You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL सट्टा: पोस्टात जमा झालेले कोट्यवधी रुपये पोस्ट मास्तरने सट्ट्यात उधळले
- Author, शुरैह नियाझी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भोपाळमधून
मध्य प्रदेशात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. इथल्या बिना शहरातल्या वर्षा सोळंकी दररोज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या नावावर पोस्टात ठेवण्यात आलेले साडेसहा लाख रुपये पोस्ट मास्तर विशाल अहिरवार यांनी मटक्यात उधळले आहेत.
असा अनुभव आलेल्या वर्षा सोळंकी एकमेव व्यक्ती नाहीत. पोलिसांच्या अंदाजानुसार एक कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मटक्यात उधळल्याची शक्यता आहे. पोलिसांनी पोस्ट मास्तर विशाल अहिरवार यांना अटक केली आहे. पोस्टात जमा झालेले पैसे विशाल यांनी आयपीएलच्या मटक्यात लावले होते.
वर्षा सांगतात, "माझे यजमान गेल्या वर्षी कोरोनामुळे वारले. त्यानंतर नातेवाईकांनी साडेसहा लाख रुपयांची पोस्टात एफडी केली होती. हे प्रकरण समोर आल्यावर आम्हीही पोस्टात धाव घेतली तेव्हा आम्हाला देण्यात आलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं."
वर्षा यांना 5 आणि 10 वर्षांची दोन मुलं आहेत. त्या म्हणाल्या, "घराच्या भाड्यातून माझा चरितार्थ चालतो. ही रक्कम मुलांच्या भविष्यासाठी ठेवण्यात आली होती. मात्र या माणसानं (विशाल) चुकीच्या पद्धतीने पैसे काढून आमच्यासमोर संकट उभं केलंय."
ज्या ज्या अधिकाऱ्यांना वर्षा भेटत आहेत ते सर्व अधिकारी वर्षा यांच्यासमोर सहानुभूती व्यक्त करतात पण पैसे परत मिळणार याचं उत्तर काही त्यांना मिळत नाहीये.
पतीच्या मृत्यूनंतर हे पैसे त्यांच्यासाठी मोठ्या आधारासारखे होते पण आता काय करायचं हे त्यांच्या लक्षात येत नाहीये.
असाच अनुभव किशोरीबाईंनाही आला आहे. किशोरीबाईंच्या चार मुली आहेत. या मुलींच्या लग्नासाठी त्यांनी 5 लाख रुपये पोस्टात जमा केले होते. त्यांच्याही डोळ्यातल्या पाण्याला खळ नाही. पैसे कसे आणि कधी मिळणार हे त्यांना समजत नाहीये.
किशोरीबाई सांगतात, "आम्हाला देण्यात आलेली कागदपत्रे खोटी असल्याचा फोन आला. पोस्टात गेल्यावर आमचे पैसे हडपल्याचं समजलं, आता ते कसे मिळणार हे कळत नाहीये."
पुढचा विचार करुन लोकांनी हे पैसे पोस्टात जमा केले होते. सरकारी पोस्टात जमा झालेले पैसे काहीही झाले तरी सुरक्षित राहातील असं त्यांना वाटत होतं. पण पोस्टात पैसे जमा करणं त्यांच्यासाठी कठीण गोष्ट झालीय.
त्यांना पोस्टात मिळालेलं पासबूक खोटं असल्याचं सांगितलं जातंय ही एक मोठी गोष्ट आहे. त्यांनी भरलेली रक्कम पोस्टात जमाच होत नव्हती. त्यांना खोटी पावती दिली जात होती.
याबाबत बोलताना भोपाळ रेल्वे पोलीस अधीक्षक हितेश चौधरी म्हणाले, "आतापर्यंत 15 लोक समोर आले असून त्यांच्याद्वारे जवळपास 1 कोटी रुपये पोस्टात जमा करण्यात आले होते."
ते म्हणाले, "आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हे पैसे आयपीएलच्या सट्ट्यात उडवल्याचं आरोपीचं म्हणणं आहे. पण प्रकरणाची तड लागण्यासाठी आम्हाला काही तांत्रिक मदतीची गरज लागेल, त्यामुळे हे पैसे तिथंच उडवलेत की बाहेर हे समजू शकेल."
या प्रकरणातले तक्रारदार सुरुवातीला हितेश चौधरींकडेच आले. पैसे जमा करूनही ते खात्यात दिसत नाहीत अशी ते तक्रार करत होते, त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.
विशाल अहिरवार यांनी एकट्याने हे केलंय की त्यांच्याबरोबर इतरही लोक होते याचा तपास सुरू आहे.
ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी जेणेकरुन आपल्या बाबतीतही असं घडलंय का हे लोकांनी तपासावं अशी पोलिसांची अपेक्षा आहे.
बिनाजवळ खिमलासा पोस्ट ऑफिसातही जवळपास 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याचं सांगितलं जात आहे. विशाल अहिरवार खिमलासा पोस्टांतर्गत येतात. मात्र या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही. खिमलासा बिनापासून 19 किमी अंतरावर आहे.
खिमलासाचे राजेश बाथरी सांगतात, "पैसे सुरक्षित राहातील म्हणून लोकांनी पोस्टात पैसे ठेवलेले. परंतु आताच्या घटनेवरुन तिथंही पैसे सुरक्षित राहातील असं दिसत नाही. आता लोकांनी पैसे ठेवायचे तरी कुठं?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)