ब्रिटिश राजवटीचा 'जेम्स बाँड' अलेक्झांडर बर्न्स

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक, लाहोर

अलेक्झांडर बर्न्स हा असा व्यक्ती होता ज्याचं आयुष्य धाडसी मोहिमा, धूर्तपणा आणि रोमँटिसिझम यांनी ठासून भरलेलं आहे. यामुळेच काहींनी त्याला 'व्हिक्टोरियन जेम्स बाँड' म्हटलं, तर काहींनी त्याला त्याच्या गुणांमुळे 'फ्लॅशमॅन' असं पुस्तकी नावही दिलं. बर्न्स नामक हा व्यक्ती 'खतरों का खिलाडी' तर होताच, पण सोबतच सौंदर्याचाही उपासक होता.

अलेक्झांडर बर्न्सच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध रंग होते. कोणतीही भीती न बाळगता धाडसी मोहिमेवर जाणं, गुप्त माहिती काढणं, मुत्सद्दीपणा आदी गुण त्याच्यात होते. तो वेशांतर करण्यात, नवनव्या भाषा शिकण्यात तो पटाईत होता. शिवाय, सौंदर्याचा उपासक तर तो होताच.

अलेक्झांडर ऐन तारुण्यात मारला गेला नसता तर त्याने आणखी काय-काय केलं असतं, याचा विचारही आपण करू शकणार नाही.

बर्न्सचा जन्म 17 मे 1805 रोजी स्कॉटलंड मधील मॉन्ट्रोज इथं झाला. वयाच्या 16 व्या वर्षी तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दाखल झाला. ब्रिटिशांच्या राजवटीखालील भारतात सेवा करत असताना अलेक्झांडरने उर्दू आणि पर्शियन भाषा शिकून घेतली. दरम्यान 1822 मध्ये गुजरातमधील सुरत शहरात त्याची अनुवादक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सिंधू नदीचं इंटेलिजन्स मिशन

अलेक्झांडर बर्न्सच्या धाडसी जीवनाची सुरुवात अशा एका गुप्तचर मोहिमेने झाली ज्याने सिंधमध्ये ब्रिटिशांच्या विजयाचा पाया रचला.

सिंधू नदीचं खोरं समजून घेण्यासाठी बर्न्सने 1829 मध्ये दिलेला प्रवासाचा प्रस्ताव मंजूर झाला. ख्रिस्तोफर अॅलन बेली यांनी ब्रिटीश भारतातील गुप्तचर प्रणालीवरील एक पुस्तक लिहिलंय. त्यांच्या पुस्तकात ते लिहितात की, "1831 मध्ये बर्न्स आणि हेन्री पॉटिंगर यांना सिंधू नदीच्या सर्वेक्षणाद्वारे एक मार्ग गवसला. यामुळे भविष्यात सिंधवरील आक्रमणाने मध्य आशियाचा मार्ग मोकळा होणार होता."

त्याचवर्षी बर्न्स हे ब्रिटनचे महाराज विल्यम चतुर्थ यांच्या वतीने पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांना घोडे भेट म्हणून द्यायला लाहोरला जाणार होते. पंजाब तोपर्यंत एक स्वतंत्र संस्थान होतं. वरवर जरी दिसत असलं तरी हे प्रकरण वाटतं तितकं साधं नव्हतं.

जी. एस. ओजला म्हणतात, "ही भेट म्हणजे शीख संस्थानाशी भविष्यात होणाऱ्या करारांच्या मालिकेची सुरूवात होती. यानंतर ईस्ट इंडिया कंपनी सतलज आणि सिंधू नद्यांमधून जलमार्गाने प्रवास आणि व्यापार करू शकणार होती."

17 व्या शतकाच्या सुरुवातीला सर थॉमस रो यांना ईस्ट इंडिया कंपनीने मुघल सम्राट जहांगीरच्या दरबारात इंग्लंडचा राजदूत म्हणून पाठवले. तेव्हा त्यांनी नोंद करून ठेवली होती की, सिंधू नदीचा वापर करून व्यापाराच्या शक्यता वाढवता येऊ शकतात.

पण तेव्हा थॉमस रो हे त्यावेळी सिंधू नदीच्या जलमार्गाच्या सुसंगततेबद्दल तसेच पश्चिम भारत आणि पंजाबमधील इतर प्रमुख नद्यांच्या मार्गांबद्दल अनभिज्ञ होते. त्या नद्यांचा प्रवाह समजून घेण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला दोन शतकांहून अधिक काळ वाट पाहावी लागली.

कॅप्टन अलेक्झांडर या उत्साही तरुण अधिकाऱ्याकडे हे मिशन सोपवण्यात आलं. पण प्रत्यक्षात बर्न्स यांच्याकडे इंग्लंडचे महाराज विल्यम चतुर्थ यांनी महाराजा रणजित सिंह यांच्यासाठी पाठवलेले पाच घोडे चपट्या तळाच्या बोटीतून नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ब्रिटिशांनी दावा केला की हे घोडे रस्तामार्गे नेल्यास जिवंत राहणार नाहीत.

कराची ते लाहोर हजार मैलांचा प्रवास

अबू बक्र शेख लिहितात की, 1830 मध्ये मुंबई बंदरावर एक जहाजाने आपला नांगर टाकला होता. यात ब्रिटनच्या राजाकडून पंजाबचे महाराजा रणजीत सिंग यांना भेट म्हणून पाच घोडे आणि मैत्रीचं पत्र पाठवण्यात आलं होतं.

या प्रवासावर निघण्यापूर्वी, बर्न्सला मुंबईच्या मुख्य सचिवांचे एक गुप्त पत्र मिळालं. या पत्रात काही निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे, "या सहलीतील एक महत्त्वाचं काम म्हणजे सिंधू नदीचा तपशीलवार तांत्रिक अहवाल तयार करणे. तिथं कोणत्या भागात पाणी आहे हे शोधणे, ठिकाणांची रुंदी मोजणे, जलमार्गाच्या प्रवासाला लागणार लाकूड मिळवण्यासाठी किनाऱ्यावर किती जंगलं आहेत, किनाऱ्यावर किती शेतजमिनी आहेत, तिथं कोणत्या जातीचे लोक राहतात. त्याचबरोबर राज्यकर्त्यांची आर्थिक आणि राजकीय स्थिती कशी आहे." या सर्व गोष्टींची चाचपणी करायची होती.

ओजला यांच्या म्हणण्यानुसार, कराची ते लाहोर या हजार मैलांच्या प्रवासात त्या 'ट्रोजन हॉर्सेस'च्या वेशात इंग्रजांना नद्यांची माहिती मिळवायची होती. पण सिंधच्या तालपोर सरदारांनी त्यांना ठाठाच्या डेल्टामधील कोठडीत तीन महिने डांबून ठेवलं. कारण या इंग्रजांकडे शस्त्र असल्याचा संशय या सरदारांना आला होता.

शेवटी कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत आणि त्यांना लाहोरच्या प्रवासाला पाठवण्यात आलं. नदीची खोली मोजण्यासाठी आणि इतर माहिती गोळा करण्यासाठी बोटीत वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षणाची साधनं ठेवण्यात आली आहेत, याबद्दल कोणालाच माहीती नव्हती.

उच्च अधिकार्‍यांचा दबाव असतानाही, बर्न्सने या प्रवासात सैन्य बाळगण्यास नकार दिला. कारण सैन्य बाळगल्यास स्थानिक जनतेला वाटेल की ब्रिटिशांचा हल्ला करण्याचा हेतू आहे. आणि बर्न्सला ते नको होतं. म्हणून त्याने डी जे लॅकी हा एकमेव ब्रिटीश अधिकारी, प्रवासात सोबतीला घेतला. पुढे आपल्या प्रवासात त्यांनी अधूनमधून स्थानिक लोकांना सुद्धा सामावून घेतलं.

या गोष्टींमुळे घडलं असं की, बर्न्सने सिंधू नदीकाठच्या शहरांमधील स्थानिक नेते आणि राज्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंध बनवले.

मुत्सद्देगिरीवर प्रभुत्व, स्थानिक रीतिरिवाज आणि खुशामत करण्याच्या पद्धतींशी परिचित असल्यामुळे तो पूर्वी युरोपीय लोकांसाठी बंद असलेल्या सिंधू नदीच्या भागात प्रवास करू शकला. यामध्ये ठट्ठा, हैदराबाद, भक्कर आणि शुजा आबाद ही शहर होती.

पंजाबचा शासक रणजितसिंहच्या दरबारात बर्न्स

अबू बकर शेख यांनी महाराजा रणजित सिंह आणि बर्न्सच्या भेटीचा तपशील त्यांच्या स्वत:च्या शब्दांत सांगितला :

"आम्ही गाडीच्या पाठीमागे हत्तींवर स्वार झालो. मी ज्या भव्य हत्तीवर स्वार झालो तो सर्वात पुढे होता. शहरातील रस्त्यांवर पायदळ, घोडदळ आणि तोफखान्याच्या तुकड्या होत्या. लोकांची गर्दी जमली होती. परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं. जेव्हा आम्ही दरबाराच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो मी नतमस्तक होऊन बुटाची लेस सोडू लागलो इतक्यात मला कोणी तरी हात लावून आलिंगन दिलं."

"मी वर पाहिलं तर म्हातारा आणि दुबळा असा तो व्यक्ती महाराजा रणजित सिंग होता. त्याच्यासोबत त्याची दोन मुलं ही होती. तो माझा हात धरून आम्हाला दरबारात घेऊन गेला. आमचं भव्य स्वागत करण्यात आलं. आम्हाला चांदीच्या खुर्च्यांवर बसवून आणि ब्रिटनच्या राजाची ख्यालीखुशाली विचारण्यात आली."

"मी महाराजांना सांगितलं की ब्रिटनच्या महाराजांनी तुमच्यासाठी पाठवलेले पाच घोडे घेऊन मी लाहोरला पोहोचलोय. यासोबतच बादशाहाचे भारतीय व्यवहार मंत्र्याचे एक पत्र देखील आहे. ते पत्र सोन्याच्या तारांनी बनवलेल्या पिशवीत आहे. त्यांनी ते पत्र माझ्याकडून घेतलं आणि आदराने कपाळाला लावलं."

"दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी या पत्राचा अनुवाद दरबारात वाचण्यात आला. पण पत्र अर्धवट वाचण्यात आलं कारण महाराजांना या पत्राप्रति आदर व्यक्त करायचा होता. म्हणून त्यांनी या पत्राला तोफांची सलामी देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून लाहोरच्या लोकांना त्यांचा बादशहा आनंदी असल्याची माहिती होईल. हा आनंद लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 60 तोफांची सलामी देण्यात आली. एका तोफेतून 21 गोळे डागण्यात आले."

राज्यकारभारात पारंगत असलेल्या महाराजा रणजित सिंग यांचा उल्लेख

बर्न्सने रणजित सिंगबद्दल लिहिलंय की, "महाराज गर्दी गोंगाटापासून दूर आहेत, परंतु त्यांच्या दरबारात उत्साह कायम आहे. मी रणजित सिंग यांच्यापासून इतका प्रभावित झालोय जितका मी कधीच कोणत्याही आशियाई नागरिकावर झालो नाही. त्यांच्याकडे ना शिक्षण आहे, ना कोणाचं मार्गदर्शन, पण राज्यकारभारात त्यांचं प्रभुत्व कमालीचं आहे. हे काम ते कुशलतेने हाताळतात"

बर्न्स डिटेलिंगमध्ये मास्टर होते. उदाहरणार्थ, त्यांनी त्यांच्या प्रवासाविषयी लिहिलयं की, डेरा गाझी खानच्या बाजारात 1597 दुकानं आहेत, त्यापैकी 115 कापडाची, 25 रेशमाची, 60 सोनारांची आणि 18 कागदाची आहेत.

बर्न्सच्या या सर्वेक्षणानंतर 1835 मध्ये सिंधू नदीत हैदराबाद आणि कराची दरम्यान 'इंडस' नावाचं मोठं जहाज चालवण्यात आलं. सात वर्षांनंतर 1843 मध्ये इंग्रजांनी सिंधवर आपली सत्ता स्थापन केली.

जेव्हा रणजित सिंहाने कोहिनूर हिरा इंग्रजांना दाखवला

ऑक्टोबर 1831 मध्ये, बर्न्सने महाराजा रणजित सिंह यांची पहिली भेट ब्रिटिश लष्कराचे कमांडर, गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याशी घालून दिली.

ही बैठक 22 ते 26 ऑक्टोबर दरम्यान सतलज नदीच्या काठावरील रोपर या गावात झाली. यात अनेक ब्रिटिश राजकीय दूत आणि इतरांचा सहभाग होता.

या बैठकीत महाराजा रणजीत यांनी कोहिनूर हिराही दाखवला. तो हिरा ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात गेला आणि आज राणीच्या मुकुटात विराजमान आहे.

रोपरमधील शीर्ष नेतृत्वाच्या बैठकीनंतर, बर्न्सने नोव्हेंबर ते डिसेंबर 1831 दरम्यानचा काही काळ दिल्लीत आपला मुक्काम ठोकला.

तिथेच 19 डिसेंबर रोजी बर्न्स पहिल्यांदा त्याचा भावी सहप्रवासी मोहन लालला भेटला. बर्न्सने हुमायूनच्या थडग्याजवळील मैदानावर असलेल्या एका हिंदू शाळेला भेट दिली. तिथं शिकणाऱ्या किशोरवयीन मुलाच्या पाश्चात्य भूगोलाच्या ज्ञानाने बर्न्स प्रभावित झाला.

द ग्रेट गेम: अफगाणिस्तान आणि बुखारा प्रवास

पुढच्या काही वर्षांत बर्न्सचा मोहनलाल सोबतचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास अफगाणिस्तानातून, हिंदुकुश ओलांडून बुखारा (सध्याचा उझबेकिस्तान) आणि पर्शिया, म्हणजे इराणपर्यंत सुरू राहिला.

राजनैतिक प्रतिनिधीचे सहाय्यक म्हणून, त्याने वायव्य भारत आणि आसपासच्या देशांच्या इतिहास आणि भूगोलात रस दाखवला. या भागाचा ब्रिटिशांनी अद्याप ही शोध घेतला नव्हता. त्यानंतर तो अफगाणिस्तानला गेला.

अफगाणिस्तान हा ब्रिटिश आणि रशियन या प्रतिस्पर्धी साम्राज्यांमध्ये अडकला होता. भारतावर नियंत्रण ठेवल्यानंतर ब्रिटन अफगाणिस्तानमार्गे उत्तरेकडे सरकणार असा रशियाला संशय होता.

तर इकडे रशियाला हिंदुस्थान काबीज करायचा आहे अशी भीती इंग्रजांना होती. आणि त्यामुळे 'ग्रेट गेम' नावाचा राजकीय आणि मुत्सद्दी संघर्ष सुरू झाला.

ब्रिटिश सरकारला बुद्धिमत्तेची गरज होती. त्यामुळे बर्न्सची रवानगी बुखाराला करण्यात आली. बुखारी माणसाच्या वेषात प्रवास करत बर्न्सने काबूल ते बुखारा या मार्गाचं सर्वेक्षण केलं आणि अफगाणिस्तानचा सविस्तर अहवाल सादर केला.

1834 मध्ये त्याने ब्रिटनमध्ये जाऊन जे पुस्तक प्रकाशित केलं, त्या पुस्तकाने त्या देशांच्या समकालीन ज्ञानात मोठ्या प्रमाणात वाढ केली. ते पुस्तक त्या काळातील सर्वात लोकप्रिय पुस्तकांपैकी एक होतं.

हे पुस्तक बुखारा, भारत ते काबुल, मध्य किंवा अंतर्गत युरेशिया आणि पर्शिया सोबतच सिंधू नदी ते लाहोरपर्यंत गेलेल्या ब्रिटनच्या सम्राटाच्या भेटवस्तूच्या प्रवासाची कथा होती. याची आवृत्ती 1831, 1832 आणि 1833 मध्ये सरकारी आदेशानुसार काढण्यात आली. बर्न्सने पहिल्या आवृत्तीतून 800 पाउंड कमावले.

अफगाणिस्तानमध्ये राजकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

1838 मध्ये दोस्त मोहम्मद बरकझाईने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली. अशा स्थितीत भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी अफगाण परराष्ट्र धोरणावर रशियन प्रभाव मर्यादित रहावा यासाठी प्रयत्न केला.

बर्न्सने लॉर्ड ऑकलंडला काबूलच्या सिंहासनावर दोस्त मोहम्मद खानला बसविण्याचा सल्ला दिला. पण व्हाईसरॉयने सर विल्यम मॅकेंटाईनच्या मताला प्राधान्य दिलं आणि शाह शुजाला पुन्हा पदावर बसवलं. 1839 मध्ये शाह शुजाला सिंहासनावर बसवल्यानंतर, बर्न्स औपचारिकपणे काबूलमध्ये राजकीय प्रतिनिधी बनला. या स्थितीचं वर्णन बर्न्सने पूर्ण-पगारी निम्न अधिकारी असं केलं.

शाह शुजाच्या काळात अफगाण नागरिकांवरील अत्याचार वाढले आणि गरिबीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

इंग्रजांसोबत इथं क्रिकेट, स्केटिंग आणि स्टीपल चेस सारखे विचित्र खेळ आले. शहरातील लोकसंख्या अचानक वाढू लागली. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडू लागले.

त्याच दरम्यान शाह शुजाने लोकांवर कराचा बोजा वाढवला. निम्न स्तरातील वर्गांमध्ये आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर पसरले.

शाह शुजाच्या आदेशानुसार, ब्रिटीश आणि भारतीय सैन्याने शहराबाहेर छावण्या लावण्याचं मान्य केलं. मात्र बर्न्सने त्याचा भाऊ लेफ्टनंट चार्ल्स बर्न्स, मेजर विल्यम ब्रॅडफूट आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जुन्या शहराच्या मध्यभागी एका घरात राहण्याचा निर्णय घेतला.

बर्न्सची हत्या

1 नोव्हेंबर 1841 रोजी मोहन लालने बर्न्सला सांगितलं की, त्याला मारण्याचा कट रचला जातोय. मोहनलालने त्याला शहर सोडण्याचा आग्रह केला. अफगाण लोकांनी शहराच्या आर्थिक आणि नैतिक पतनास काबूलमधील ब्रिटनचा प्रतिनिधी म्हणून बर्न्सला जबाबदार धरलं.

आपण कोणत्याही संभाव्य संकटाचा सामना करू शकतो या आत्मविश्वासाने बर्न्सने आपल्या मित्राचा सल्ला न मानता काबूलमध्येचं राहण्याचा निर्णय घेतला.

2 नोव्हेंबरच्या रात्री बर्न्स विरोधी एका छोट्या टोळीने शहरात गर्दी करायला सुरुवात केली. आणि या गर्दीला सांगण्यात आलं की बर्न्सच्या घराला लागून असलेल्या इमारतीत गॅरिसनचा खजिना आहे, जिथे ब्रिटिश सैन्याचे पगार ठेवले जातात.

रात्र पडताच बर्न्सच्या घराच्या व्हरांड्यात मोठा जमाव जमला. बर्न्सने तात्काळ मदतीसाठी सैन्यदलात एक तुकडी बोलावली. पण आलेल्या धोक्याला प्रतिसाद कसा द्यायचा यावरून ब्रिटीश सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये वाद झाला आणि सैन्य पोहोचायला उशीर झाला.

वातावरण बिघडायला लागलं. हल्लेखोरांनी तबेला पेटवून दिला. जमावाकडून गोळ्या झाडल्या गेल्या आणि बाल्कनीत बर्न्ससोबत उभा असलेला मेजर ब्रॅडफूट मारला गेला.

आता सुटकेचा दुसरा कोणताच मार्ग उरला नसल्याची खात्री पटल्याने चार्ल्स बर्न्स शस्त्र घेऊन व्हरांड्यात आला. त्याने सहा जणांना मारले पण नंतर जमावाने त्याच्या भावाची हत्या केली.

मग जमावाला तोंड देण्यासाठी अलेक्झांडर बर्न्स स्वत: शस्त्र घेऊन बाहेर आला. हिंसाचारानंतर काही क्षणांतच त्यालाही जमावाने मारलं.

ब्रिटीश सैन्य अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असताना या घटना घडल्या. आपल्या नियतकालिकात या घटनेचा संदर्भ देत एका तरुण अधिकाऱ्याने लिहिलयं की, 'सकाळच्या प्रहरात 300 माणसे पुरेशी होती, पण तिसर्‍या प्रहरात 3000 सैनिक पण कमी पडले असते.'

दुसर्‍या दिवशी बर्न्स, मेजर ब्रॅडफूट आणि लेफ्टनंट चार्ल्स बॅनर्सचे शीर तलवारीत खुपसून चौकात ठेवण्यात आलं. बर्न्स त्यावेळी 36 वर्षांचा होता.

बर्न्स वेषांतर करण्यात पारंगत होता

उझबेकिस्तानमधील माजी ब्रिटीश राजदूत क्रेग मरे यांनी त्यांच्या 'अलेक्झांडर बर्न्स, मास्टर ऑफ द ग्रेट गेम' पुस्तकात बर्न्सच्या हेरगिरीचे तंत्र तपशीलवार मांडलयं.

"बर्न्स प्रवाशाच्या वेशात यायचा पण नकाशे बनवण्यात तो खूप दक्ष असायचा. रात्रीच्या वेळी त्याच्या तंबूत गुप्तपणे नकाशे बनवले जायचे. ते नकाशे तावीज मधून दूतांद्वारे तस्करी पाठवले जायचे. संदेशवाहक स्वतः सुद्धा वेषांतर करून प्रवास करायचे. रशियनांची पत्र गहाळ करण्यासाठी क्लिष्ट कोडवर्ड वापरायचे."

मरे सांगतात की 'बर्न्स'चं सेक्स लाईफही इंटरेस्टिंग होतं. अफगाण बंडखोरीला चालना देणार्‍या अफगाण महिलांशी त्याचे संबंध असल्याचं बऱ्याच वर्णनात नमूद करण्यात आलंय. परंतु मला असा कोणताही पुरावा सापडला नाही जो अगदी अचूक होता. मला जे सापडलं त्यात असं नमूद केलंय की, बर्न्सच्या प्रवासात त्याच्या सोबत एक हॅरेम असायची.

शान डेमर लिहितात की 'बर्न्सच्या प्रवासादरम्यानची ठिकाण आणि मुंबईतील ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय यांच्यात बरंच अंतर असायचं. त्यामुळे संपर्क ठेवणं जिकरीचं होतं. अशात तो त्याच्या मर्जीचा मालक होता.'

'बर्न्सचं आयुष्य हे मेळावे, रुचकर जेवण आणि मेजवान्या, दारू, नृत्य करणाऱ्या मुली, दागिने यांनी ओतप्रोत भरलेले होतं.'

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)