You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंनी 'कमबॅक' केलंय का?, 'मला काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे'
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून फारसे सक्रिय नसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'कमबॅक' केलं आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना ते प्रत्यक्षात उपस्थिती लावताना दिसत आहेत. सध्या राज्यात हनुमान चालिसा पठण आणि हिंदुत्वाचे मुद्दे गाजत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्टच्या कार्यक्रमात बोलताना या सर्वाचा समाचार घेतला.
"शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय. अतिरेक्यांना बजवणारा हवाय. हा कुठला घंटाधारी हिंदुत्ववादी?" यावर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,
"सगळ्यांचा एकदाच सोक्षमोक्ष लावायचा आहे. त्यासाठी मी लवकरच एक सभा घेणार आहे. हे नवहिंदू आलेत. तेरी कमीज मेरे कमीज से भगवी कैसे ? हा त्यांचा पोटशूळ. त्यांचा समाचार घ्यावा लागेलच...! "
मुख्यमंत्र्यांच्या हा इशारा म्हणजे, काही दिवस तब्येतीच्या कारणास्तव दूर असलेले मुख्यमंत्री पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत का? याचा महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेला कसा फायदा होणार आहे?
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
बेस्टच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप, राज ठाकरे, राणा दाम्पत्य, भोंगे आणि हनुमान चालिसावरून सुरू असलेलं राजकारण या सगळ्याला उत्तर दिलं.
- बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीचीही किंमत देत नाही. घंटाधारी हिंदुत्व नको. आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. हनुमान चालीसा म्हणा. रामदासांनी पण म्हणून ठेवला आहे भीमरूपी महारुद्रा हे काय असते... जर तुम्ही अंगावर आलात तर हे दाखवायला शिवसेना कमी पडणार नाही. कारण आमचं हिंदुत्व हे 'गदाधारी' नाही तर हनुमानाच्या गदेसारखं आहे.
- आमच्या घरात येऊन हनुमान चालीसा म्हणायची असेल तर जरूर येऊ शकता. दिवाळी असो वा दसरा आमच्याकडे साधूसंत येत असतात. पण ते बोलून येतात. दादागिरी करून याल तर ती कशी मोडायची हे आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी चांगलं शिकवलं आहे.
- मला लवकरच सभा घ्यायची आहे मास्क काढून बोलायचंं आहे सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. हे तकलादू हिंदुत्व आलेले नव्हे हिंदू आहेत. काम काही नाही, करायचे काही नाही. बिनकामाचे भोंगे वाजवायचे हा त्यांचा उद्योग आहे. त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही.
मुख्यमंत्रीपदाचा भार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती नोव्हेंबर महिन्यात मानेच्या त्रासामुळे एक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर जवळपास महिनाभर मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण त्या दरम्यानही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार सोडलेला नव्हता.
"मुख्यमंत्री हे आजारपणामुळे त्रस्त आहेत. कामंही रखडलेली आहेत त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज सोडून दुसऱ्या कोणाला तरी द्यावा अशी मागणी वारंवार विरोधी पक्षाकडून होत होती.
त्यादरम्यान झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहता आलं नाही. अधिवेशनात एकही दिवस उपस्थित न राहाणारे उद्धव ठाकरे हे पहिले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री ठरले.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली, पण शेवटच्या दिवशी त्यांनी सभागृहात राजकीय भाषण केलं. त्यानंतर पुन्हा महिनाभर ते शांत राहीले. पण आता ते सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय व्हायला लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या 'कमबॅक'चा फायदा होईल?
झेंडावंदन सोडलं तर वर्षभर मंत्रालयात न आलेल्या मुख्यमंत्र्यांवर घरून काम करण्यावरून प्रचंड टीका होत होती. 13 एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक मंत्रालयात आले. त्यांनी विविध विभागांच्या बैठका घेतल्या, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि मंत्रालयाच्या विविध भागात जाऊन कामाचा आढावा घेतला. सार्वजनिक कार्यक्रमात ते प्रत्यक्षात उपस्थित राहून ते भाषण करू लागले आहेत.
राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा प्रकरणात जमलेल्या शिवसैनिकांसाठी ते वर्षावरून मातोश्रीवर पोहचले. त्यांची विचारपूस केली. रात्री उशिरा त्यांना घरी जाण्याचं आवाहनही केलं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमासाठी मुंबईत असताना त्या कार्यक्रमाला न जाता उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीच्या बाहेर ठाकरेंसाठी बसलेल्या आजींच्या घरी गेले.
केंद्राच्या गळ्यात भोंग्यांची घंटा
मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. मशिदीवरील भोंग्यांबाबत एकतर्फी निर्णय घेण्याऐवजी महाविकास आघाडीने सर्वपक्षीय बैठक घेण्याचा विचार मांडला आणि तशी आमंत्रणंही दिली.
परंतु भाजपा आणि मनसे हे या मुद्द्यावर मत मांडणारे पक्षच अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत आघाडीने हा प्रश्नच केंद्राकडे ढकलून दिला. याबाबत केंद्राने निर्णय घ्यावा आणि सर्वांना सूचना द्याव्यात असं या बैठकीत ठरवण्यात आलं. त्यामुळे एका महत्त्वाच्या संवेदनशील मुद्द्यावर राज्य सरकारनं अलगदपणे अंग काढून घेतलं.
कोल्हापूरने दिलं 'उत्तर'
याच महिन्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची निवडणूक झाली. शिवसेनेची ही परंपरागत जागा काँग्रेसकडे गेल्यामुळे सेनेचे कोल्हापुरातील माजी आमदार राजेश क्षीरसागर नाराज होणं स्वाभाविक होतं. त्यांनी तशी नाराजी व्यक्तही केली.
परंतु पंढरपूरसारखा अनुभव परत नको म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना शांत केलं. ही निवडणूक आपण एकत्र तिन्ही पक्ष लढत आहोत असा संदेश त्यांच्या कृतीतून गेला. भाजपाने जोरदार तयारी केली असली तरी काँग्रेसच्या उमेदवार निवडणुकीत जिंकल्या. आज कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांचे 'किंगमेकर' म्हणून फलक लागले आहेत.
पुन्हा अंगार-भंगार
नवनीत राणा मुंबईत हनुमान चालिसेसाठी आल्यानंतर शिवसेनेने या संधीचा पुरेपूर वापर करुन घेतला. कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांना मातोश्रीवर येण्यापासून रोखलं.
'मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची', 'शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है' सारख्या घोषणा परत देण्याची संधी शिवसैनिकांना मिळाली. शिवराळ घोषणाचांही त्यात समावेश होता.
राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि खार पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
तिथं राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. तसंच, राणा दाम्पत्यावर शासन व्यवस्थेला आव्हान दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यातून कलम 124-अ म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आता राणा दाम्पत्याला 29 एप्रिल 2022 पर्यंत म्हणजे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्यालाही तुरुंगाची हवा खावी लागते आहे.
आरेला कारे
ईडीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपावर कारवाई सुरू झाल्यानंतर शिवसेनेनेही प्रतिकार करायला सुरुवात केली आहे. तीन-चार महिने सुरू असलेल्या संपाला गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील कारवाईनंतर निष्प्रभ करण्यात सरकारला यश आलं. किरिट सोमय्या, नवनीत राणा यांच्यावर थेट खटले दाखल केले जाऊ लागले. नवनीत राणा मुंबईत आल्यावर त्यांच्या खार आणि अमरावतीच्या निवासस्थानांसमोर शिवसेनेने तीव्र निदर्शने केली. एकप्रकारे विरोधकांना प्रत्युत्तर देऊन प्रतिहल्ला देण्याचं कामच सुरू झालं.
जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "महाराष्ट्राला सक्रीय मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव सक्रिय दिसत नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात निश्चित हा प्रश्न होता की, हे कधी सक्रिय होणार? आता त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम वाढवले आहेत. राणा दाम्पत्याच्या प्रकरणात 'आमच्या घरासमोर येऊन हनुमान चालिसा म्हणायची आहे तर म्हणा...' असं म्हणत ते या आंदोलनातील हवा काढू शकले असते. पण त्यांनी ते केलं नाही. यानिमित्ताने बर्याच दिवसांनी शिवसैनिक सक्रिय झाले आणि रस्त्यावर उतरले. यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्येही एक उत्साहाची भावना निर्माण झाली. याचा फायदा होईल की नाही हे आता सांगता येणार नाही. पण येत्या निवडणुकीत हे दिसेल. ही निवडणुकीआधीची तयारी असू शकते. "
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)