You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उपचार: स्वत:च्या फुफ्फुसांचे तुकडे देऊन पती आणि मुलाने वाचवला महिलेचा जीव
कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर हल्ला करतो. जगभरात कोरोना संसर्गामुळे अनेक रुग्णांची फुफ्फुसं निकाम झाली. तर, काहींच्या फुफ्फुसांची क्षमता कोव्हिड-19 संसर्गामुळे कमी झाल्याचं आढळून आलंय.
जपानमध्ये कोव्हिड-19 संसर्गामुळे एका महिलेचं फुफ्फुस निकाम झालं होतं. पण, डॉक्टरांनी या महिलेवर यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आहे. कोरोनाबाधित असताना फुफ्फुस प्रत्यारोपण होणारी, ही पहिली महिला ठरली आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संसर्गामुळे या महिलेच्या फुफ्फुसाला इजा झाली होती.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जिवंत व्यक्तीकडून या महिलेला फुफ्फुसांचा काही भाग देण्यात आला. सामान्यत: मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान केल्यानंतर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते.
या महिलेचा मुलगा आणि पतीने आपल्या फुफ्फुसांचा काही भाग या महिलेला दान केला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या कोरोनाग्रस्त महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना, ती काही दिवसात पूर्ण बरी होईल अशी आशा आहे.
जपान आणि जगभरात फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी खूप लोक प्रतीक्षेत आहेत.
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेवर जपानच्या क्योटो विद्यापीठ रुग्णालयात तब्बल 11 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. दाता आणि रुग्ण दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं, डॉक्टरांचं म्हणणं आहे.
चीन, यूरोप आणि अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे फुफ्फुस निकामी झालेल्या रुग्णांवर, फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी फुफ्फुस दान केल्यानंतर, कोरोनारुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
पण, जपानमधील डॉक्टर सांगतात, फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे.
डॉक्टर सांगतात, फुफ्फुस प्रत्यारोपण केल्याशिवाय ही महिला जगू शकणार नाही. हे समजल्यानंतर महिलेचा मुलगा आणि पती यांच्या फुफ्फुसांचा काही भाग दान करण्यासाठी पुढे आले. त्यांना फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती देण्यात आली.
थोरॅसिक सर्जन प्रा. हिरोशी यांच्या नेतृत्वाखाली या महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
कयोडो न्यूजशी बोलताना, प्रा. हिरोशी म्हणाले, "कोरोनावर उपचाराची ही नवीन पद्धत आहे. एक पर्याय म्हणून याकडे नक्कीच पहावं लागेल. या उपचारपद्धतीवर आपण आशा ठेऊ शकतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)