माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, विप्लव देव यांचा राजीनामा #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी माणिक साहा यांची निवड

विप्लव कुमार देव यांच्या राजीनाम्यानंतर त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा माणिक साहा यांच्याकडे आली आहे. त्रिपुरा भाजपच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत माणिक साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

या बैठकीला भाजपच्या केंद्रीय समितीकडून भूपेंद्र यादव हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तसंच, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेही उपस्थित होते.

मावळते मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनीच ट्विटरवरून माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली.

पुढच्या वर्षी त्रिपुरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मुख्यमंत्री बदलाला महत्त्व प्राप्त झालंय.

2. राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ, राज्य सरकारचा निर्णय

मनसे नेते राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गुढी पाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध भूमिका घेतल्यापासून राज ठाकरे चर्चेत आहेत. दरम्यान त्यांनी अयोध्येला भेट देण्याची घोषणा केल्यानंतर तिथेही स्थानिक नेत्यांकडून विरोध होत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती.

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील, अशी बातमी साम टीव्हीने दिली.

3. औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू, कबरीवर फुले वाहण्यावरून शिवसेनेचाही संताप

MIM नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी औरंगाबाद येथील खुलताबादमधील औरंगजेब यांच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं. या प्रकरणावरून राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत असताना सत्ताधारी शिवसेनेतील नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता. त्याने हिंदूंच्या देवस्थानांची, मंदिरांची नासधूस केली. ओवैसीने औरंगजेबाच्या कबरीवर जे काही केलं, त्याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाणे येथील प्रगती कॉलेजच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ही बातमी लोकमतने दिली.

4. पक्षाचं कर्ज फेडण्याची वेळ आली - सोनिया गांधी

काँग्रेस पक्षाने आपल्याला बरंच काही दिलं. आता त्या कर्जाची परफेड करण्याची वेळ आता आली आहे, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे.

उदयपूर येथे झालेल्या काँग्रेस चिंतन शिबीरात त्या बोलत होत्या.

आपल्याला जिंकायचं आहे. देशातील जनतेच्या पक्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पक्ष ज्या सुवर्ण स्थितीला होता, त्या स्थितीला परत आणण्याचा निश्चय नेते आणि कार्यकर्त्यांना घ्यायचा आहे, असं सोनिया गांधींनी म्हटलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. उत्तर भारतीयांनी घेतलेली भूमिका योग्यच- रामदास आठवले

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे." असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री रामदास आठवले त्यांनी सातारा येथे केले. सातारा दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साताराचे अध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार "राज ठाकरे यांना एवढ्या दिवसांनी आयोध्या आठवली आहे, त्यांना आयोध्याला जायचं आहे. पण त्यांनी यापूर्वीच अयोध्याला जायला हवं होतं. त्यांच्या विरोधात उत्तर भारतीयांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. आपण भारतात राहणारे सर्व भाषी एकच आहोत याचा विचार त्यांनी करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रीयांनी केला नव्हता, तेव्हा उत्तर भारतीय ब्राह्मण असणाऱ्या गागाभट्टांनी केला होता हा इतिहास लक्षात ठेवायला हवा." असा सल्लाही त्यांनी ठाकरे यांना दिला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)