You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांची युती जेव्हा होता होता राहिली....
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची 2017 मध्येच सगळी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने त्रिपक्षीय सरकार तेव्हा स्थापन झालं नाही, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात बोलताना केलं
या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. "शिवसेनेने सत्तापिपासूपणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली",अशी टीकाही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केली.
शेलार यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
'चुकीचं प्रायश्चित्त आता भोगतोय'
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आशिष शेलार यांनी 2017 साली हे सांगायचं होतं ना? पाच वर्ष का थांबलात? 2022 मध्ये 2017 साली असं झालं होतं ते सांगायचं. 2017 साली बरेच नेते इकडे तिकडे होते. त्यांची वक्तव्ये तेव्हा वेगळी होती आता वेगळी आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न आधी पाहू. 2017 ला असं झालं, 2012 ला तसं झालं, 2010 तसं झालं यात कोणाला रस नाही. आज काय आहे, महत्त्वाच्या समस्या कोणत्या, मूलभूत प्रश्न काय ते पाहूया."
तर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव तेव्हा होता. तसा एक विचारही सुरू होता. तो एक मोठा विचार प्रवाह होता. पण त्यावेळी शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत जाणं हे योग्य नाही. शिवसेना आपला मित्र आहे, विचारामध्ये समानता आहे. हे खरं आहे की ती चूक होती. त्या चुकीचं प्रायश्चित्त आम्ही आत्ताही भोगतोय.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनीही या वक्तव्यावर प्रतिक्रिया लोकशाही वाहिनीशी बोलताना दिली. त्या म्हणतात, "आशिष शेलार किंवा सुधीर मुनगंटीवार हे नेते जे बोलताहेत त्याला आता अर्थ नाही. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आली नाही म्हणून ते किती व्याकुळ झाले आहेत हे यावरून दिसतं. म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर इन्कम टॅक्स आणि इडीच्या धाडी पडल्या नसत्या आणि त्यांना सुटी मिळाली असती असा टोलाही मनिषा कायंदे यांनी लगावला.
2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यावर भाजपा आणि शिवसेना यांच्यात वितुष्ट निर्माण झालं आहे. मात्र ती सुरुवात सत्तेत असल्यापासूनच झाली होती. शिवसेना नेते कायम राजीनामा खिशात ठेवण्याची भाषा करायचे. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केली.
'आशिष शेलार यांचं वक्तव्य 100 टक्के खरं आहे'
2017 मधली राजकीय परिस्थिती आणि तेव्हाच घटनाक्रम विशद करताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "2014 च्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा महाराष्ट्रातले चार ही पक्ष एकत्र लढले होते. भाजपने सरकार स्थापन केलं तेव्हा त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. तेव्हा त्यांनी अल्पकाळासाठी राष्ट्रवादीची कास धरली. त्यानंतर शिवसेनेशी युती केली. मात्र शिवसेना भाजपाचं सरकार एकत्र आल्यावर त्यांचं फारसं सख्य नव्हतं. शिवसेनेने कायमच सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती."
अशा परिस्थितीत राष्ट्रवादीशी युती झाली तर शरद पवारांच्या रुपाने एक ज्येष्ठ व्यक्तीचं नेतृत्व सरकारला लाभेल असं भाजपा नेत्यांना वाटलं होतं. त्याप्रमाणे दिल्लीत बैठकाही झाल्या होत्या. तेव्हा अमित शहा शरद पवारांना म्हणाले होते की तुम्ही सत्तेत या, तुम्हाला केंद्रातही पदं देऊ. राष्ट्रवादीला शिवसेना सरकारमध्ये असल्याचा आक्षेप होता. त्यांना फक्त भाजपा आणि राष्ट्रवादी यांचं सरकार हवं होतं. त्याचवेळी भाजपाला शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करायचं होतं कारण शिवसेनेला सत्तेबाहेर काढलं तर राष्ट्रवादीने विपुल प्रमाणात वाटाघाटी केल्या असत्या. ते भाजपाला नको होतं. आणि पुढे जाऊन ती बोलणी फिसकटली. त्यामुळे आशिष शेलार जे म्हणालेत ते 100 टक्के खरं आहे." असं ते म्हणाले.
'राजकीय गोंधळ निर्माण करण्याची व्यूहरचना'
सकाळच्या राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर यांना मात्र हे वक्तव्य राजकीय गोंधळ निर्माण करण्याची व्यूहरचना वाटते. "शिवसेना हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेली त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. हे सतत विविध मार्गाने उजवून देण्यासाठी आशिष शेलार यांनी अत्यंत हुशारीने हे वक्तव्य केलं आहे. मात्र 2017 मध्ये असं काय झालं होतं की ज्यामुळे भाजपला शिवसेनेबरोबर युती करावीशी वाटली हेही शेलार यांनी स्पष्ट करावं."असं त्या म्हणाल्या.
राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो हे सध्याच्या सरकारमुळे सिद्ध झालेलं आहेच. पण सगळ्यांनाच सगळ्यांशी युती करावीशी वाटली तर विरोधी पक्षात कोण राहील हाही प्रश्न उरतोच असंही नानिवडेकर यांना वाटतं.
नानिवडेकरांच्या मताला सुधीर सूर्यवंशी यांनीही दुजोरा दिला. "आताच्या या सरकारला अडीच वर्षं झाली आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सरकारमध्ये अविश्वास निर्माण करण्यासाठी शेलार यांनी असं वक्तव्य केलं आहे." असं ते म्हणाले.
भूतकाळातून काढलेला हा राजकीय बाण किती घाव घालतो हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)