You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इलॉन मस्क बनले जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती
इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय.
टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलंय. गुरुवारी, 7 जानेवारी 2021 रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि मस्क थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले.
याआधी 2017 सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते स्थान आता इलॉन मस्क यांच्याकडे आलंय.
इलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचं मूल्य यंदा प्रचंड वाढलंय. मंगळवारी (5 जानेवारी 2021) टेस्लाचं बाजारमूल्य (Market Value) पहिल्यांदाच 700 बिलियन डॉलरवर पोहोचलं.
विशेष म्हणजे, टेस्लाचं हे बाजारमूल्य टोयोटा, फोक्सवॅगन, ह्युंदाई, जनरल मोटर्स आणि फोर्ड यांच्या एकत्रित बाजारमूल्यापेक्षाही जास्त आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देणारं एक ट्वीट करण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क यांनी आपल्या नेहमीच्या शैलीतच या ट्वीटला दोन रिप्लाय दिले. पहिला रिप्लाय होता, 'हाऊ स्ट्रेंज' आणि दुसरा रिप्लाय होता, 'वेल, बॅक टू वर्क'.
यूएस सिनेटच्या आगामी सत्रामुळे तर इलॉन मस्कच्या पथ्थ्यावर पडलंय.
वेड्बश सिक्युरिटीजचे डॅनियल इव्ह्स म्हणतात, "ब्ल्यू सिनेट टेस्ला कंपनीसाठी 'गेम चेंजर' ठरेल. किंबहुना, इलेक्ट्रिक कारच्या निर्मिती क्षेत्रालाच महत्त्वाचं ठरेल."
इलेक्ट्रिक व्हेइकल टॅक्स क्रेडिटमुळे तर टेस्लाला फायदाच होईल आणि आता टेस्लाची बाजारावर असलेली पकड आणखी मजबूत होईल, असंही इव्ह्स म्हणतात.
दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जेफ बेजोस यांची संपत्ती वाढतच आहे. त्यात कोरोनाच्या काळात तर अमेझॉनला अधिक प्रतिसाद मिळाला. मात्र, जेफ बेजोस यांनी घटस्फोटानंतर पत्नीला आपल्या संपत्तीतला चार टक्के वाटा दिला. याच कारणामुळे इलॉन मस्क यांना बेजोस यांच्या पुढे जाता आलं.
नव्या नियमनांचा अर्थ असा की, अमेझॉनच्या स्टॉकमध्ये वाढ झाली नाही, जी इतरवेळी होण्याची शक्यता होती.
बीबीसीचे तंत्रज्ञानविषयक प्रतिनिधी रॉरी सेलान-जोन्स यांचं विश्लेषण
टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी केवळ एका वर्षाचा नफाच मिळवला आहे आणि ते टोयोटो, अमेझॉनच्या तुलनेत अगदी नगण्य असूनही, सर्वात श्रीमंत ठरले आहेत.
2020 या वर्षात टेस्लाचे शेअर्स सातपटीने वाढले आणि त्यामुळे त्यांना जेफ बेजोस यांना मागे सारून पहिल्या स्थानी जाता आलं, हे खरं आहे. मात्र, केवळ 12 महिन्यात इलॉन मस्क यांची संपत्ती इतकी वाढू शकते, असं म्हणणं तर्कहीन ठरेल.
याचाच अर्थ, इलॉन मस्क यांना आता आगामी 5 वर्षात टेस्ला इतर सर्व कार कंपन्यांच्या एकत्रित नफ्याइतका नफा कमवू शकते, हे दाखवून द्यावं लागेल.
मात्र, हेही खरंय की, इलॉन मस्क यांना ज्यांनी ज्यांनी कमी लेखलं, त्यांना त्यांनी खोटं ठरवून धक्के दिलेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)