You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे किडनी विक्री प्रकरण: 15 लाख रुपयांसाठी किडनी विकली, पण पैसे न देताच एजंट फरार
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
"मला दोन मुलं आहेत. त्यातला थोरला मुलगा कर्णबधीर आहे. माझे पती 18 वर्षांपूर्वी वारले. त्यामुळे मला पैशांची गरज होती. मी माझ्या मुलांसाठी किडनी द्यायला तयार झाले."
सारिका सुतार सांगत होत्या. सारिका यांनी त्यांची किडनी ट्रान्सप्लॅन्टसाठी दिली, तर 15 लाख रुपये मिळतील असं एका एजंटने सांगितलं.
सारिका या कोल्हापूरच्या रहिवासी आहेत. त्यांच्या पतीचं 18 वर्षांपूर्वी निधन झालं. घरी दोन मुलं आहेत. थोरला 23 वर्षांचा मुलगा कर्णबधीर आहे, तर दुसरा 22 वर्षांचा मुलगा छोटी मोठी कामं करतो. सारिका अशिक्षित आहेत. कोल्हापूरमध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं त्या काम करायच्या.
एका एजंटने त्यांनी गरजू व्यक्तीला किडनी दिली, तर 15 लाख रुपये देऊ असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात ऑपरेशन झाल्यानंतर त्याने साडेचार लाख रुपये दिले. 15 लाखांची बोलणी झालेली असताना एजंट साडेचार लाख रुपये देत असल्यानं सारिका यांच्या बहिणीने पैसे घेतले नाहीत. त्यांनी 15 लाखांची मागणी केल्यानंतर एजंट फरार झाला.
ही सगळी घटना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घडली. याप्रकणी सारिका यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तर रुबी हॉल क्लिनिककडून देखील पोलिसांना पत्र लिहीत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लॉकडाऊनपासून कहाणीस सुरुवात
सारिका यांची कहाणी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनच्या आधीपासून सुरू होते. सारिका यांची घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांनी त्यांच्या वस्तीतील एका महिलेला त्यांची कैफियत सांगितली. एक माणूस पैशांची मदत करेल असं म्हणून ती महिला सारिका यांना पुण्याला घेऊन आली.
पुण्यात एका हॉटेलमध्ये ज्यांना किडनी हवी आहे ते अमित साळुंखे आणि त्यांच्यासोबत रवी नावाचा एजंट आला होता. तुम्हाला जेव्हा बोलवू तेव्हा परत या, असं त्याने सारिका यांना सांगितलं. त्यावेळी काम काय असेल हे त्याने सांगितलं नव्हतं.
सहा महिन्यांनी त्या एजंटने सारिका यांना पुण्याला बोलावलं. पण, सारिका यांच्या आईला कोरोना झाला होता, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा बोलावण्यात आलं. एजंट सारिका यांना साळुंखेंच्या घरी घेऊन गेला. तिथे किडनीच्या बदल्यात 15 लाख देऊ असं सांगण्यात आलं. हॉस्पिटलचा सर्व खर्च देखील साळुंखे करणार होते.
सारिका बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, ''माझ्यामुळे त्याचं काम होणार होतं आणि माझी सुद्धा पैशाची गरज भागत होती म्हणून मी किडनी देण्यासाठी तयार झाले. मी काही शिकलेली नाही. त्या एजंटने मी अमित साळुंखे यांची बायको आहे असं दाखवणारी कागदपत्रं तयार केली.
''मला त्यांनी साळुंखेच्या बायकोचं नाव लिहायला शिकवलं. त्यांनी जिथं सांगितलं तिथं मी ते नाव लिहीलं.''
सारिका पुढे सांगतात, ''माझी खोटी कागदपंत्र त्यांनी तयार केली. ऑपरेशनच्या वेळी तुमच्या घरच्यांना पैसे देऊ असं एजंट म्हणाला. माझी बहीण हॉस्पिटलला यायच्या आधी त्यांनी मला ऑपरेशन थिअटरमध्ये नेलं. ऑपरेशन झाल्यावर साडेचार लाखाच्या वरती देणार नाही असा तो एजंट म्हणाला.
"आम्ही नको म्हणालो आणि पैसे घेतले नाही. त्यानंतर तो एजंट पळूनच गेला. त्याने फोन सुद्धा बंद केला. माझ्या बहिणीने मग इतर नातेवाईकांना बोलावून घेतलं त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली."
सारिका यांची बहिण कविता कोळे म्हणाल्या, ''24 मार्चला ऑपरेशन झालं. ऑपरेशननंतर एजंट साडेचार लाख रुपये मला देत होता. बहिणीशी एवढाच व्यवहार झाल्याचं तो म्हणाला. तसंच 15 लाख देत नाही काय करायचं ते करा,'' असंसुद्धा तो म्हणाल्याचं कोळे सांगतात.
याप्रकरणी सारिका आणि त्यांच्या बहिणीने कोरोगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ म्हणाले, "सारिका यांनी तक्रार अर्ज आमच्याकडे दिला आहे. त्यानुसार ससून हॉस्पिटलची जी कमिटी असते त्यांना आम्ही कळवलं आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालकांना देखील कळवण्यात आलं आहे.
"कायद्याप्रमाणे त्यांना अशा घटनांमध्ये दखल घ्यायचा अधिकार आहे. पुढच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ते आम्हाला अहवाल देतील. तो अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल."
सारिका यांनी तक्रार केल्यानंतर 29 मार्चला रुबी हॉल क्लिनिकने देखील कोरेगाव पोलीस स्टेशनला एक पत्र दिले आहे.
"डिस्चार्जच्या वेळी सारिका यांनी आपण अमित साळुंखे यांच्या पत्नी नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी सारिका सुतार नावाचे आधार कार्ड दाखवलं आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, पोलीस व्हेरीफिकेशन झाल्यानंतरच सर्जरी करण्यात आली. ससूनच्या ऑरगन ट्रान्सप्लॅन्ट कमिटीने ही सर्जरी करण्यासाठी परवानगी दिली होती. हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्यानं याबाबत तपास करावा", असं रुबी हॉलने पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना रुबी हॉल क्लिनिकच्या कायदेशीर सल्लागार अॅड. मंजूषा कुलकर्णी म्हणाल्या, "त्या महिलेने जी कागदपत्रे दिली त्यात त्या महिलेचे नाव सुजाता अमित साळुंखे असंच होतं. तिने सुद्धा ती अमित साळुंखे यांची पत्नी असल्याचं दाखवलं. तिने दाखवलेल्या आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पोलीस पडताळणीमध्ये ती अमित साळुंखे यांची पत्नी असल्याचे सिद्ध होत होतं. हीच कागदपत्रं ससूनच्या कमिटीकडे पाठवण्यात आली होती.
''त्या कमिटीसमोर देखील हे नवरा बायको असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला सर्जरीला परवानगी मिळाली. सर्जरीनंतर तिच्या बहिणीने डिस्चार्ज कार्डवरचं नाव बदलायची मागणी केली. त्यावर तिला सारिका सुतार नाव हवं होतं. तेव्हा यात काहीतरी चुकीचं घडत असल्याचं आम्हाला वाटलं आणि आम्ही पोलिसांना याबाबत माहिती दिली. अमित साळुंखे आणि या महिलेमध्ये कुठला व्यवहार झाला याबाबत आम्हाला माहिती नाही.''
अवयव दान कोणाला करता येतं?
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार भारतात अवयव दान करता येऊ शकतं. ब्रेन डेड व्यक्तीचे नातेवाईक मृत व्यक्तीचे मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादूपिंड, हृहय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप, कानाचे ड्रम दान करू शकतात. पण, अवयवांचा व्यापार करणं किंवा विकणं कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे.
जिवंत व्यक्ती फक्त तिच्या जवळच्याच नातेवाईकांसाठी अवयव दान करू शकते. रुग्णाचे आई, वडील, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, पती किंवा पत्नी रुग्णाला अवयव दान करू शकतात.
अवयव प्रत्यारोपण करण्यापूर्वी ते रुग्णाचे जवळचे नातेवाईक आहे हे त्यांना सिद्ध करावं लागतं. जर जवळचे नातेवाईक नसतील तर दात्याला सरकारी कायदेशीर कमिटीकडून परवानगी घ्यावी लागते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)