सुशील कुमारने एकाच दिवशी कुस्तीचे तीन सामने जिंकत मिळवलं होतं बीजिंगमध्ये ब्राँझ

सुशील कुमार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सुशील कुमार दुर्दैवाने आज खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. दिल्ली पोलिसांनी मल्ल सागर धनकडच्या हत्येप्रकरणी अलीकडेच मुख्य आरोपी म्हणून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केलंय.

कुस्तीत कमावलेल्या ताकदीचा चुकीच्या ठिकाणी वापर केल्याचा हा आरोप आहे.

पण, जेव्हा भारतीय ऑलिम्पिक मेडल विजेत्यांचा विषय निघतो तेव्हा सुशीलचं नाव घ्यावंच लागतं. कारण, तो देशातला एकमेव दोन ऑलिम्पिक मेडल जिंकलेला खेळाडू आहे.

बीजिंगमधलं आपलं ब्राँझ त्याने लंडनमध्ये सिल्व्हरमध्ये बदललं. बीजिंगमधल्या त्याच्या ब्राँझची कहाणी विलक्षण आहे. रेपिचाझमुळे मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. काय असते ही रेपिचाझ राऊंड...

सुशीलचं बीजिंगमधील ब्राँझ

बॅडमिंटनमध्ये जशी पुलेला गोपीचंद आणि सिंधू,सायनाची जोडी तशीच कुस्तीमध्ये सत्पाल सिंह आणि सुशीलची जोडी आहे. पण 2008मध्ये ही जोडी म्हणावी तशी नावारुपाला आली नव्हती. तोपर्यंत आपला देश एखाद्याच मेडलवर खुश व्हायचा आणि त्या संभाव्य खेळाडूंमध्ये कुणी स्पर्धेपूर्वी सुशीलचं नाव घेतलं नव्हतं.

पण, कुस्तीच्या दंगलीत ज्याच्या अंगावर आखाड्यातल्या मातीचा नुसता धुरळा उडतो, त्याला ही माती कायमची चिकटते असं म्हणतात. सुशीलचं असंच झालं. सातव्या-आठव्या वर्षी त्याच्या वडिलांनी सुशीलला मुद्दाम दंगल बघायला नेलं आणि तिथून सुशील आखाड्याला चिकटलाच.

सुशील कुमार

फोटो स्रोत, SUSHIL KUMAR

यापूर्वी एशियन गेम्समध्ये त्याने ब्राँझ जिंकलं होतं. तेवढीच त्याची मोठी कमाई होती. म्हणूनच त्याच्याकडे बीजिंगमध्ये फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.

त्यातच पहिली राऊंड तो आंद्रे स्टेडनिकबरोबर हरला. सगळ्यांना वाटलं भारताचं आणखी एक आव्हान संपलं. पण, तेव्हा रेपिचाझ राऊंड नावाचा प्रकार होता. म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये हरवणारा प्रतिस्पर्धी जर त्या गटात मेडल मॅचेसपर्यंत गेला तर तुम्हाला ब्राँझ मेडलची आणखी एक संधी मिळते.

टेनिसमधल्या वाईल्ड कार्ड सारखं आहे हे. सुशीलला ती संधी मिळाली.

एकही दिवस सराव चुकवला नाही!

सुशीलसाठी रेपिचाझच्या तीन मॅचेसही सोप्या नव्हत्या. कारण, एकतर त्या एकाच दिवशी खेळायच्या होत्या. आणि सुशीलबरोबर प्रत्येक मॅचनंतर दमलेल्या शरीराला मसाज देण्यासाठी मेसुअरही नव्हता. हे काम त्याचे कोच करतार सिंग यांनी केलं.

पण सुशीलने डज श्वाब आणि अल्बर्ट बेटिरोव यांना सहज हरवून रेपिचाझची तिसरी राऊंड गाठली आणि तिथेही लिओनेल सिरिडोव्हचा 3-1 असा पराभव करत चक्क ब्राँझ जिंकलं. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी 20 ऑगस्ट 2008ला भारताच्या खात्यात तिसऱ्या मेडलची भर पडली.

सुशीलची खासियत म्हणजे 2004मध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर एंट्री घेतल्यापासून त्याने एकही दिवस सराव चुकवलेला नाही. रेस्ट डे म्हणजे काय त्याला माहीत नाही. म्हणूनच सगळ्यात जास्त दुखापती होऊनही तो नेहमी कमबॅक करतो.

सुशील कुमार

फोटो स्रोत, Getty Images

सुशीलच्याच शब्दांत सांगायचं तर, "मी मॅटवर उतरलो की, प्रतिस्पर्धी कोण आहे याचा विचार करत नाही. ऑलिम्पिक स्पर्धा आहे म्हणजे आव्हान तगडंच असणार. त्यापेक्षा माझा भर माझ्यातलं सर्वोत्तम देण्यावर असतो. आणि सरावाला मी महत्त्व देतो.

रोजच्या रोज व्यायाम आणि सराव झालाच पाहिजे, अगदी दुखापत असेल तरीही. शरीराचा वरचा भाग दुखावला असेल तर खालच्या भागाला व्यायाम द्या. खालचा दुखावला असेल तर वरच्या भागाला."

याच न्यायाने सुशील सराव करत राहिला आणि बीजिंग पाठोपाठ लंडन ऑलिम्पिकला पोहोचला. नियमित व्यायामामुळेच असेल कदाचित अनेकदा एखादं मेडल मिळालं की, ते खेळाडूच्या अंगाला लागतं आणि त्याचा वजनी गटही वरचा होतो. थोडक्यात वजन वाढतं.

पण, सुशील 66 किलो गटात कायम राहिला. 'बीजिंगमें नही किया वह लंडनमें करके दिखाऊंगा,' असं म्हणत सेमी फायनलपर्यंत पोहोचला.

सुशील कुमार

फोटो स्रोत, Getty Images

इथं तर त्याने बीजिंगच्या गोल्ड विजेत्या रमझानला पहिल्याच राऊंडमध्ये अस्मान दाखवलं. एका खेळाडूने दोनदा ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचा अनुभव भारतासाठी विरळाच. त्यामुळे सुशील रातोरात स्पोर्ट्स आयकॉन झाला.

पण, लोकांमध्ये सहज मिसळणारा आणि 'पहिलवानजी' म्हणून प्रसिद्ध असलेला सुशील पुढे कधी वादात अडकत गेला हेही समजलं नाही. आज तो खुनाच्या आरोपाखाली तिहार जेलमध्ये बंद आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या मॅचेस तिहार जेलमधून बघतोय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)