लक्ष्य सेनचं ऑल इंग्लंड ओपन जेतेपदाचं स्वप्न भंगलं, अॅक्सेलसन विजयी

लक्ष्य सेन, बॅडमिंटन, ऑल इंग्लंड बॅडमिंटन

फोटो स्रोत, Reuters

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यांचे ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. विक्टर अॅक्सेलसनने लक्ष्यला सलग दोन सेटमध्ये हरवले.

डेनमार्कच्या अॅक्सेलसनने पहिला गेम 21-10 ने जिंकला तर दुसरा गेम 21-15 ने जिंकला.

22 मिनिट चाललेल्या या सामन्यात लक्ष्यने सुरुवातीपासून आघाडी घेण्याचे आटोकाट प्रयत्न केले.

पण तरीही अनुभव व्हिक्टरसमोर लक्ष्यचे प्रयत्न अपयशी ठरले. व्हिक्टरने पहिला सेट आपल्या नावे करून सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं.

सामन्यात व्हिक्टर अक्सेलसनचं पारडं सुरुवातीपासूनच जड मानलं जात होतं. त्याने पहिला सेट आपल्या नावावर केल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या सेटमध्ये त्याला जोरदार लढत दिली.

दुसऱ्या सेटमध्ये सामना बरोबरीचा दिसत होता. पण नंतर लक्ष्य मागे पडला. स्मॅश आणि डिफेन्स या दोन्ही आघाड्यांवर व्हिक्टर सरस ठरल्याचं दिसून आलं.

दुसरा सेट सुमारे 31 मिनिटे चालला. त्यामध्ये व्हिक्टरने 21-15 असा विजय मिळवला.

28 वर्षीय व्हिक्टरने गेल्या वर्षी ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेलं आहे. त्यानंतर आता त्याने ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेचं विजेतेपदही आपल्या नावे केलं आहे.

व्हिक्टर अॅलेक्ससन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, व्हिक्टर अॅलेक्ससन

सध्या व्हिक्टर अलेक्ससन हा जगातील क्रमांक एकचा बॅडमिंटन खेळाडू आहे. त्याच्यासमोर 20 वर्षीय लक्ष्यचा अनुभव तोकडा पडल्याचं दिसून आलं.

लक्ष्य सेन कोण आहे?

उत्तराखंड आणि शिखरं यांचं नातं जवळचं आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या राज्याला देवभूमी असंही म्हटलं जातं. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या राज्याचा सुपुत्र लक्ष्य सेन बॅडमिंटनविश्वातल्या प्रतिष्ठित स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचला. त्याने अॅक्सलसेनला कडवी झुंज दिली पण तो पराभूत झाला.

भारतीय बॅडमिंटनचे दोन दिग्गज प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या दोघांनीच ऑल इंग्लंड स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. तब्बल 21 वर्षांनंतर भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचला होता.

पाहिल्यानंतर चित्रपटाचा नायक शोभेल असा दिसणारा लक्ष्य उत्तराखंड जिल्ह्यातील अल्मोराचा. तरुणींच्या हृदयाची धडकन म्हणून रणबीर कपूर ओळखला जातो. तू रणबीरसारखा दिसतोस असं लक्ष्यला अनेकदा म्हटलं जातं. दिसण्याबरोबरीने झळाळत्या कर्तृत्वासह तरुणींना नव्हे तर जगभरातील बॅडमिंटनप्रेमींना लक्ष्यने दखल घ्यायला भाग पाडलं आहे.

लक्ष्यचे बाबा स्वत: बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. पण अल्मोरा बॅडमिंटनच्या नकाशावर जेमतेमच. अगदी लहान वयापासून लक्ष्य अल्मोरापासून हजारो किलोमीटर दूर बंगळुरूत प्रकाश पदुकोण अकादमीत आहे.

भारतीय बॅडमिंटनचे मानबिंदू प्रकाश पदुकोण आणि खेळाडू तसंच प्रशिक्षक म्हणून मोलाचं योगदान देणारे विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन खेळातले बारकावे लक्ष्यने घोटून घेतले. लक्ष्यचा भाऊ चिरागही बॅडमिंटन खेळतो.

लक्ष्य सेन, बॅडमिंटन, ऑल इंग्लंड बॅडमिंटन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लक्ष्य सेन

इंडियन एक्स्प्रेससाठी शिवानी नाईक यांनी लक्ष्यशी संवाद साधला होता, त्यावेळी त्याने सांगितल्यानुसार, लक्ष्यला भेंडीची भाजी आणि आईच्या हातचं मटण आवडतं. अल्मोरापासून 5-6 किलोमीटरवर असलेल्या डोली दाना इथे मिळणारे मटन मोमो प्रचंड आवडतात.

बॅडमिंटनव्यतिरिक्त लक्ष्यला बास्केटबॉल आणि फुटबॉलची आवड आहे. युरोपात जन्म झाला असता तर कदाचित फुटबॉलपटू झालो असतो असं तो सांगतो.

ऑल इंग्लंड स्पर्धा बॅडमिंटन विश्वातली कठीण स्पर्धा मानली जाते. आतापर्यंत प्रकाश नाथ (1947), प्रकाश पदुकोण (1980), पुलेला गोपीचंद (2001), सायना नेहवाल (2015), लक्ष्य सेन (2022) केवळ पाच भारतीय बॅडमिंटनपटूंना या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली आहे. यापैकी केवळ दोघांना म्हणजेच प्रकाश पदुकोण (1980) आणि पुलेला गोपीचंद (2001) यांनाच जेतेपदावर कब्जा करता आला आहे. यातून जेतेपदाचं दुर्मीळत्व लक्षात येतं.

योगायोग म्हणजे गोपीचंद यांची मुलगी आणि अव्वल बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद आणि जॉली त्रेशा या जोडीला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एकाच स्पर्धेत बापलेकीने जेतेपद पटकावण्याची अनोखी संधी होती. मात्र गायत्रीचा पराभव झाल्याने ही संधी थोडक्यात हुकली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रदीर्घ काळ वरचष्मा गाजवणाऱ्या सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंनाही या स्पर्धेच्या जेतेपदाने दूर ठेवलं आहे.

लक्ष्य सेन, बॅडमिंटन, ऑल इंग्लंड बॅडमिंटन

फोटो स्रोत, JUSTIN TALLIS

फोटो कॅप्शन, लक्ष्य सेन

15व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया लक्ष्यने साधली होती. 2018 मध्ये लक्ष्यने युथ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकासह जागतिक स्तरावर छाप उमटवली होती. एकेरी प्रकारात त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं मात्र मिश्र सांघिक गटात लक्ष्यचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

गेल्या वर्षी लक्ष्यने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. भारताच्याच किदंबी श्रीकांतने लक्ष्यवर विजय मिळवला होता.

2018 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत लक्ष्यने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

2019 मध्ये लक्ष्यने डच ओपन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्याच वर्षी सारलोरलूक्स ओपन स्पर्धेच्या जेतेपदावरही त्याने कब्जा केला होता.

काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत लक्ष्य जेतेपदाचा मानकरी ठरला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या जर्मन ओपन स्पर्धेत लक्ष्यला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

ज्युनियर ते सीनियर हे संक्रमण पेलणं अनेकांना कठीण जातं. वरिष्ठ गटात आगेकूच केल्यानंतर स्पर्धा अतिशय तीव्र होते. एखादी छोटीशी चूक आणि स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येतं. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचं वेळापत्रक भरगच्च स्वरूपाचं असतं. जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू यामध्ये सहभागी होतात.

दर्जेदार खेळाच्या बरोबरीने फिटनेस आणि सतत प्रवासानंतरही नव्या ठिकाणाशी जुळवून घेण्याची तयारी या गोष्टीही सांभाळाव्या लागतात. आंतररराष्ट्रीय पातळीवर स्थिरावल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडू तुमच्या खेळाचा अभ्यास करतात. तुमच्या खेळातले कच्चे दुवे हुडकून त्यानुसार आक्रमण केलं जातं. एका स्पर्धेतल्या चुका दुसऱ्या स्पर्धेत टाळून खेळावं लागतं. लक्ष्य हे नियमितपणे करू लागला आहे.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनविश्वात स्पर्धांच्या चार श्रेणी असतात. अव्वल श्रेणीत ऑलिम्पिक, थॉमस-उबर-सुदिरमान चषक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धांचा समावेश असतो. द्वितीय श्रेणीत वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेसह वर्ल्ड टूर सुपर 1000, वर्ल्ड टूर सुपर 750, वर्ल्ड टूर सुपर 500, वर्ल्ड टूर सुपर 300, वर्ल्ड टूर सुपर 100 अशा स्पर्धा असतात. पूर्वी या स्पर्धांना सुपर सीरिज प्रीमिअर, सुपर सीरिज, ग्रँड प्री गोल्ड आणि ग्रँड प्री अशी नावं होती.

तिसऱ्या श्रेणीत इंटरनॅशनल चॅलेंज, इंटरनॅशनल सीरिज आणि फ्यूचर सीरिज या स्पर्धांचा समावेश असतो. या पातळीवरील स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवलं तरच पुढच्या श्रेणीच्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा होतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राऊंड रॉबिन म्हणजे प्राथमिक फेरी असं स्वरूप नसतं. लीग स्टेज, उपउपांत्यपूर्व, उपांत्य, अंतिम अशा लढती होतात. पहिला सामना गमावला तर तिथेच स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात होतं. गेल्या दोन दशकात अरविंद भट, अजय जयराम, किदंबी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, एच.एस.प्रणॉय हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. पुरुष गटात स्पर्धकांची प्रचंड संख्या लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्य राखणं अतिशय अवघड आहे.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटलावर दाखल झालेल्या आणि चांगली आगेकूच करणाऱ्या लक्ष्यसाठी पुढची वाटचाल आव्हानात्मक आहे. जमेची बाजू अशी की लक्ष्यच्या हातात वय आहे. त्याच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे प्रदीर्घ काळ चालणाऱ्या लढतींसाठी आवश्यक असा फिटनेस आहे. घरातूनच बॅडमिंटनचे बाळकडू मिळालेल्या लक्ष्यला कामगिरीत सातत्य राखण्याच्या दृष्टीने चांगल्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शेरास सव्वाशेर खेळाडू असल्याने लक्ष्यला सातत्याने खेळ उंचवावा लागेल. हे शिवधनुष्य पेलल्यास भारतीय बॅडमिंटनला नवा पोस्टर बॉय मिळू शकतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)