You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवताय, जाणून घ्या त्यातले धोके आणि जोखीम कशी कमी करायची?
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
रुपेश फिरोदिया पुण्यात रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतात. पण, त्यांच्यासाठी हा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत करायचा नियमित उद्योग. एरवी त्यांना बघितलंत तर ते एकाचवेळी कॉम्प्युटर आणि आपल्या दोन मोबाईलच्या स्क्रीनवर काहीतरी बघत असतात किंवा गणितं करत असतात. अगदी रिअल इस्टेटचं काम करतानाही त्यांची एक नजर मोबाईलवर असते.
मोबाईलवर ते 24 तास सुरू असलेल्या क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) बाजारातले चढ उतार बघत असतात. कारण, मागची सहा वर्षं ते नियमितपणे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यातून नफा कमावण्यातही ते यशस्वी झाले आहेत. आज 28व्या वर्षी त्यांनी पुण्यात कात्रज भागात मोठा बंगलाही बांधायला घेतलाय.
सध्या 46 बिटकॉईनचे (सगळ्यांत जास्त प्रचलित आभासी चलन) मालक असलेले रुपेश क्रिप्टोमधल्या गुंतवणुकीचे फायदे आणि त्यातले खाचखळगे याविषयी भरभरून बोलतात, अगदी हातचं न राखता.
फक्त रुपेशच नाही तर पंचवीस आणि तिशीत असलेले कित्येक भारतीय तरुण सध्या क्रिप्टो करन्सी या तुलनेनं नव्या गुंतवणुकीच्या साधनावर (असेट क्लास) लक्ष ठेवून आहेत. जगभरात 200 देशांमध्ये क्रिप्टोची एक्सचेंज आहेत आणि तिथे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. पण, जगात सर्वाधिक म्हणजे 10 कोटी 7 लाख क्रिप्टो गुंतवणूकदार एकट्या भारतात आहेत.
- बिटकॉईनच्या जन्माची गूढ, रंजक गोष्ट - ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
खरंतर भारतात क्रिप्टोमधले व्यवहार कायदेशीर आहेत की नाही, याविषयी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणात स्पष्टता नाही. क्रिप्टो बाजार हा प्रचंड चढ उतारांचा आहे. आताच बघा ना! रशिया-युक्रेन युद्ध आणि एकूणच जगातील नकारात्मक आर्थिक वातावरणात मे महिन्याच्या आठ तारखेला बिटकॉईन हे प्रमुख आभासी चलनाचं मूल्य 10 महिन्यात पहिल्यांदा 30,000 अमेरिकन डॉलरच्या खाली आलं.
तेच मागच्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात बिटकॉईन 64,000 अमेरिकन डॉलर पर्यंत चढला होता. म्हणजे एका वर्षाच्या आतच या आभासी चलनाचं मूल्य तब्बल 50 टक्क्यांहून खाली आलं. ल्युना या आणखी एका चलनाचं मूल्यतर शून्याच्या जवळ पास पोहोचलं. जे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत 9000 डॉलरवर होतं. एका महिन्याच्या आत 9000 डॉलरचं नुकसान!
त्याचवेळी पुणे पोलिसांनी शहरात बनावट क्रिप्टो एक्सचेंज चालवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या एक्सचेंजमध्ये पुणेकरांची करोडो रुपयांची गुंतवणूक होती. सांगण्याचा मुद्दा हा की, मोठ्या चढ उतारांबरोबरच बनावट क्रिप्टोचा धोकाही देशात घोंघावतोय. पण, जगभरातलं वातावरण पाहता क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीचा तरुणांचा उत्साहही कमी होणारा नाही.
म्हणूनच क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीचा अभ्यास असलेले रुपेश, भारतातलं एक आघाडीचं क्रिप्टो एक्सचेंज बिटबिएनएस चालवणारे गौरव डहाके आणि गुंतवणुकीच्या साधनांचा चांगला अभ्यास असलेले सीए पंकज मंढाने यांच्याकडून जाणून घेऊया क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीतले धोके आणि जोखीम कशी कमी करायची….
त्यापूर्वी क्रिप्टोची भुरळ खासकरून तरुणांना का पडते हे ही समजून घेतलं पाहिजे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे फायदे
दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा
तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचा हेतू दीर्घ मुदतीत चांगला लाभ मिळवून देणं हाच होता. चढ-उतार होत राहतात. पण, तीन वर्षं किंवा त्याहून जास्त वाट बघण्याची तयारी असेल तर या अॅसेट क्लासने सोनं, रिअल इस्टेट, शेअर बाजार यापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे.
Bitdroplet.com या साईटवर दिलेल्या माहितीनुसार, सोन्याने मागच्या तीन वर्षांत उणे सात टक्के परतावा दिलाय, शेअर बाजार, म्युच्युअल फंडांनी 8 ते 12 टक्के. याउलट बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीने गुंतवणूकदारांना 80% च्या आसपास परतावा दिला आहे.
म्हणूनच बिटबीएनएस या देशातील आघाडीच्या क्रिप्टो एक्सचेंजचे संस्थापक आणि सीईओ गौरव डहाके म्हणतात, "क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करू नका. गुंतवणूक करा!"
"शेअर बाजारातही, जगभरातल्या फक्त 2% गुंतवणूकदारांना अल्प मुदतीत (ट्रेडिंग) नफा झालाय. बाकीच्यांना तोटाच सहन करावा लागला आहे. पण, क्रिप्टो ही तंत्रज्ञानावर आधारित चलन व्यवस्था आहे. नवं आणि आधुनिक तंत्रज्ञान नेहमीच विकासाकडे नेतं. तसंच क्रिप्टोमध्ये सुरुवातीच्या काळात केलेली दीर्घ गुंतवणूक लाभदायक ठरू शकते," गौरव यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला.
तुमच्या पैशावर तुमचा हक्क -
संपूर्ण आर्थिक स्वायत्तता हा क्रिप्टो करन्सीचा मूलमंत्र आहे. तुमच्या मालकीचे क्रिप्टो आणि तुम्ही क्रिप्टोमध्ये करत असलेले व्यवहार यावर सरकार, सरकारी बँक किंवा कुठल्याही एका संस्थेचं नियंत्रण नसतं. क्रिप्टो एक्सचेंज हे व्यवहारांचं माध्यम असतं तरी तुमचे व्यवहार पूर्णपणे गुप्त राहतात.
सीमांचं बंधन नाही -
व्यावहारिकदृष्ट्या क्रिप्टोचा हा सगळ्यांत मोठा फायदा असल्याचं गौरव डहाके मानतात. कारण, एरवी तुम्ही कुठल्याही देशात गेलात तर तिथल्या चलनात तुम्हाला व्यवहार करावे लागतात. पण, क्रिप्टो जगातल्या अनेक देशांमध्ये मान्यता मिळालेलं चलन आहे.
अनेक देशांमध्ये ते स्वीकारलं जातं. सोन्याचं मूल्य असेट क्लास म्हणून कुठल्याही देशात असतंच. फार तर किंमत कमी-जास्त होते. तसंच क्रिप्टोचं आहे. शिवाय जगभरात कुठेही तुम्ही क्रिप्टो विकत घेऊ शकता किंवा विकू शकता. भारतात बसून कुठल्याही देशातले क्रिप्टो व्यवहार करू शकता. त्यामुळे चलनाचा डिजिटल आणि सुटसुटीत प्रकार म्हणून क्रिप्टोकडे बघितलं जातं. आणि गुंतवणूकदारांची संख्या वाढतेय तसा क्रिप्टोचा वापरही वाढत जाणार आहे.
24 तास सुरू असलेला क्रिप्टो बाजार -
रुपेश फिरोदिया यांच्या सारख्या तरुणांना विचारलंत तर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचं सर्वांत मोठं कारण, 24 तास सुरू असलेलं एक्सचेंज हेच आहे. आणि इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलवर खरेदी-विक्री करता येणं तसंच बाजारावर लक्ष ठेवता येणं यामुळे ते या अॅसेट क्लासकडे ओढले गेलेत.
पण, त्याचबरोबर क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीचे काही धोकेही आहेत. आणि सगळ्यांत मोठा धोका आहे गुंतवणुकीतली जोखीम.
क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीचे धोके
चढ उतारांमुळे वाढणारी जोखीम कशी कमी कराल?
नोव्हेंबर 2021मध्ये 64,000 अमेरिकन डॉलरचा उच्चांक गाठलेला बिटकॉईन सध्या जेमतेम 30,000 डॉलरवर आलाय. 2021 मधल्या त्याच्या घोडदौडीमुळेच 30,000 ची पातळी या चलनासाठी बेंचमार्क म्हणजे मापदंड धरली जाते. आणि सध्या तो याच पातळीच्या जवळपास घुटमळतोय.
विशेष म्हणजे बिटकॉईनमध्ये झालेली ही घसरण काही आठवड्यातली आहे. एकेका दिवसाला वीस-वीस टक्क्यांची घसरण झालेली उदाहरणंही इतिहासात आहेत. अशावेळी नोव्हेंबर 2021 नंतर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या घडीला जबर नुकसान झालेलं असणार हे उघड आहे. फक्त बिटकॉईनच नाही तर इथेरियम, ल्युना डिजीकॉईन अशा सगळ्याच क्रिप्टोंना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे.
पण, आपल्या तीनही गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते मोठे चढउतार हे क्रिप्टोचा स्थायीभाव आहे हे समजूनच या गुंतवणुकीत उतरलं पाहिजे. रुपेश फिरोदिया यांनी अगदी सुरुवातीच्याच काळात याचा अनुभव घेतला आहे.
2016मध्ये आपल्या मावसभावाच्या सांगण्यावरून त्यांनी वडिलांचे बचतीचे पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले. आणि ते पूर्णपणे बुडाले.
"मी पहिला धडा शिकलो. बचतीचे पैसे कधीच क्रिप्टोमध्ये गुंतवायचे नाहीत. आपला घरखर्च आणि कुटुंबासाठीची बचत यांचा विचार केल्यानंतर उरलेली रक्कमच क्रिप्टोमध्ये गुंतवायची. त्यानंतर मी इतर कामं करून आधी वडिलांचं नुकसान भरून काढलं. आणि मग या मधल्या काळात क्रिप्टोचे दर का, कधी कमी जास्त होतात, त्यांचं वागणं नेमकं कसं आहे याचा अभ्यास करून 2018मध्ये पुन्हा गुंतवणूक सुरू केली. तिथून मला पुढच्या दोन-तीन वर्षांत चांगला परतावा मिळायला सुरुवात झाली."
अतिरिक्त पैसाच गुंतवा या वाक्याला इतर दोन तज्ज्ञ गौरव डहाके आणि सीए पंकज मंढाने यांनीही दुजोरा दिला.
गौरव डहाकेंनी यात आणखी एक मुद्दा जोडला.
"सगळे पैसे एकगठ्ठा क्रिप्टोमध्ये टाकू नका. एकतर सोनं, रिअल इस्टेट, मुदतठेवी यांच्या बरोबरीने आणखी एक अॅसेट क्लास म्हणून क्रिप्टोकडे बघा. आणि जे पैसे क्रिप्टोसाठी वेगळे काढाल, ते ही एकत्र गुंतवू नका. ठराविक अंतराने पैसे टाकलेत तर तुमची खरेदीची किंमत कमी होऊन जास्त नफा कमावण्याची संधी मिळते," डहाके यांनी सांगितलं.
त्याचबरोबर बिटबीएनएस हे खाजगी एक्सचेंज सुरू करताना त्यांनी गुंतवणूकदारांना क्रिप्टोमध्ये म्युच्युअल फंडासारख्या एसआयपी (SIP - systematic investment plan) योजनाही उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय तुम्ही मुदतठेवी सारखे ठरावीक पैसे एक्सचेंजवरील योजनेत गुंतवायचे. आणि त्यावर त्यांची कंपनी तुम्हाला किमान 15 टक्के आधी ठरलेला परतावा देणार अशाही योजना त्यांच्या एक्सचेंजने सुरू केल्या आहेत.
सांगण्याचं तात्पर्य हे की, बिटबीएनएस काय किंवा इतर भारतीय एक्सचेंजमध्येही अशा गुंतवणूक सुविधांचा लाभ घेऊन महागाई दर आणि इतर असेट क्लासपेक्षा जास्त परतावा तुम्ही मिळवू शकता.
थोडक्यात जोखीम टाळण्यासाठी,
- एकगठ्ठा पैसे गुंतवू नका, टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करा.
- फक्त अतिरिक्त पैसाच गुंतवा.
- सगळ्या अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक असावी.
- क्रिप्टोमध्येही एसआयपी करा.
सरकारी नियंत्रणाचा अभाव
क्रिप्टोकडे तंत्रज्ञान म्हणून पाहिलंत तर नियंत्रणाचा किंवा कुठल्याही मध्यस्थाचा अभाव ही चांगलीच गोष्ट मानली पाहिजे. कारण, रशिया-युक्रेन युद्धाचं उदाहरण घ्या. रशियावर निर्बंध लादताना, अनेक देशांनी त्यांच्याबरोबरचे व्यवहार कमी केले आहेत. पण, याचा फटका दोन देशांमध्ये असलेल्या लोकांना बसतोय. म्हणजे बँका, व्हिसा-मास्टरकार्ड अशा कंपन्यांनी व्यवहार बंद केले आहेत, रुबेलला आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धामुळे उठाव नाही. हे सगळं होतं सरकारी नियंत्रणामुळे. पण, तोटा होतो जनतेचा. आणि रशियन जनतेबरोबर व्यवहार करू इच्छिणाऱ्या परदेशी लोकांचा. क्रिप्टोच्या व्यवहारांवर असं कुठलंही बंधन नाही.
युद्ध किंवा आणखी कुठल्याही परिस्थितीत देश सोडावा लागलेल्या लोकांनाही त्यांच्याकडे असलेल्या क्रि्प्टो करन्सीचा आधार वाटू शकतो. व्हिएतनाम देश जेव्हा दिवाळखोरीत निघाला तेव्हा देशातल्या देशातच त्यांच्या चलनाला मागणी नव्हती. पण, क्रिप्टोकरन्सीला होती. हे ठळक उदाहरण नेहमीच क्रिप्टोच्या समर्थनार्थ दिलं जातं.
पण, त्याचवेळी सरकार किंवा सरकारी संस्थेच्या नियंत्रणामुळे क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना संरक्षण मिळत असतं. ग्राहकाचं हित आणि संरक्षण सरकारच्या हातात असतं.
चीनचं उदाहरण घ्या. 2021मध्ये अचानक चीनच्या कम्युनिस्ट सरकारने देशात क्रिप्टोचा वापर बेकायदेशीर ठरवला. आणि देशाच्या अधिकृत ई-चलनाची मात्र घोषणा केली. पण, त्यामुळे ज्या चायनीज लोकांकडे आधीपासून बिटकॉईन होते त्यांचं नुकसान झालं.
या अशा अस्थिर सरकारी धोरणांचा धोका नेहमीच क्रिप्टो चलनांसमोर असतो. भारतातही केंद्रसरकारचं धोरण स्पष्ट नाही. त्याबद्दल स्पष्ट शब्दात टिप्पण्णी करण्याऐवजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2022च्या अर्थसंकल्पात क्रिप्टोमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर मात्र लावला.
पण, सरकारने लावलेल्या कराकडे उलट गौरव डहाके सकारात्मकपणे पाहतात. त्यांच्या मते कर लावलाय याचाच अर्थ सरकारने क्रिप्टोमध्ये लोकांच्या गुंतवणुकीचं भान ठेवलं आहे. आणि हे चलन कायदेशीर करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढेच टाकलं आहे.
"एक्सचेंज निर्माते म्हणून आमच्या सरकारबरोबर बैठका होतात. त्यात कधीही क्रिप्टो बेकायदेशीर करण्याबद्दल सरकारने सुतोवाच केलेलं नाही. आणि तसं समजा झालंच तर लोकांना आधी त्यांची गुंतवणूक काढून घेण्याची संधी दिली जाईल. उलट सरकार स्वत:चा ई-रुपी बाजारात आणण्याचा विचार करतंय हे सकारात्मक पाऊल आहे. याचा अर्थ सरकारचा ब्लॉकचेन आणि अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे."
तर सीए पंकज मंढाने यांनी क्रिप्टोवर सरकारी नियंत्रण नसल्यामुळे निर्माण झालेला एक प्रमुख धोका सांगितला. ते स्वत: पुणेकर आहेत. आणि पुण्यात काही महिन्यांपूर्वी बनावट क्रिप्टो एक्सचेंज काढून पुणेकरांना करोडो रुपयांना गंडा घातल्याची केस गाजते आहे.
अशा एक्सचेंजपासून सावध राहण्याचा इशारा मंढाने यांनी दिला आहे.
"गुंतवणूक करताना त्याविषयी आधी माहिती करून घेणं आवश्यक असतं. तंत्रज्ञानाचा संपूर्ण अभ्यास नको. पण, निदान त्याचं स्वरूप माहिती करावं. तुम्ही कंपनीची शहानिशा न करता एकदा भेटलेल्या माणसाला पैशाचा धनादेश दिला. आणि त्याने तुमचे पैसे क्रिप्टोमध्ये गुंतवतो असं सांगून भलत्याच ठिकाणी गुंतवले, अशा घटना घडल्या आहेत. अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. जिथं खातं उघडाल त्याची नीट माहिती करून घ्या. भारतातही आता एक्सचेंजची मजबूत फळी उभी राहिली आहे. त्यांची विश्वासार्हता तपासूनच गुंतवणूक करा." मंढाने यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला.
थोडक्यात, क्रिप्टो करन्सी ही सरकार नियंत्रणाच्या बाबतीत दुधारी तलवार आहे.
पण -
- भारतात ती बेकायदेशीर ठरवली जाण्याची शक्यता कमी आहे.
- बेकायदेशीर ठरली तरी गुंतवणूकदारांना बाहेर पडायला वेळ मिळेल.
- मात्र पैसे डोळसपणे गुंतवा.
- एक्सचेंज किंवा क्रिप्टो योजनेला भुलू नका.
- अनेकदा व्हाट्सअॅप किंवा टेलिग्रामवर आलेल्या संदेशाच्या आधारावर गुंतवणूक केली जाते, ती चुकीची आहे.
हॅकिंगचा धोका
तुम्ही विकत घेत असलेलं क्रिप्टो चलन एकतर तुमच्या एक्सचेंजमध्ये असलेल्या खात्यात साठवलं जातं. नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या वॉलेट्समध्ये साठवलं जातं. यापूर्वी असे वॉलेट्स हॅक झाल्याचे प्रसंग झाले आहेत. किंवा वॉलेटचा पासवर्ड जरी हरवला तरी तुमच्याच खात्याशी तुमचा संपर्क तुटतो. अशाही घटना घडल्या आहेत.
भारतीय एक्सचेंज पुरेशी सुरक्षित असल्याचा दावा गौरव डहाके यांनी केला आहे. तर रुपेश फिरोदिया यांनी क्रिप्टो कुठूनही विकत घेतले तरी ते साठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वॉलेट्स सुरक्षित असल्याचे अनुभवाचे बोल सांगितले आहेत.
पण, गुंतवणूकदारांसाठी ऑनलाईन खातं हॅक होण्याचा धोका उरतोच. त्याची शक्यता गृहित धरून त्यांनी नियोजन करावं.
नवा आणि फारसा इतिहास नसलेला अॅसेट क्लास
विचार करा, 2000 साली दहा ग्रॅम सोन्याची किंमत 4,400 रुपये इतकी होती. आज ती अंदाजे 51 हजार रुपये इतकी आहे.
एका अमेरिकन डॉलरचं मूल्य 2000 साली साधारणपणे 44 रुपये होतं. तेच 2022मध्ये 78 रुपयांवर पोहोचलंय.
सोनं आणि अमेरिकन डॉलर हे जगातले सगळ्यांत स्थिर आणि म्हणून कायम यांचा आलेख चढता असतो, म्हणून ही तुलना केली.
पण, सांगण्याचा मुद्दा हा की, सोनं आणि डॉलरला मोठा इतिहास आहे. आणि इतक्या वर्षात सगळ्या प्रकारच्या आर्थिक-सामाजित स्थित्यंतरातून गेल्यावर त्यांचं मूल्य गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित मानलं गेलं आहे.
क्रिप्टोला मात्र जेमतेम 13 वर्षांचा इतिहास आहे. आणि त्यातही गुंतवणूक म्हणून त्याकडे अगदी अलीकडे बघितलं जातंय.
ही गोष्ट आपल्या नेमकी फायद्याची आहे की तोट्याची?
क्रिप्टोकडे तंत्रज्ञान म्हणून बघणारे आणि स्वत: आयआयटी खरगपूरचे बीटेक असलेले गौरव डहाके यांना ही गोष्ट फायद्याची वाटते. ब्लॉकचेन हे सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञान असल्याचं ते मानतात. आणि क्रिप्टो करन्सीची व्याख्या "आर्थिक संवाद, संपर्काचं साधन" अशी करतात.
"या तंत्रज्ञानाची तुलना तुम्ही अँपल फोन, थ्रीजी, फोरजी अशा गोष्टींशी करा. हे तंत्रज्ञान प्रगत आहे. येणाऱ्या काळात त्याचा उपयोग वाढेल तसं ते आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. आणि त्याची व्यापकता वाढेल. उलट आता वेळ आहे सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करून येणाऱ्या काळात त्याचा नफा मिळवण्याची." डहाके यांनी आपला मुद्दा मांडला.
क्रिप्टोकरन्सीतली गुंतवणूक ही तंत्रज्ञानातली गुंतवणूक असल्याचं ते मानतात. आणि हे तंत्रज्ञान जगाला पुढे घेऊन जाणारं आहे यावर त्यांचा विश्वास आहे.
- NFT म्हणजे नेमकं काय?ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
दुसरीकडे पुरेशा माहितीअभावी अभ्यासपूर्ण गुंतवणुकीला मर्यादा आल्याचा धोका पंकज मंढाने व्यक्त करतात.
"शेअर बाजारात पैसे गुंतवताना आपण कंपनीचा आणि कंपनीच्या मागच्या काही वर्षातील कामगिरीचा अभ्यास करतो. पण, तशी साधनं क्रिप्टोसाठी उपलब्ध नाहीत. म्हणूनच लोकांनी सावध राहिलं पाहिजे," पंकज मंढाने म्हणाले.
तर रुपेश फिरोदिया यांनी हे माध्यम नवीन असल्यामुळे तसंच नवीन क्रिप्टो सतत बाजारात येत असल्यामुळे काही कालावधीत नफा घेऊन बाहेर पडण्याचा उपाय सुचवला आहे. निदान काही रक्कम तरी ठरावीक कालावधीने काढून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नवीन क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जिथं जास्त गुंतवणूकदार आहेत, तिथेच गुंतवणुकीचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
असं म्हणतात, जिथे जास्त परतावा तिथं जोखीमही तितकीच जास्त. क्रिप्टो करन्सीमधल्या गुंतवणुकीलाही हेच तत्त्व शब्दश: लागू पडतं. गुंतवणूक जोखमीची नक्की आहे. पण, तरीही जास्तीत जास्त तरुण तिच्याकडे वळत आहेत.
म्हणूनच जेमिनी या जागतिक एक्सचेंजने केलेल्या सर्वेक्षणात 54% भारतीय तरुणांनी (सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी) 2021 मध्ये नव्याने क्रिप्टो ट्रेडिंग खातं उघडल्याचं सांगितलं. तर 46% भारतीयांनी 2022 मध्ये क्रिप्टोत गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. शेवटी भारत हा तरुणांचा देश आहे. आणि क्रिप्टो हा नवा अॅसेट क्लास त्यांच्यासाठीच आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)