You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
परभणी: मनमिळावू होमगार्ड आणि गाण्याचा छंद असलेल्या संगीताताईंनी गाणं गातानाच घेतला जगाचा निरोप
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
ताशा, बॅंड आणि बाजाचा आवाज आसमंतात घुमत होता. त्या आवाजाला आणखी रंगत आणली ते संगीताताईंच्या सुरेल आवाजाने. खेळताना रंग बाई, होळीचा-होळीचा असं गाणं ऐन भरात आलेलं असतानाच काळाने संगीताताईंवर घाला घातला आणि त्या रंगाचा क्षणार्धात बेरंग झाला.
परभणीतील होमगार्ड आणि अत्यंत मनमिळावू, सर्वांच्या हाकेला धावणाऱ्या 48 वर्षीय संगीताताई गव्हाणे यांना गायनाचा छंद होता. एक कर्तव्यदक्ष होमगार्ड असा नावलौकिक असलेल्या संगीताताईंना गाण्याची देखील आवड होती. ज्याही कार्यक्रम समारंभात त्या जात त्यांच्या गाण्याने आनंदाचे मळे फुलून जायचे.
त्यांना समाजकार्याची आवड होती तसेच त्या लहान मुलांना गाणे आणि डान्स देखील शिकवत असत, असे त्यांचे परिचित सांगतात.
शनिवारी 20 मे चा दिवस हा खरं तर रूटीनच होता. परभणी शहरातील पाथरी रोडवरील मंगल कार्यालयात एका आप्ताच्या लग्नात संगीताताई पोहोचल्या. लग्नाच्या वरातीची वेळ आली आणि बॅंजोच्या साथीवर त्यांनी आपल्या गाण्याची ताण घेतली.
खेळताना रंग बाई होळीचा हे गाणं त्या गाऊ लागल्या आणि अचानक त्या खाली कोसळल्या. कुणाला हेच कळलं नाही की काय होत आहे. संगीताताईंना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
'सामाजिक कार्याची आवड'
परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशींनी बीबीसी मराठीला सांगितले की "संगीता गव्हाणे यांचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले."
परभणी पोलीस आणि होम गार्ड परिवारावरही शोककळा पसरली आहे.
परभणीतील वाहतूक समितीचे जिल्हा समादेशक आणि गव्हाणे कुटुंबाचे परिचित सुशिल कुमार देशमुख सांगतात की "संगीताताईंच्या जाण्याने त्यांच्याच कुटुंबावर नाही तर संपूर्ण जिल्ह्यालाच दुःख झाले आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता आणि त्या सदैव कार्यतत्पर होत्या. होमगार्डची नोकरी ही पगारासाठी कुणी करत नाही, समाजसेवेची आवड असलेल्या व्यक्तीच हे काम करतात आणि संगीताताई या देखील समाजसेवेची आणि लोकांमध्ये मिळून मिसळून राहण्याची आवड असलेल्या होत्या."
त्यांच्या या आकस्मिक निधनाने गव्हाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचबरोबर परभणी परिसरात त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका कर्तव्यदक्ष महिला होमगार्डचा अचानक मृत्यू व्हावा ही गोष्ट अनेकांना अद्यापही पटत नाहीये.
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय?
Heart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं तेव्हा शरीराकडून त्याविषयी कुठलाही संकेत मिळत नाही. याचं मुख्य कारण हृदयात होणारी इलेक्ट्रिकल गडबड आहे, जी हृद्याच्या ठोक्यांचं ताळमेळ बिघडवते.
यामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात.
अशा वेळी काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. हेच कारण आहे की, कार्डिअॅक अरेस्टमध्ये मृत्यू येण्याचा धोका कैक पटींनी वाढतो.
कार्डिअॅक अरेस्ट आल्यानंतर छातीवर इलेक्ट्रिक शॉक देऊन बंद पडलेलं हृदय सुरू करता येऊ शकतं. यासाठी डिफिब्रिलेटर नावाचं टूल वापरलं जातं. पण हे नसेल तर त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)