You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डुकराचं हृदय बसवलेल्या व्यक्तीचा मृत्यू
शस्त्रक्रियेद्वारे डुकराचं हृदयरोपण करण्यात आलेल्या जगातल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय.
डेव्हिड बेनेट यांना हृदयविकाराचा त्रास होता. शस्त्रक्रियेद्वारे त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड डुकराचं हृदय बसवण्यात आलं होतं. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेत ही शस्त्रक्रिया पार पडली होती.
पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावू लागल्याचं बाल्टिमोरमधल्या त्यांच्या डॉक्टर्सनी सांगितलं. बेनेट यांचं शस्त्रक्रियेच्या दोन महिन्यांनी 8 मार्चला निधन झालं.
या शस्त्रक्रियेतले धोके बेनेट यांना माहिती होते. आणि हे अंधारात तीर मारण्यासारखं असल्याचं त्यांनी शस्त्रक्रियेपूर्वी म्हटलं होतं.
10 जानेवारी 2022 रोजी जगामध्ये प्रथमच अमेरिकेतील एका व्यक्तीच्या शरीरात अनुवांशिक बदल करण्यात आलेल्या डुकराचं हृदय ट्रान्सप्लान्ट (प्रत्यारोपित) करण्यात आलं होतं.
बाल्टिमोरमध्ये तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी 57 वर्षीय डेव्हिड बेनेट यांची प्रकृती सुधारत असल्याचं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं.
"हे ट्रान्सप्लान्ट माझ्यासाठी 'करा किंवा मरा' असं होतं. मला माहिती आहे की, हे अंधारात बाण मारण्यासारखं आहे, पण हीच माझी अखेरची संधी आहे," असं बेनेट यांनी सर्जरीच्या आधी म्हटलं होतं.
बेनेट यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली नसती तर ते वाचू शकले नसते. त्यामुळंच युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांना अमेरिकेच्या आरोग्य नियंत्रकानं ही शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली होती.
महत्त्वाचं यश
हे ट्रान्सप्लान्ट करणाऱ्या मेडिकल टीमनं अनेक वर्षांच्या संशोधनाच्या आधारे हा प्रयोग पूर्ण केला आहे. यात यश मिळाल्यास जगात अनेक लोकांचं जीवन बदलू शकतं.
अवयवांच्या तुटवड्याच्या संकटावर तोडगा काढण्याच्या दिशेनं या शस्त्रक्रियेद्वारे एक पाऊल पुढं टाकलं असल्याचं, युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसीननं सर्जन बार्टले पी. ग्रिफीथ यांच्या हवाल्यानं एका निवेदनात म्हटलं होतं.
अमेरिकेत दररोज अवयवांच्या प्रत्यारोपणाची वाट पाहत असलेल्या जवळपास 17 जणांचा मृत्यू होतो. एक लाखांपेक्षा अधिक लोक सध्या प्रतीक्षा यादीत आहेत.
हा तुटवडा भरून काढण्यासाठी प्राण्यांचे अवयव वापरण्याबाबत फार पूर्वीपासून शक्यता तपासल्या जात आहेत. याला जेनोट्रान्सप्लान्टेशन म्हटलं जातं. डुकराच्या हृदयातील हार्ट वॉल्व्हचा वापर ही आता सामान्य बाब बनली आहे.
न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये डॉक्टरांनी डुकराची किडनी एका व्यक्तीमध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित केल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी या क्षेत्रात ती शस्त्रक्रिया सर्वांत मोठा प्रयोग होती.
मात्र, त्यावेळी ज्या व्यक्तीमध्ये ही किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली होती, तो ब्रेन डेड होता आणि तो बरा होण्याची शक्यताही नव्हती.
या ट्रान्सप्लान्टनंतर आता उर्वरित जीवन जगता येईल, अशी आशा बेनेट यांना होती. या शस्त्रक्रियेसाठी ते गेल्या सहा आठवड्यांपासून बेडवर होते.
गंभीर हृदय रोगामुळं त्यांना यंत्राच्या सहाय्यानं जीवंत ठेवण्यात आलेलं होतं. मी बरा झाल्यानंतर बेडमधून बाहेर येण्यासाठी उत्सुक असल्याचं, बेनेट यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं.
बेनेट स्वतः श्वास घेत असल्याचं (10 जानेवारी 2022 ) डॉक्टरांनी सांगितलं होतं.
"आम्ही यापूर्वी मानवी शरीरात असं कधीही केलं नव्हतं. मला वाटतं आम्ही एक चांगला पर्याय दिला आहे. आता पुढे काय होणार हे पाहायचं आहे. बेनेट किती दिवस, महीने अथवा वर्षे जीवंत राहतात हे माहिती नाही," असं ग्रिफिथ म्हणाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)