शम्मी कपूरचा मुलगा आदित्य राजने वडिलांच्या अफेअर्सचे गुपित केले उघड

    • Author, मधू पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

भारतीय सिनेसृष्टीत कपूर घराण्याने दिलेलं योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलंय. कपूर घराण्यात अभिनयाचा पाया रचण्याचं श्रेय जातं कपूर घराण्याचे प्रमुख, दिवंगत अभिनेते पृथ्वीराज कपूर यांना.

सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम पृथ्वीराज कपूर यांचा मोठा मुलगा राज कपूर यांनी केलं. राज कपूर यांच्या सोबतच त्यांची भावंड शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी देखील आपल्या अभिनयातून नाव कमावलं.

कपूर कुटुंबीयांची हिंदी चित्रपटसृष्टीशी असलेली नाळ पिढ्यानपिढ्या जोडली आहे. कपूर घराण्याशी संबंधित बहुतेकांनी चित्रपटातून नाव कमावलं, प्रसिद्धी मिळवली. पण प्रत्येकाच्या बाबतीत असं झालं नाही. कपूर घराण्यातील काही लोक चित्रपटात आले पण त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूर यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं.

आदित्य यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं

दिवंगत अभिनेते शम्मी कपूर आणि गीता बाली यांचा मुलगा म्हणजे आदित्य राज कपूर. बालकलाकार म्हणून त्यांनी आपली सुरुवात केली. 1963 मध्ये त्यांची आई गीता बाली यांचा 'जब से तुम्हा देखा है' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

'बॉबी' हा चित्रपट 1973 साली आला होता.

आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदित्य यांनी पहिल्यांदाच त्यांचे काका दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता राज कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

आदित्य कपूर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून 1978 मध्ये 'सत्यम शिवम सुंदरम', 1985 मध्ये 'गिरफ्तार', 1991 मध्ये 'साजन', 1993 मध्ये 'दिल तेरा आशिक', 1996 मध्ये 'पापी गुडिया' आणि 1999 मध्ये 'आरजू' चित्रपटांत काम केलं.

पुढे 2007 मध्ये त्यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून दोन इंग्रजी चित्रपट केले. त्यात 'डोन्ट स्टॉप ड्रीमिंग' आणि 'सांबर सालसा' या चित्रपटांचा समावेश होता.

अभिनेता म्हणून ही चित्रपटांमध्ये काम केलं

आदित्य कपूर यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. 2010 मध्ये जगमोहन मुंधरा यांच्या 'चेस' या चित्रपटात त्यांना महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर मुंबई 118, दिवानगी ने हद कर दी, इज लाइफ में, यमला पगला दिवाना 2, येस टू लव्ह यांसारख्या लहान-मोठ्या चित्रपटांमध्ये ते काम करत राहिले.

चित्रपटांनंतर त्यांनी टेलिव्हिजनच्या दुनियेत आपलं नशीब आजमवायचं ठरवलं. त्यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या एव्हरेस्ट या मालिकेत काम केलं.

अभिनय असो वा दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात आदित्य कपूर यांना त्यांच्या नशिबाने साथ दिली नाही. मग पुढे त्यांनी व्यवसायात आपलं नशीब आजमावायचं ठरवलं. त्यांचा ट्रक आणि गोदामाचा व्यवसायही आहे. त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने मुंबईतील फँटसी लँड आणि दिल्लीतील अप्पू घर उभं केलंय.

वडील शम्मी कपूर यांच्या अफेअर्सबद्दल खुलासे

खरं तर दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूर हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. पण हल्ली हल्ली ते चर्चेत आलेत. त्यांच्या चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा कुठला आगामी चित्रपट नसून त्यांनी दिलेली एक मुलाखत आहे. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान त्यांचे वडील शम्मी कपूर यांच्या अफेअर्सबद्दल खुलासे केलेत.

गीता बाली आणि शम्मी कपूर यांचा विवाह 1955 मध्ये झाला. मात्र अभिनेत्री गीता बाली यांचं 1965 मध्ये देवीच्या रोगामुळे निधन झालं. त्यावेळी त्यांचा मुलगा आदित्य राज कपूर आणि मुलगी कांचन लहान होते. आईची सावली हरपल्याने या मुलांसह कपूर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

आदित्य राज कपूर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "त्यांच्या आईचं निधन झालं तेव्हा ते अवघ्या 9 वर्षांचे होते. अशा कठीण काळात राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांनी त्यांचा आणि त्यांच्या बहिणीचा सांभाळ केला."

मुमताजवर निस्सीम प्रेम होतं, गोष्ट लग्नापर्यंत गेली होती

आदित्य राज कपूर यांनी शम्मी कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक मोठे तपशील उघड केले. ते म्हणतात की त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर शम्मीजी आपल्या मुलांच्या आयुष्यातील आईची उणीव पूर्ण करू शकेल अशा स्त्रीच्या शोधात होते. शम्मीजी आणि मुमताज यांच्यात प्रेमसंबंध होते.

ते पुढे सांगतात की, "मुमताज त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होत्या. त्यांनी 1969 मध्ये पप्पांसोबत 'ब्रह्मचारी' हा चित्रपट केला. राजेश खन्नांसोबत पहिला चित्रपट साईन करण्यापासून त्या फक्त चार पावलं दूर होत्या. माझे वडील आता हिरोंच्या जमान्यातून परतीच्या प्रवासाकडे निघाले होते. त्यांनी अभिनेत्री मुमताजशी लग्न करण्याचा विचार केला होता.

आदित्य कपूर सांगतात, "पप्पा आपल्या मतांवर ठाम होते. त्यांना कोणीतरी त्यांच्या मुलांची काळजी घ्यावी असं वाटत होतं. आम्हाला आईची गरज आहे हे त्यांना दिसत होतं. मुमताज यांच्याशी लग्न करण्याचा विचार करून ते काही चुकीचं करत होते असं मला तरी वाटत नाही. पण तेच दुसरीकडे मुमताज यांनी लग्न न करता आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा घेतलेला निर्णयही चुकीचा होता असं ही मला वाटत नाही. दोघेही आपापल्या जागी बरोबर होते. पण ते शक्य झालंच नाही."

नूतन आणि नादिरासोबतही जोडलेलं नाव

आदित्य यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की, शम्मी कपूरच्या यांच्या आयुष्यात फक्त मुमताजच नव्हत्या. मुमताज आणि गीता बाली यांच्या आधीही त्यांच्या आयुष्यात नूतन आणि नादिरा होत्या. या दोघींसोबत ही त्यांचं अफेअर होतं.

आदित्य राज कपूर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, त्यांचे वडील शम्मी कपूर आणि अभिनेत्री नूतन यांच्या नावाच्या ही चर्चा असायच्या, त्यावर आदित्य म्हणाले, "मला ही गोष्ट माहीत आहे. पण ही गोष्ट माझ्या आई-वडिलांच्या लग्नाआधी घडली होती. त्यावेळी ते दोघेही तरुण होते. तरीही त्यांचा निर्णय त्या वेळेनुसार योग्य नव्हता."

शम्मी कपूर यांच्या दुसऱ्या अफेअरविषयी सांगताना आदित्य राज कपूर म्हणतात, "अभिनेत्री नादिरा यांचं नाव शम्मी कपूर यांच्या आयुष्यात सेकंड लेडी म्हणून समोर आलं होतं. पण मला वाटतं दोघेही एकमेकांसाठी सिरीयस नव्हते. माझे वडील त्यावेळी खूपच तरुण होते आणि कोणताही निर्णय घेण्यासाठी ते सक्षम नव्हते. "

बीना रमानी यांचं ही नाव शम्मी कपूर यांच्या सोबतही जोडण्यात आलं होतं.

वडील शम्मी कपूर यांच्या आयुष्यात आलेल्या महिलांविषयी सांगताना आदित्य पुढे सांगतात, "गीता बाली यांच्या मृत्यूनंतर आणि मुमताजच्या अफेअरनंतर, शम्मी यांच्या कपूर यांच्या आयुष्यात आणखी एक स्त्री आली होती. बीना रमानी. त्या एक प्रसिद्ध लेखिका आहेत. माझे वडील शम्मीजी यांचं हे चौथे प्रेम होतं आणि हे नातं फारच कमी काळ टिकलं."

आदित्य कपूर सांगतात, "बिना यांच्यासोबतचं नातं खूप कमी काळ आणि खूपचं औपचारिक होतं."

गीता बाली गेल्यानंतर शम्मी कपूर यांनी नीला देवी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. आपल्या दुसऱ्या आईविषयी आदित्य सांगतात, "माझ्या वडिलांनी जेव्हा दुसरं लग्न करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी आम्हाला त्याविषयी काहीच सांगितलं नाही. मला आठवतं की नीला देवींशी लग्न करून ते पहाटे घरी आले. त्यावेळी आम्ही आमच्या काकी कृष्णाजींच्या घरी होतो."

"तेव्हा मी फक्त 13 वर्षांचा होतो. संध्याकाळी वडिलांना भेटल्यावर त्यांनी नीला देवींची ओळख आमची आई म्हणून करून दिली होती. याने खरं तर आम्हाला काहीचं फरक पडला नव्हता. आम्ही नीला देवींचं स्वागत मोठया प्रेमाने केलं."

आदित्य कपूर सांगतात, "मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मिठी मारली. कारण आम्हाला आई मिळाली होती आणि मला खूप आनंद झाला होता. माझी दुसरी आई नीला देवी या खूपचं प्रेमळ आहेत. त्यांनी आम्ही होतो म्हणून स्वतःच मूल होऊ दिलं नाही. किती स्त्रिया असं करतात? आणि पैजेवर सांगतो शम्मी कपूर आणि त्यांच्या दोन मुलांना सांभाळणं सोपं नव्हतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)