जवाहरलाल नेहरू: धर्मनिरपेक्षतेपासून धार्मिकतेपर्यंत पोहोचलेल्या पंतप्रधानांची गोष्ट

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधींना 1933 साली लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं होतं की, "वय वाढत गेलं तशी माझी धर्माशी जवळीक कमी होत गेली."

1936 मध्ये नेहरुंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "धर्माच्या सामूहिक जाणीवेबद्दल मला कायमच धास्ती वाटत आली आहे. जिथे तर्क आणि विवेकाला स्थान नाही, अशा अंधश्रद्धा, परंपरावाद, रुढीप्रियता आणि शोषणाबद्दल मी बोलत आहे."

लोकशाहीत धर्माचं स्थान काय असावं याबद्दलच्या नेहरुंच्या विचारसरणीची पहिली परीक्षा 1950 मध्ये झाली. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूच्या इच्छेविरुद्ध गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमात जाण्याचा निर्णय घेतला. दहाव्या शतकात महमूद गजनवीने हे मंदिर लुटून उद्धवस्त केलं होतं.

नेहरूंच्या मते एका धर्मनिरपेक्ष देशाच्या राष्ट्रपतीने अशाप्रकारे धर्माशी संबंधित असलेल्या गोष्टींशी स्वतःला जोडून घ्यायला नको. पण राजेंद्र प्रसाद नेहरूंच्या या भूमिकेशी सहमत नव्हते.

राजेंद्र प्रसाद यांनी नेहरुंच्या आक्षेपाला उत्तर देताना म्हटलं होतं, की माझा माझ्या धर्मावर विश्वास आहे आणि मी स्वत:ला त्यापासून वेगळं करू शकत नाही. प्रसिद्ध पत्रकार दुर्गा दास यांनी आपल्या 'इंडिया फ्रॉम कर्झन टू नेहरू अँड आफ्टर' या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

कुंभ स्नानाला नेहरूंचा नकार

1952 मध्येही पंडीत नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्या परस्पर विरोधी विचारांची झलक पाहायला मिळाली होती. राजेंद्र प्रसाद यांनी काशीमध्ये काही पंडितांचे पाय धुतले होते.

हे समजल्यानंतर नेहरूंनी नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिलं. या पत्राला प्रसाद यांनीही उत्तर दिले. त्यांनी म्हटलं, "देशातील सर्वांत मोठ्या पदावरील व्यक्तीही एखाद्या विद्वानाच्या समोर लहानच असते."

या वादानंतर नेहरूंचा कल तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबाजूने झुकायला लागला. लालबहादूर शास्त्री यांचे सचिव सी.पी. श्रीवास्तव यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं, "शास्त्रींनी एकदा नेहरूंना कुंभमेळ्यात स्नान करण्याचा सल्ला दिला. यावर उत्तर देताना नेहरूंनी म्हटलं होतं की, मला गंगा नदी खूप प्रिय आहे. मी अनेकवेळेला गंगेत डुबकी मारली आहे. पण कुंभमेळ्यात जाऊन मी असं काही करणार नाही."

शास्त्रींची गोळवलकर गुरूजींसोबत चर्चा

लाल बहादुर शास्त्रींचे विचार नेहरूंपेक्षा वेगळे होते. त्यांना आपली 'हिंदू' ही ओळख दाखविण्याबद्दल काही वावडं नव्हतं. पण भारताच्या धार्मिक एकतेविषयी त्यांना शंकाही नव्हती.

1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धावेळी आपल्या पक्षाच्या विचारसरणीपलीकडे जाऊन त्यांनी आरएसएसचे त्यावेळचे प्रमुख गोळवलकर गुरूजींचा सल्ला घेतला होता. इतकंच नाही तर शास्त्री यांच्या पुढाकाराने त्यावेळी दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेच्या संचलनाची जबाबदारीही आरएसएसकडे सोपवण्यात आली.

लालकृष्ण अडवाणींनी आपल्या 'माय कंट्री माय लाईफ' या आत्मचरित्रात लिहिलंय, 'नेहरूंप्रमाणे शास्त्री यांनी जनसंघ आणि आरएसएसविषयी कोणताही आकस बाळगला नाही.'

इंदिरा गांधींची धर्मनिरपेक्ष प्रतिमा

इंदिरा गांधी जेव्हा सत्तेत आल्या तेव्हा त्या टोकाच्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या होत्या. त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकळात पंतप्रधानपदाची शपथ ईश्वराच्या नावाने न घेता सत्यनिष्ठेच्या नावावर घेतली होती.

पण 1967 मध्ये जेव्हा हजारो गोरक्षक आंदोलकांनी संसद भवनाला घेराव घातला, तेव्हा त्यांच्यासमोर आव्हान उभं राहिलं.

त्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला, पण इंदिरा गांधींनी साधुंची मागणी पूर्ण केली नाही. शिवाय आंदोलनाला सर्मथन देणारे मंत्री गुलजारी लाल नंदा यांना मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी त्यांनी या घटनेचा वापर करून घेतला.

इंदिरा गांधी देवधर्माकडे कशा वळल्या?

1980 चे दशक येईपर्यंत इंदिरा गांधी देवधर्म आणि मंदिरांच्या बाजूकडे वळू लागल्या. 1977 मध्ये निवडणुकीतला पराभव आणि त्यांचा धाकटा मुलगा संजय गांधींचा मृत्यू या दोन घटनांनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्या विचारांमध्ये बदल करण्याचे मोठं श्रेय त्यांचे रेल्वेमंत्री कमलापती त्रिपाठी यांना जात असल्याचंही बोललं जातं.

पत्रकार कुमकुम चढ्ढा यांनी आपलं पुस्तक 'द मेरीगोल्ड स्टोरी - इंदिरा गांधी अँड अदर्स' मध्ये लिहिलं आहे, "धर्माविषयी कमलापती त्यांचे गुरू बनले. एकदा त्यांनी नवरात्रात इंदिरा गांधीना कुमारिकांचे पाय धुऊन ते पाणी प्यायला सांगितलं. त्यावेळी इंदिरा गांधी विचारात पडल्या. मी आजारी तर पडणार नाही ना, असा प्रश्नही त्यांनी विचारला. पण परदेशी शिक्षण घेतलेल्या आणि फ्रेंच भाषा बोलणाऱ्या इंदिरा गांधींनी ती प्रथा पूर्ण केली."

यादरम्यान इंदिरा गांधी दतियाच्या बगलामुखी शक्तिपीठातही गेल्या होत्या. तिथं मंदिराच्या प्रणांगणात धूमावती देवीचं मंदिर होतं. जिथे केवळ विधवा स्त्रियांनाच पूजा करण्याची परवानगी होती. पहिल्यांदा जेव्हा इंदिरा गांधी तिथं गेल्या तेव्हा पूजाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही. कारण हिंदू नसलेल्या व्यक्तींना तिथे प्रवेश नव्हता. पुजाऱ्यांच्या मते फिरोझ गांधींशी लग्न केल्यानंतर त्या हिंदू राहिल्या नव्हत्या.

कुमकुम चढ्ढा याविषयी लिहितात, "इंदिरा गांधींनी कमलापती त्रिपाठी यांना फोन करून तातडीने बोलवून घेतलं. त्रिपाठी यांना पुजाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. 'मी यांना घेऊन आलोय. तुम्ही यांना ब्राह्मण कन्या समजा,' असं त्रिपाठींनी म्हटलं. दिल्लीत असताना त्या अनेकदा श्री आद्यकात्यायिनी शक्तीपीठात जायच्या. या मंदिराला आता छतरपूर मंदिर म्हणून ओळखलं जातं.

हे मंदिर महरौली येथील त्यांच्या फार्म हाऊसपासून जवळ होतं. 1983 मध्ये इंदिरा गांधींनी हरिद्वारमध्ये भारत माता मंदिराचं उद्घाटन केलं होतं. हे मंदिर विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने स्थापन झालं होतं.

शिलान्यासमध्ये राजीव गांधींची भूमिका

इंदिरा गांधी यांचे चिरंजीव राजीव गांधी स्वत: धार्मिक विचारांचे नव्हते. पण आपल्या राजकीय सल्लागारांच्या सल्ल्यावरून त्यांनी 1989 मध्ये निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात अयोध्येतून करत रामराज्य स्थापन करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.

शाहबानो प्रकरणानंतरच्या टीकांना उत्तर म्हणून त्यांनी राम मंदिराचं भूमीपूजन केलं होतं.

राजीव गांधींचा या निवडणुकीत पराभव झाला. पण शहाबानो प्रकरणात मुस्लीम कट्टरवाद्यांचं समर्थन केल्यानंतर आपण एक 'चांगले हिंदू' असल्याचा संदेशही त्यांना द्यायचा होता.

झोया हसन आपल्या 'काँग्रेस आफ्टर इंदिरा' पुस्तकामध्ये लिहितात, 'राजीव गांधी यांचे मुख्य सल्लागार अरुण नेहरू यांनी त्यावेळी राजीव गांधींना राम मंदिराबाबत लवचिक भूमिका ठेवण्याचा सल्ला दिला होता.

त्यामुळे कट्टरतावादी मुस्लिमांचे समर्थन केल्यानंतर होणारी टीका काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असं त्यांना वाटत होतं. पण विश्व हिंदू परिषद या घटनाक्रमाकडे बाबरी मशीद विध्वंसाच्या पहिल्या पावलाच्यादृष्टीने पाहिल याचा अंदाज काँग्रेसला बांधता आला नाही.'

नरसिंह राव यांचं कुठे चुकलं?

नरसिंह राव यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात हैदराबादमध्ये निजामाविरोधात संघर्षापासून सुरु झाली होती. त्यांनी हिंदू महासभा आणि आर्य समाजासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. त्यांच्या आयुष्यात सकाळची पूजा कधी चुकली नाही.

शृंगेरीच्या शंकराचार्यांपासून ते पेजावर स्वामी यांच्यापर्यंत अनेकांशी राव यांचे घनिष्ठ संबंध होते. एन.के. शर्मासारखे ज्योतिषी आणि चंद्रास्वामी यांच्यासारख्या तांत्रिकांशीही त्यांची जवळीक होती.

बाबरी मशीद पाडण्याची घटना घडली तेव्हा नरसिंह राव पंतप्रधान होते. त्यावेळेला मुसलमान काँग्रेसची साथ सोडत आहेत यापेक्षा जास्त चिंता त्यांना हिंदूंमधील उच्च आणि मागासलेल्या जातीचे लोक भाजपकडे वळतायत याची होती. मणिशंकर अय्यर यांना त्यांनी एकदा सांगितलं होतं की, भारत हा एक हिंदू देश आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल.

सलमान खुर्शीद यांनी नरसिंह राव यांच्या आत्मचरित्राचे लेखक विनय सितापती यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं,

"राव साहेबांनी कायम एक मत तयार करण्याचा प्रयत्न केला ही शोकांतिका आहे. त्यांना कायम हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही व्होट बँकांना खूश करायचं होतं. राव यांना मशीद वाचवायची होती पण हिंदूंना दुखवायचेही नव्हते आणि स्वत:चा बचावही करायचा होता. पण ते ना मशीद वाचवू शकले ना हिंदू काँग्रेसकडे वळले आणि त्यांच्या प्रतिष्ठेलाही तडा गेला."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)