You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'अमित शहांनी लिहिलंय शिवाजी महाराजांवर पुस्तक' - #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. अमित शहांनी लिहिलंय शिवाजी महाराजांवर पुस्तक-फडणवीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास केल्याचं आणि त्यावर एक पुस्तक लिहिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मंगळवारी (26 एप्रिल) 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुंबईत बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास केला आहे. अनेक तास ते यावर बोलू शकतात. त्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे."
'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या पुस्तकातून अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे. भाजपाची वाटचाल आणि त्यात अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे असं फडणवीस म्हणाले.
2. प्रबोधनकार वाचा, मग कळेल विचारधारा- शरद पवार
"छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा हाच महाराष्ट्राचा आधार आहे. तुम्ही सभेत फुले-शाहू-आंबेडकर यांचीच नावे घेता, असे कुण्या एका नेत्याने म्हटले. या नेत्याने प्रबोधनकार ठाकरे यांचे सामाजिक परिवर्तनाबाबतचे उत्तम लिखाण वाचावे, म्हणजे असे प्रश्न पडणार नाहीत," असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान पवारांवर टीका केली होती.
महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टीचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) रौप्य महोत्सवी अधिवेशनाच्या उदघाटन समारंभात बोलत होते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, "देशात अनेकांची राज्य होऊन गेली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले राज्य हे भोसलेंचे राज्य नव्हते ते रयतेचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यामुळे तीनशे वर्षानंतरही सर्वसामान्यांच्या अंत:करणात स्थान निर्माण करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्व, योगदान सांगण्याची गरज नाही."
3. बच्चू कडूंवर अपहाराचा आरोप, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूंविरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. कलम 156/3 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा हा आरोप होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचितनं केला होता. वंचितनं यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर वंचित बहुजन आघाडीनं राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडूंवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याची मागणी अकोला पोलिसांकडे केली आहे.
4. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, पंतप्रधानांनी बोलावली बैठक
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी 12 वाजता सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. गेल्या एका आठवड्यापासून देशात दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वात मोठी चिंता राजधानी दिल्लीची आहे, जिथे दररोज 1 हजारांहून अधिक केसेस येत आहेत. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात ही बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती होण्याची शक्यता आहे. अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यावेळी टास्क फोर्समधील बहुतांश डॉक्टरांनी मास्कबाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या दुपारी पंतप्रधानांसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची व्हीसी होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिका-यांशी संवाद साधणार आहेत.
5. राज ठाकरेंच्या सभेवर बंदी घालावी- प्रकाश आंबेडकर
"राज ठाकरे यांच्या सभेला विरोध कायम आहे, शासनाने सभेवर बंदी घालावी. राज्य सरकार दबावाखाली असल्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांवरील ईडी व सीबीआयची चौकशी वाचविण्यासाठी राज्य सरकार हा खेळ करीत आहे", अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
"भाजप आणि मनसेची भूमिका हीच राज्य सरकारची भूमिका असल्याची शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात काही तरी घडण्याची शक्यता आहे. 3 मे ला काहीतरी घडणार असे वाटते. परंतु, राज्य सरकारने विरोधी पक्षाच्या बैठकीत काहीही बोलण्याची संधी दिले नसल्याने, आम्ही 1 मे ला शांती मार्च राज्यात काढणार आहोत," असेही आंबेडकर म्हणाले. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यासंदर्भात परवानगी दिली आहे. तो आदेश केंद्र सरकारला व इतर राज्य सरकारला लागू आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत भोंग्यासंदर्भात धोरण ठरविण्याबाबत राज्य सरकार हे केंद्र सरकारला आवाहन करणार आहे".
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)