असल्याचं सांगत इराणमधून गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आणलेलं 500 कोटींचं कोकेन ड्रग्ज महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) जप्त केलं आहे.
हे कोकेन सुमारे 52 किलो इतकं असून त्याची किंमत जवळपास 500 कोटी इतकी आहे.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मालवाहू जहाजावरून कोकेन जप्त करण्यात आले त्यात 25 मेट्रिक टनाच्या 1 हजार मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. मात्र, DRIने 24 ते 26 मे या कालावधीत केलेल्या तपासणीत मालवाहू जहाजात 52 किलो कोकेन सापडलं.
दरम्यान, 2021-22 या वर्षात DRI ने देशभरात कारवाई करत सुमारे 321 किलो कोकेन जप्त केले होते. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3 हजार 200 कोटी रुपये होती. ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. महाविकास आघाडीने छत्रपतींना मान खाली घालायला लावू नये - पंकजा मुंडे
महाविकास आघाडीने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवावं, त्यांना मान खाली घालायला लावू नये, असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरला. तत्पूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीराजेंसाठी महाविकास आघाडीला आवाहन केलं आहे.
संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यासाठी महाविकास आघाडी आपल्याला मदत करेल, असा विश्वास त्यांना होता. पण शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं ठरवण्यात आल्याने त्यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला वरील आवाहन केलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने केली.
3. सुरुवात तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते - दीपाली सय्यद
सुरुवात तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते, हे विसरलात का, अशा शब्दांत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने काल (गुरुवार) दिवसभर सुमारे 13 तास मंत्री अनिल परब यांची चौकशी केली. या प्रकरणावरून सय्यद यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सत्ता मिळत नाही, मग घरगडी कामाला लावला का? तुमचा पहाटेचा टाईम फ्लॉप होतो, हे विसरले का, असा प्रश्न सय्यद यांनी ट्विटरवर केला.
त्या पुढे म्हणाल्या, मीरा भाईंदरच्या फरार आमदाराकडे कोट्यवधी रुपये सापडले तेव्हा तिथली वाट ED ने विसरली का? सुरुवात तुमची जरी असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते, हे विसरलात का, असा सवाल सय्यद यांनी केला आहे. ही बातमी लोकमतने दिली.
4. वेश्याव्यवसाय हादेखील व्यवसायच, पोलिसांनी कारवाई करू नये - सुप्रीम कोर्ट
वेश्याव्यवसाय हासुद्धा एक व्यवसाय आहे. त्यामुळे समाजाने विशेषतः पोलिसांनी या व्यवसायातील लोकांप्रति संवेदनशील राहण्याची गरज आहे, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे.
कोरोना साथीदरम्यान सेक्स वर्कर्सना येणाऱ्या समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काल (गुरुवारी) सुनावणी झाली.
यावेळी निर्णय देताना न्यायालयाने म्हटलं, "सेक्स वर्कर्ससुद्धा कायद्याने सन्मान आणि संरक्षण मिळण्यास पात्र आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित पोलिसांनी सेक्स वर्कर्सच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करू नये. सहमतीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या प्रौढ पुरुष आणि महिलांवर फौजदारी कारवाई करू नये," असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
5. कोरोना वाढतोय, मास्क वापरा; उद्धव ठाकरेंचं आवाहन
"कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे," असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं आहे.
"रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)