वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स: किशोर सूर्यवंशी, किडनी प्रत्यारोपण झालेल्या भारताच्या प्रतिनिधीची गोष्ट

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

17 ते 24 ऑगस्ट दरम्यान वर्ल्ड ट्रांसप्लांट गेम्स स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. जगभरातील विविध अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू किशोर सूर्यवंशी यांचा समावेश आहे.

किडनी निकामी झाल्यानंतर आलेलं नैराश्य झटकून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवलेल्या किशोर यांचा हा प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण राहिला आहे.

नैराश्यामुळे शिक्षण सोडलं...

जून-जुलै 2005चे दिवस. जळगावमधून नुकतेच BBA पदवीधर झाल्यानंतर MBAसाठी त्यांनी काही ठिकाणी अर्ज केला होता. एक दोन ठिकाणच्या मेरिट लिस्टमध्ये त्यांचा नंबरसुद्धा लागला होता. पण अॅडमिशन घेणार नाही, असं त्यांनी ठरवलं.

अगदी महिनाभरापूर्वी कॉलेजमध्ये अर्ज करण्याचा हुरूप, मेरिट यादीची उत्सुकता, फी किती असेल आणि कशी भरावी, या सगळ्या गोष्टींचा विचार ते उत्साहाने करत होते.

पण अचानक त्यांची तब्येत ढासळली. सुरुवातीला घाम फुटणं, छातीत धडधडणं, कमी दिसणं, चेहरा सुजणं, उलट्या होणं असा त्रास जाणवू लागला होता. जेवल्यानंतर लगेचच उलट्या होत असल्यामुळे अशक्तपणाही आला होता.

डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्यानंतर किशोर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं आढळलं. आणि याच्याच उपचारादरम्यान किडनी निकामी असल्याची लक्षणं दिसली. त्यांनी किशोरच्या कुटुंबीयांना किडनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला.

तज्ज्ञ डॉक्टरांनी किशोरसाठीवर डायलिसिस किंवा अवयव प्रत्यारोपण हे दोन उपचार असल्याचं कळवलं. या घडामोडींनी 24 वर्षांचे किशोर सूर्यवंशी खचून गेले.

"तो काळ खूप कठीण होता," ते सांगतात. "MBA करून चांगलं करिअर करण्याचं मी ठरवलं होतं. पण किडनी निकामी झाल्यामुळे मी शिक्षण सोडून द्यायचा निर्णय घेतला. माझ्या शिक्षकांना याबाबत माहिती नव्हती. मी शिक्षण सोडल्यामुळे ते प्रचंड रागावले होते. पण त्यामागचं कारण कळल्यानंतर ते मला भेटायला आले."

बहिणीने दिलं जीवदान

पुढच्या उपचारांसाठी किशोरला मुंबईला KEM रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं डायलिसिस सुरू करण्यात आलं. पूर्णपणे ठीक व्हायचं असेल तर किडनीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदात्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मरणोत्तर अवयवदान करणाऱ्यांची संख्या त्यावेळी कमी असल्यामुळे किशोर यांच्या किडनी सँपलशी मॅच करणारं सँपल मिळण्यात त्यांना अडचणी येत होत्या.

किशोर यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. अखेर त्यांच्या मोठ्या बहिणीनेच त्यांना किडनी देण्याचं ठरवलं.

जळगावात खासगी नोकरी करणारे विश्वनाथ सूर्यवंशी आणि गृहिणी असलेल्या इंदू यांची छाया, संजय, अरुण, किशोर, विनोद आणि माधुरी अशी सहा मुलं. त्यांच्यापैकी मोठी बहीण छायाचे किडनी सँपल किशोरच्या सँपलशी जुळत असल्यामुळे त्यांनी एक किडनी त्याला देण्याचा निर्णय घेतला.

भाऊ किशोरसाठी त्यांनी आपलं सर्वकाही पणाला लावलं, आज त्या एकाच किडनीवर जगत आहे. या कारणामुळे त्यांनी लग्नही केलं नाही.

शस्त्रक्रियेनंतर बदललं आयुष्य

9 ऑगस्ट 2007 ला किशोरची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ते बरेच दिवस घरी बसून होते. हळूहळू सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊ लागल्या, पण या काळात घरी बसून बसून ते खूप कंटाळले होते. म्हणून आता पुढचं आयुष्य वेगळ्या पद्धतीनं जगायचं, असं किशोर यांनी ठरवलं. त्यांनी पुस्तकं वाचली. गिटार शिकले. लेखनही करू लागले.

"शस्त्रक्रियेपूर्वी मला जास्त पाणीही पिता येत नव्हतं. हालचाल करायला मनाई होती. पण शस्त्रक्रियेनंतर माझं दुसरं आयुष्य सुरू झालं. ही माझी बोनस लाईफ आहे, असं मी समजतो. त्यामुळे आता रडत जगण्यापेक्षा सगळं मागे टाकून खुलून आयुष्य जगण्यावर मी भर दिला आहे," असं किशोर सांगतात.

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी त्यांनी बहिणीच्या नावाने छाया किडनी फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली. शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अवयवदानाबाबत लोकांना जास्त माहिती नसल्याचं कळल्यानंतर याविषयी जनजागृती करू लागले.

पुढे आयुष्याला स्थैर्य येण्यासाठी नोकरी सुरू केली. एका व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून काही काळ काम केलं. पुढे एका खासगी कंपनीत काम केलं. लेखनाची आवड असल्यामुळे पुढे एक अॅडव्हर्टाइझिंग कंपनी जॉईन केली. तिथे आता ते अॅड्ससाठी कँपेन तयार करतात, जिंगल्स लिहितात.

मुंबईच्या KEM रुणालयात प्राध्यापक आणि विभागप्रमुख असलेले डॉ. तुकाराम जमाले यांच्याकडे किशोर नियमित तपासणीसाठी जातात. किशोरचं कौतुक करताना डॉ. जमाले सांगतात, "किशोरच्या आयुष्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी. शस्त्रक्रियेनंतरही तो सतत अॅक्टिव्ह राहिला. अवयवदान शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती कशाप्रकारे आनंदी जीवन जगू शकतील, याची प्रचिती तुम्हाला किशोरकडे पाहून येईल."

भारतातलं पहिलं ट्रान्सप्लांट कपल

याच 'बोनस लाईफ'मध्ये किशोर यांची ओळख आरती यांच्याशी झाली. आरती यांचीही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

घरच्यांना याची माहिती देऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यारोपण करणारे सहसा लग्न करत नाहीत. पण यांना पुढचं आयुष्य एकमेकांसोबत जगायचं होतं. 1 जानेवारी 2012 ला दोघांनी लग्न केलं.

आरती-किशोर यांच्या लग्नाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले भारतातले पहिले दांपत्य म्हणून त्यांची नोंद करण्यात आली होती.

पण त्याच वर्षी एप्रिल महिन्यात आरती यांचं निधन झालं. "लग्न करतानाच आम्ही दोघं किती दिवस जगणार आहोत, याबाबत मनात मोठी धाकधूक होती. पण दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता," किशोर सांगतात. "ती थोडी अशक्त आहे, हे माहीत होतं. पण कितीही दिवस मिळतील तरी ते आनंदाने जगू, असा आम्ही विचार केला. संपूर्ण विचाराअंती आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं."

आयुष्य फास्टट्रॅकवर

पण किशोर यांनी खुशाल जगण्याचा उत्साह कायम ठेवला. पुढे त्यांनी आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत धावणे आणि बॅडमिंटन यासारख्या खेळांसाठी तयारी सुरू केली.

किशोर यांनी पुढे धावणे आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये जास्त मेहनत घेतली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांनी 2017 मध्ये 100 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक पटकावलं तर 2018 मध्ये त्याने 50 मीटर सुवर्णपदकावर नाव कोरलं.

गेल्या पाच वर्षांपासून किशोर ट्रान्सप्लांट स्पर्धांमध्ये भाग घेतात. ते सांगतात, "शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यावं की नाही याची मला भीती वाटायची. मात्र तिथं अशा अनेक व्यक्तींना धावताना, खेळताना पाहिल्यानंतर भीती नाहीशी झाली."

देशांतर्गत स्पर्धेतील यशानंतर त्यांनी भारतीय ट्रांसप्लांट संघाच्या व्यवस्थापक रिना राजू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी किशोरची कामगिरी तपासून जागतिक ट्रांसप्लांट गेम्स फेडरेशनकडे त्यासाठी अर्ज केला.

येत्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये धावणे आणि बॅडमिंटन खेळासाठी किशोरची निवड झाल्याचं फेडरेशनने कळवलं. 16 ऑगस्ट रोजी किशोर भारतीय संघासोबत इंग्लंडला रवाना होणार आहे.

वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स म्हणजे काय?

अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ नये, त्यांना जगण्याची नवी ऊर्मी मिळावी यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं.

1978 साली इंग्लंडमध्ये ही स्पर्धा जागतिक पातळीवर पहिल्यांदा खेळवण्यात आली. त्यानंतर दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित होते. 4 ते 80 वर्षं वयोगटातील अवयवदाते आणि ज्यांना अवयव मिळालेत असे रेसिपियंट्स सहभागी होतात.

यंदा भारताकडून या स्पर्धेत 14 जण सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 11 अवयव प्राप्तकर्ता तर 3 अवयवदात्यांचा समावेश आहे, अशी माहिती संघ व्यवस्थापक रिना राजू यांनी दिली.

रिना राजू यांच्यावरसुद्धा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यांनी एकदा या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांच्याकडे भारतीय संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. ट्रान्सप्लांट खेळांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

किशोरबाबत बोलताना त्या सांगतात, "किशोर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला आहे. त्यांचा हा स्पर्धेतील पहिलाच सहभाग आहे. त्यांनी पदक जिंकावं असं वाटत असलं तरी मी त्यांच्यावर जास्त दबाव टाकणार नाही. त्यांनी मनापासून खेळावं. स्पर्धेत नैसर्गिक खेळ करावा, अशी अपेक्षा आहे."

'अवयवदानाबाबत जागरूकता हवी'

"अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये अजूनही अज्ञान आहे. किडनी किंवा एखादा अवयव निकामी झाली म्हणजे सगळं आयुष्य संपलं, असं नाही. शस्त्रक्रियेनंतर तुम्ही पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू शकता," असं डॉ. जमाले सांगतात.

डॉ. जमाले पुढे सांगतात, "ही एक नवी सुरुवात असं समजून तुम्ही पुढचं आयुष्य जगलं पाहिजे. अवयवाची गरज कधी कुणाला भासेल सांगू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी मरणोत्तर अवयवदानासाठी नोंदणी केली पाहिजे."

रिना राजू यांना अवयवदान हे एखाद्या व्यक्तीकडून दिलं जाणारं सर्वश्रेष्ठ गिफ्ट असल्याचं वाटतं. त्या सांगतात, "अवयवदानामुळे सगळं जग एक असल्याचं तुमच्या लक्षात येईल. कोणत्याही जात, धर्म किंवा वंशाची अवयवदानाला मर्यादा नाही. अवयवदानामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)