Tokyo Olympics : भारतीय हॉकी टीमने जेव्हा ऑलिम्पिकमध्ये सलग सहा गोल्ड मेडल जिंकली होती...

फोटो स्रोत, WWW.BHARTIYAHOCKEY.ORG
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?
रँकिंग
भारतीय हॉकी टीम ही ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम आहे, हे किती जणांना माहीत आहे? भारताने आतापर्यंत सर्वाधिक 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत.
पण, स्पर्धा गवतावरून कृत्रिम टर्फवर खेळायला सुरुवात झाल्यापासून भारताची या खेळात पीछेहाट झाली. पण, टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने देशाच्या गौरवशाली हॉकी इतिहासाला उजाळा देऊया...
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. पण, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये बघितलंत तर महिला आणि पुरुषांच्या टीम्स नॉकआऊटपर्यंत जायलाही झगडतायत.
एकेकाळी मात्र हॉकीमध्ये आपण सलग सहा ऑलिम्पिक मेडल्स जिंकलेली आहेत. अनेकांना कदाचित भारतीय हॉकीचा हा सुवर्ण काळ ठाऊकही नसेल.
टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने याच आठवणींना उजाळा देऊया…
भारतीय हॉकीचा सुवर्ण काळ
1928 ते 1956 दरम्यान भारतीय हॉकी टीमने एकही मॅच न गमावता सहाच्या सहा ऑलिम्पिक गोल्ड पटकावली. आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी टीमने कधी कधी चक्क दीड महिना बोटीने प्रवास केलाय.
जयपाल सिंग आणि पुढे मेजर ध्यानचंद यांच्या भारतीय टीमने 28 वर्षांच्या या काळात 25 ऑलिम्पिक मॅचेसमध्ये 178 गोल केले, भारताविरोधात फक्त सात गोल झाले.
ऑलिम्पिक खेळाच्या इतिहासात हा रेकॉर्ड परत कोणती टीम मोडू शकेल असं वाटत नाही.
ध्यानचंद नावाचे हॉकीचे जादूगार
मेडलचा हा सिलसिला 1928मध्ये सुरू झाला आणि त्याचवर्षी ध्यानचंद हे हॉकीतलं वादळ जगाने पहिल्यांदा पाहिलं. भारतात त्यांचा लौकिक पूर्वीपासूनच होता.
पण, ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद इतके प्रसिद्ध झाले की, पुढे जगभरात त्यांच्याविषयी अक्षरश: दंतकथा पसरल्या. ॲमस्टरडॅममध्ये भारतीय टीमने पाच मॅचमध्ये एकूण 29 गोल केले आणि यातले 14 एकट्या ध्यानचंद यांनी केले होते.

फोटो स्रोत, WWW.BHARTIYAHOCKEY.ORG
त्या काळात पेनल्टी कॉर्नर नव्हता. म्हणजे हे सगळे गोल मैदानी होते आणि त्यासाठी लागणारा प्रचंड वेग आणि चपळता ध्यानचंद यांच्याकडे होती. ऑलिम्पिक्स डॉट कॉम या साईटने ध्यानचंद यांच्याबद्दल लिहिलं होतं,
'डच अधिकाऱ्यांना वाटलं ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबकासारखं काहीतरी असावं, म्हणून त्यांनी त्यांची स्टिक फोडून बघितली, अशी एक दंतकथा त्यावेळी प्रसिद्ध झाली होती. तर एका न्यूजपेपरने मॅच रिपोर्ट लिहिताना म्हटलं की, हा हॉकीचा खेळ नाहीए, ही जादू आहे. आणि ध्यानचंद जादूगार आहेत.'
पुढे ध्यानचंद यांना नावच मिळालं - हॉकीचे जादूगार.
ऑलिम्पिकवारीसाठी बोटीने खडतर प्रवास
ध्यानचंद खेळत होते तोपर्यंत भारतीय टीमने पराभव पाहिला नाही. ते चालण्याच्या काठीनेही गोल करतील, असं त्यांच्याविषयी म्हटलं जायचं. ॲमस्टरडॅम झालं, मग लॉस एंजलिस, बर्लिन, लंडन, हेलसिंकी आणि मेलबर्न अशा सहा ऑलिम्पिकचा काळ त्यांनी गाजवला.
त्यांच्याबरोबर लालशाह बोखारी, महम्मद अस्लम आणि हेन्री हेमंड असे खेळाडूही होते. 1947 पर्यंत भारत आणि पाकिस्तान असं विभाजनही झालेलं नव्हतं. ब्रिटिश राज म्हणून आपण खेळत होतो.

फोटो स्रोत, WWW.BHARTIYAHOCKEY.ORG
1932च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ॲडॉल्फ हिटलरही ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित झाले. शहरात तेव्हा असेही बॅनर लागले होते की, जादूगार ध्यानचंदची जादू बघण्यासाठी हॉकी नॅशनल स्टेडिअमला भेट द्या.
बर्लिनच्या फायनलमध्ये ध्यानचंद यांनी सहा गोल केले. ते सुद्धा जर्मन गोलीबरोबर त्यांची टक्कर होऊन त्यांचा पुढचा दात तुटला. पण, थोडाफार औषधोपचार घेऊन ते पुन्हा मैदानावर उतरले आणि औषधाचा परिणाम म्हणून वेग कमी व्हायला नको म्हणून ते चक्क बूट काढून टाकून अनवाणी खेळले.
1948 पासूनचं ऑलिम्पिक खास होतं. कारण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा भारतीय टीम स्वत:च्या झेंड्याखाली खेळणार होती. आणि ऑलिम्पिकही होतं लंडनमध्ये. पण, यावेळी ध्यानचंद नसले तरी त्यांची जागा बलबिरसिंग सिनीअर आणि रणधीर सिंग यांनी घेतली होती. लंडनमध्ये त्यांनी भारताला गोल्ड मिळवून दिलं.
या सगळ्या काळात भारत हा गरीब देश होता आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतीय हॉकी ऑलिम्पिक वारीला जायची ती बोटीने आणि तो सुद्धा थर्ड क्लासने प्रवास करून. लॉस एंजलिससाठीचा टीमचा प्रवास तर 45 दिवसांचा होता. विचार करा. अशा थकवणारा प्रवास केल्यानंतर खेळण्याचं बळ त्यांना कुठून मिळत असेल? तेव्हाच्या टीमच्या अवस्थेबद्दल बलबिर सिंग यांचे नातू कबीर सिंग ऑलिम्पिक चॅनेलशी बोलताना म्हणाले होते,
'नानाजी, आम्हाला सांगायचे, झोपायची सोयही धड नसायची. झोपमोड होऊ नये म्हणून आम्ही बेडशिट सुद्धा खिडक्यांना लावून कसाबसा खोलीत अंधार करायचो. जेवण, सराव याचीही आबाळच होती.'
पण, स्वतंत्र भारताचं नाव जगभर पसरवण्याची भावना मनात होती आणि त्यातून हॉकीपटूंना बळ मिळत होतं. पुढे गवत जाऊन कृत्रिम टर्फ आलं आणि तिथून भारतीय हॉकीची घसरण सुरू झाली. आता भारतीय हॉकी टीमने मिळवलेलं शेवटचं गोल्ड आहे 1980चं.
हॉकीतला सर्वाधिक गोल्ड मिळवण्याचा रेकॉर्ड अजूनही भारताच्या नावावर आहे. भारताने तब्बल आठ ऑलिम्पिक गोल्ड आतापर्यंत मिळवलीत. त्या खालोखाल जर्मनीने चार गोल्ड मिळवलीत.
पण, भारताच्या या वैभवशाली कामगिरीकडे बघितली की, आताच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटतं. हीच हॉकी टीम आता ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी झगडते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने बाद फेरीत मजल मारली आहे.
भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..
Please wait...
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








