LGBTQ : तृतीयपंथी सपना आणि बाळूच्या लग्नाची ‘अजब प्रेम की गजब कहानी’

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

किन्नर सपना आणि बाळू दूतडमल या तरुणाचं 7 मार्चला बीडमध्ये वाजत-गाजत लग्न झालं. ट्रान्सजेंडर असल्याने सपनाला घराबाहेर पडावं लागलं. कुटुंबाने नाकारलेल्या सपनाचं कन्यादान करण्यासाठी रक्ताचं नातं पुढे आलं नाही. तरीही आज लग्न करून सपनाने जोडीदारासोबत आनंदाने संसार थाटलाय.

"आयुष्यात विचार केला नव्हता की माझं लग्न होईल आणि मी एक नवरी होईन. आता तो क्षण पण आलाय, मी नवरी होतेय. मला खूप आनंद होतोय की मी नवरी होणार आहे", हे शब्द आहेत बीडमधील किन्नर सपनाचे.

सपना आणि बाळू यांचा विवाह महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बीड येथील श्री कंकालेश्वर मंदिरात हिंदू रितीरिवाजाने पार पडला. नाशिकच्या शिवलक्ष्मी यांचं लग्न काही महिन्यांपूर्वी गाजलं होतं. त्यानंतर मराठवाड्यातल्या या लग्नाची जोरदार चर्चा होती. शिवलक्ष्मी यांनीही या लग्नाला हजेरी लावली.

सपना आणि बाळू गेल्या अडीच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याच्या निर्णय घेतला. मात्र त्यांना लग्नात अनेक अडचणी आल्या. स्थानिक पत्रकार शेख आएशा रफीक आणि दैनिक राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी लग्नासाठी पुढाकार घेतला.

वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपली लैंगिक ओळख वेगळी आहे हे कळलं तेव्हा सपना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक आघाताला सामोरं जावं लागलं.

त्या दिवसांबद्दल सपना सांगतात, "कुठल्याही घरात जर आमच्यासारखा मुलगा झाला, तर त्यांना घराबाहेर आई-वडील काढत नाहीत. समाज त्यांना घराबाहेर काढण्यासाठी दबाव आणतो. समाज म्हणतो- तुम्ही घराबाहेर निघा, तुम्ही छक्के आहात. माझ्या वडीलांना हे बोलणं सहन होत नव्हतं. मीच नाही तर माझ्या वडिलांनीही तेव्हा गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता."

वडिलांची ही अवस्था पाहून सपना अस्वस्थ झाल्या. घर सोडल्याची आठवण त्यांना आजही अस्वस्थ करते.

सपना सांगतात, "जेव्हा मी माझ्या वडिलांना विचारलं की, पप्पा तुम्हाला काय होतंय. तेव्हा ते म्हणाले, समाज मला खूप त्रास देतोय. तुझ्या दोन बहिणींची लग्न व्हायची आहेत. तुझ्यामुळे माझ्या दोन मुलींचं वाटोळं होईल. त्यांना लग्नासाठी पाहायलाही कोणी पाहुणे येणार नाहीत. तेव्हा मी म्हणाले माझं बाहेर काहीही होऊ दे. पप्पा, तुम्ही असं सांगून टाका की तुमचा मुलगा वारला आहे."

सपना यांचं आधीचं नाव अमर. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.

वाईट नजरेने पाहणारा समाज

कुटुंबातून बाहेर पडल्यानंतर सपना तिच्यासारख्याच किन्नरांच्या सहवासात आल्या. त्यांचा नवा संघर्ष सुरू झाला.

त्या सांगतात "जेव्हा मी बाजारात, रस्त्यावर पैसे मागायला जायचे तेव्हा कोणीही यायचं आणि मला म्हणायचं- 'ए हा बघ छक्का चालला', 'ए मिठ्ठा चालला'. कोणी म्हणायचं 'ए गुड चालला'. अशी बरीचशी नावं मला समाजानं दिली.

पण माझं जे नाव आहे त्या नावाने मला आतापर्यंत कोणीही बोलावलं नाही. नेहमी मला ए छक्का, किन्नर अशाच नावांनी लोकांनी मला बोलावलं. समाज हा वाईटच नजरने माझ्याकडे बघत होता. कोणीही चांगल्या नजरेने मला कधीच पाहिलं नाही."

सपनाने घेतली प्रेमासाठी परीक्षा

सपना आणि बाळू यांची भेट एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली. बाळू जागरण- गोंधळात हलगी वाजवतात. सपनाही या कार्यक्रमांमध्ये नाचगाणं सादर करायची. तिथेच दोघांची ओळख झाली. त्याचं रुपातंर मैत्रीत झाले आणि नंतर प्रेम फुलू लागलं.

"मी सपनाच्या घरी कधी-कधी राहायचो. ती माझ्यासाठी स्वयंपाक करायची. आम्ही दोघे एकत्रच कार्यक्रमाला जायचो. एक दिवस मी सपनाला म्हणालो की तू मला खूप आवडतेस. सपनाने मला लगेच होकार दिला नाही. मग मी पुन्हा फोन लावला. तेव्हा सपनाने सोबत येऊन राहायला सांगितलं.''

"मी तिच्याकडे जाऊन राहिलो. तेव्हा पहिल्याच दिवशी तिने माझ्याजवळ पैसे दिले. माझ्यावर प्रेम आहे की पैशांवर हे तिला पाहायचं होतं. तिने माझ्याजवळ 10 हजार रुपये दिले."

सपना सांगतात, "मी त्याला इतकी रक्कम देऊनही त्याने त्यातला एक रुपयाही खर्च केला नाही. नंतर एकदा 50 हजार रुपये ठेवायला दिले. मला वाटलं होतं तो पैसे घेऊन पळून जाईल. आपण पुन्हा एकदा असंच करून बघू. या वेळेस मी त्याला जास्त रुपये दिले."

"मला वाटलं तो पळून जातो की काय. पण त्याला पैशात काहीच रस नव्हता. तेव्हा मग मी निर्णय घेतला की, याला पैशांची गरज नाही तर प्रेमाची गरज आहे. मी त्याची बायको होऊन संसार करावा अशी बाळूची इच्छा होती. हे मी ओळखलं आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला."

लग्नात स्थानिक पत्रकारांचा पुढाकार

बाळू आणि सपनाचं लग्न लावून देण्यासाठी स्थानिक पत्रकार शेख आएशा रफीक आणि दैनिक राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी पुढाकार घेतला. कारण घरच्यांचा विरोध असल्याने लग्नसोहळा कसा होणार हा प्रश्न होता.

आएशा रफीक यांनी सपनाच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. त्यांना या लग्नाविषयी बोलताना गहिवरून येत होतं. "हे असं लग्न लावून देऊन मला समाजात बदल घडवून आणायचाय. मला वाटतं की, किन्नरांना सामान्य माणसांसारखी जगण्याची संधी मिळायला हवी. त्यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. "

"माझ्या पोटी जर किन्नर मूल जन्माला आलं तर मी त्याला सोडू शकते का? नाही. कारण तो माझाच अंश आहे. समाजानेही हे समजून घ्यायला हवं की हा कोणाचा ना कोणाचा अंश आहे. हेच विचार मला हे लग्न लावून देण्यासाठी प्रेरणा देत राहिले."

तर नवरदेवाचे मामा असलेले वैभव स्वामी सांगतात- मी अनेक लग्न पाहिली. विविध जाती-धर्मातील लग्न पाहिली. पण हा लग्नसोहळा माझ्यासाठी एक अनोखा आणि अविस्मरणीय ठरला. हे लग्न नेमकं कसं लावायचं हे माहित नव्हतं. किन्नर व्यक्तीचं असं उघडपणे लागलेलं लग्न बीड जिलह्यातलं... कदाचित मराठवाड्यातील पहिलं लग्न असावं. "

"मी दोघांनाही विचारलं की, तुम्हाला तुमच्या जातीनुसार लग्न लावायचं आहे का, तेव्हा सपना म्हणाली की- 'माझी जात फक्त किन्नर आहे. त्यामुळे लग्न कोणत्याही पद्धतीने लागलं तर मला काहीच हरकत नाही'. तर बाळूची इच्छा हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न करायची होती."

असा झाला लग्नसोहळा

बीडच्या ऐतिहासिक श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिराच्या परिसरात 7 मार्चला सकाळी 11.35च्या मुहूर्तावर दोघेही विवाहबंधनात अडकले.

कंकालेश्वर मंदिरातील महादेवाचं दर्शन घेऊन सजलेल्या रथामधून नवरदेवाची वरात काढण्यात आली. या वरातीमध्ये किन्नर शिवलक्ष्मी व त्यांचे पती संजय झाल्टे हे देखील उपस्थित होते.

धार्मिक विधीनुसार मंगलाष्टक म्हणून हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला.

बाळू यांच्यासाठी हा त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय होता. त्याच्या घरच्यांची इच्छा होती की त्याने मुलीशी लग्न करावं, घराला वारसदार असावा. पण त्यांचं सपनावर प्रेम जडलं. "मला मनापासून वाटतं होतं की सपनाच माझी बायको व्हावी. मग समाज काहीही म्हणो त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही."

लग्नानंतरचं आयुष्य कसं हवं?

सपनाला या लग्नाकडून खूप अपेक्षा आहेत. तिची काही स्वप्नं आहेत. त्याबद्दल बोलताना सपनाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. त्या म्हणाल्या, "लग्नानंतर मला एका गृहिणीसारखं आयुष्य जगायचंय. दारोदारी जाऊन पैसे मागायची इच्छाच नाही. बाळूचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे."

सातवीपर्यंत शिक्षण झालेले बाळू जागरण-गोंधळात वाजवून दिवसाला दोनशे ते पाचशे रुपये कमाई करतात.

लग्नानंतर बाळू यांची आनंदी आयुष्याची स्वप्नं आहेत. "समाज आम्हाला स्वीकारतो की नाही हे पाहायचंय. पण त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. आम्ही एकत्रच राहू."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)