रुग्णाच्या शरीरातून काढली चक्क साडेसात किलो वजनाची किडनी

दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी एका रुग्णाच्या शरीरातून तब्बल साडेसात किलो वजनाची (7.4किलो) किडनी काढली आहे.

भारतात आजवर सर्जरी करून काढण्यात आलेल्या किडनींपैकी ही सर्वात जास्त वजनाची असल्याचं सांगितलं जात आहे.

साधारणपणे किडनीचं वजन 120 ते 150 ग्रॅमपर्यंत असतं. मात्र, Autosomal Dominant Polycystic Kidney Disease या मूत्रपिंडाच्या ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या किडनीभोवती गाठी तयार होऊ लागतात. यामुळे किडनीचं वजन वाढतं.

हा आजार असलेल्या रुग्णांच्या किडनी या सहसा जास्त वजनाच्या असतात. मात्र, जोवर मूत्रसंसर्ग किंवा अंतर्गत रक्तस्त्राव होत नाही तोवर किडनी काही प्रमाणात तरी फिल्टरिंगचं कार्य करतच असते आणि म्हणून ती काढली जात नाही, असं सर गंगाराम हॉस्पिटलमधले डॉक्टर सचिन कथुरिया यांनी सांगितलं.

त्यांनी म्हटलं, "या रुग्णाला बराच संसर्ग झाला होता. त्याचं शरीर अँन्टिबायोटिक औषधांनाही प्रतिसाद देत नव्हतं. शिवाय, किडनीचा आकार मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याला श्वास घेतानाही त्रास होऊ लागला होता. त्यामुळे आमच्याकडे किडनी काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता."

ज्यावेळी सर्जरी सुरू होती तेव्हा रुग्णाची किडनी मोठी असणार, याची कल्पना डॉक्टरांना होती. मात्र ती इतकी मोठी असेल, याचा अंदाज नव्हता. रुग्णाची दुसरी किडनी तर याहूनही मोठी असल्याचं डॉक्टर सांगतात.

गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये आजवर नोंद करण्यात आलेली सर्वात वजनी किडनी साडे चार किलोची आहे. मात्र, युरोलॉजी जर्नल्समध्ये याहूनही अधिक वजनाच्या किडनींची नोंद आहे. अमेरिकेतल्या एका रुग्णाची किडनी 9 किलोची होती तर नेदरलँडमध्ये एकाची किडनी 8.7 किलो वजनाची होती.

या किडनीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा डॉक्टरांचा विचार असल्याचं डॉ. कथुरिया यांनी सांगितलं.

इंग्लंडच्या नॅशनल हेल्थकेअर सर्व्हिसच्या वेबसाईटनुसार 'पॉलिसिस्टिक किडनी' डिसॉर्डर हा अनुवांशिक आजार आहे. रुग्ण 30 ते 60 या वयोगटात असताना या आजारामुळे समस्या उद्भवतात.

या आजारात किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. किडनीचं कार्य हळूहळू मंदावतं आणि शेवटी किडनी बंद पडते म्हणजेच 'किडनी फेल्युअर' होतं.

समाजात हृदय रोगांविषयी बरीच जागरुकता आहे. मात्र, किडनीसंबंधीचे आजारही बळावत आहेत. त्यामुळे किडनीविषयक जागरुकताही आवश्यक आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)