You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्वीटरः इलॉन मस्क यांनी एकाच महिलेशी दोनदा लग्न का केलं? त्यांच्या आयुष्यातल्या 7 रंजक गोष्टी
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक, इलेक्ट्रिक कारचे प्रणेते, माणसाला अंतराळात न्यायचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे एलॉन मस्क आता ट्विटरचे सर्वेसर्वा असणार आहेत.
एलॉन मस्क तब्बल 44 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटरचे मालक होतील. बोर्ड ऑफ ट्विटरने याला मंजुरी दिली आहे.
टेस्ला आणि स्पेस-एक्स या कंपन्यांचे कर्तेधर्ते असणाऱ्या एलॉन मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलर्सहून जास्त आहे.
पण या अब्जाधीशाचं आयुष्य कमी रंजक नाहीये. त्यांच्या आयुष्यातल्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
1. सायन्स फिक्शन आणि विजेबद्दल आकर्षण
इलॉन मस्कचा जन्म दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरियात झाला. लहानपणापासून त्यांना सायन्स फिक्शन आणि वीजेवर चालणाऱ्या गोष्टींचं अतोनात आकर्षण होतं. काहींच्या मते हे आकर्षणच पुढे जाऊन त्यांच्या स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांमध्ये परावर्तित झालं.
वयाच्या सतराव्यावर्षी मस्क कॅनडात फिजिक्स आणि अर्थशास्त्र शिकायला गेले. 1992 मध्ये त्यांनी अमेरिकेतल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
2. दोन दिवसात कॉलेज सोडलं
अमेरिकेत पीचडीसाठी प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी मोजून दोन दिवसात कॉलेज सोडून दिलं आणि Zip2 हे ऑनलाईन वर्तमानपत्र काढलं. नंतर त्यांनी ती कंपनी विकून टाकली आणि पेपॅल ही कंपनी स्थापन केली.
2002 साली वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी पेपॅल ही कंपनी, दीड अब्ज डॉलर्सला इबे या कंपनीला विकून टाकली.
3. टेस्लाचे संस्थापक नाही
आज इलॉन मस्क आणि टेस्ला ही दोन नावं समानार्थी वापरली जात असली तरी मस्क यांनी टेस्लाची स्थापना केलेली नाही. ते आधी टेस्लाचे चेअरमॅन होते आणि 2008 साली ते या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.
पेपॅल विकल्यानंतर मस्क यांच्या हातात भरपूर पैसा आला होता. त्यांनी तो पैसा स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांनीमध्ये ओतला. पण सुरुवातीला या दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांना अपयश हाती आलं. स्पेसएक्सला तर एकापाठोपाठ तीन रॉकेट क्रॅश सहन करावे लागले.
4. एकाच महिलेशी दोनदा लग्न
इलॉन मस्क यांची तिनवेळा लग्न झाले आहे, पण त्यांनी एकाच महिलेशी दोनदा लग्न केलं.
मस्क यांचं पहिलं लग्न जस्टीन विल्सन यांच्याशी झालं होतं. त्या फँटसी लेखिका होत्या. त्यांचं लग्न 2000 साली झालं आणि घटस्फोट 2008 साली झाला.
त्यानंतर 2010 मध्ये मस्क यांनी टुलाह रायली यांच्याशी लग्न केलं. पण दोनच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.
पण त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2013 साली त्या दोघांनी पुन्हा लग्न केलं. पण हे लग्न-घटस्फोट-लग्न चक्र इथेच थांबलं नाही. 2014 साली मस्क यांनी पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला आणि मागे घेतला.
2016 साली टुलाह रायली यांनी पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ते वेगळे झाले.
असं म्हणतात की रॉबर्ट डाऊनी ज्युनियर या अभिनेत्याने आपल्या आयर्न मॅन या सिनेमातल्या पात्रासाठी इलॉन मस्क यांच्या लहरीपणावरून प्रेरणा घेतली आहे.
2018 साली कॅनडाची पॉप गायिका ग्राईम्स (खरं नाव क्लेअर बुचर) आणि मस्क एकत्र आले.
5. कोणालाही उच्चारता येणार नाही असं ठेवलं मुलाचं नाव
ग्राईम्स आणि मस्क गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांना 2020 साली एक मुलगा झालं. त्याचं नाव काय म्हणाल तर X Æ A-12.
ज्यावेळी या दोघांनी बाळाच्या नावाची घोषणा केली तेव्हा ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात सगळे जण हाच प्रश्न विचारत होते की या नावाचा उच्चार नक्की करायचा कसा?
ग्राईम्सने या नावाचं स्पष्टीकरण नंतर ट्विटरवर दिलं.
आता ग्राईम्स आणि मस्कही वेगळे राहात असल्याचं मस्क यांनी एका इंटरव्ह्यूत म्हटलं.
न्यूयॉर्कच्या पेज सिक्स या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, "आमचं एकमेकांवर प्रेम आहे पण आमच्या दोघांच्या कामानिमित्ताने आम्हाला फार काळ एकत्र राहाता येत नाही. आम्ही दीर्घ काळ एकमेकांपासून लांबच राहातो, त्यामुळे जवळपास वेगळे झालो आहोत."
6. अंतराळात पाठवली स्पोर्ट्स कार
2018 साली मस्क यांच्या कंपनीने फाल्कन हेव्ही नावाचं रॉकेट अंतराळात पाठवलं. ते साधारण 154 सेकंद अंतराळात झेपावलं, आणि त्यानंतर तिथेच सोडून देण्यात आलं. जसं जसं रॉकेटच्या मुख्य भागातून इतर भाग गळून पडत होते, तसं तसं एक नवं दृश्य जगाला दिसलं.
एक लाल रंगाची इलेक्ट्रिक स्पोर्टस कार. ही कार अंतराळात फेकली गेली होती.
या सगळ्याच्या मागे अर्थात होते मस्क. ती कारही टेस्लाचीच होती. या कारमध्ये 'स्पेस ओडिटी' हे गाणं वाजत होतं. आता अनंतकाळापर्यंत अंतराळात वाजत राहील.
याबद्दल बोलताना मस्क म्हणाले होते, "हा येडपटपणा होता हे खरं. पण आयुष्यात असा गमतीशीर वेडेपणा करणं खूप गरजेचं आहे."
7. थायलंडच्या गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवणाऱ्यावर बाललैंगिक शोषणाचे आरोप
2018 साली थायलंडच्या गुहेत अडकलेली ती लहान मुलं आठवतात का? उत्तर थायलंडमध्ये चियांग राय भागात थाम लुआंग गुहांमध्ये 23 जूनला 12 मुलं आणि त्यांचे 25 वर्षांचे प्रशिक्षक फुटबॉलच्या सरावानंतर शिरले. पण तेव्हापासून त्यांचा आवाज कुणीच ऐकला नव्हता.
ही मुलं 18 दिवस पाण्याने भरलेल्या एका गुहेत अडकली होती. तसंच यांच्या सुटकेसाठी गेलेल्या एका डायव्हरचा मृत्यूही झाला होता.
या मुलांची नंतर सुखरूप सुटका झाली. यात एका ब्रिटीश डायव्हरने, व्हर्नन अनस्वर्थने मोलाची भूमिका बजावली. पण इलॉन मस्क यांनी या डायव्हरवर बाललैंगिक शोषणाचे सनसनाटी आरोप केले होते. हे आरोप त्यांनी ट्विटरवर केले होते
मस्क म्हणाले होती की व्हर्नन लहान मुलांवर बलात्कार करतात. यावरून व्हर्नन यांनी मस्क यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावाही ठोकला होता.
त्यांनी 19 कोटी डॉलर्सची भरपाई मागितली होती. मस्क यांनी नंतर हे ट्वीट डिलीट केले आणि व्हर्नन यांची माफी मागितली. कोर्टातही त्यांनी व्हर्ननची माफी मागितली. ज्युरींनी मात्र निर्णय दिला की मस्क यांच्या बोलण्यातून व्हर्नन अनस्वर्थ यांची बदनामी झालेली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)