नंदू नाटेकर यांचं निधन, बॅडमिंटन क्षेत्रात हळहळ

नंदू नाटेकर

भारताचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते.

नंदू नाटेकर यांचे निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. कोव्हिडचा काळ लक्षात घेता या काळात शोकसभा घेतली जाणार नसल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनचा ठसा उमटवण्याचा मान नाटेकर यांना जातो. नाटेकर यांनी पेटवलेली मशाल पुढे प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद यांनी तेवत ठेवली.

परदेशात स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. 1956 मध्ये नाटेकर यांनी क्वालालंपूर इथे झालेल्या सेलंगोर इंटरनॅशनल स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.

बॅडमिंटन विश्वातील अतिशय प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत 1954 मध्ये पुरुष एकेरी गटात त्यांनी अंतिम आठमध्ये त्यांनी आगेकूच केली होती.

राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्य

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीची सहा जेतेपदं त्यांच्या नावावर आहेत. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीत प्रकाराची सहा जेतेपदं तसंच मिश्र दुहेरीची पाच जेतेपदं त्यांच्या नावावर आहेत.

थॉमस चषक या सांघिक स्वरुपाच्या स्पर्धेत त्यांनी भारताचं यशस्वी प्रतिनिधित्व केलं. थॉमस चषकात नाटेकर यांनी 16 पैकी 12 सामने जिंकले.

दुहेरी प्रकारात 16 पैकी 8 सामने जिंकले. 1959, 1961 आणि 1963 मध्ये थॉमस चषकात त्यांनी भारताचं नेतृत्वही केलं होतं.

शैलीदार खेळासाठी नाटेकर प्रसिद्ध होते. मनगटाच्या बळावर अफलातून फटके खेळत प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणं ही त्यांच्या खेळाची खासियत होती.

प्रतिस्पर्ध्याने केलेली सर्व्हिस अचूक परतावून लावणं हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं.

नंदू नाटेकर

फोटो स्रोत, Getty Images

1962 मध्ये नाटेकर यांनी मीना शॉ यांच्या बरोबरीने बँकॉक किंग्ज कप स्पर्धेत मिश्र दुहेरीचं जेतेपद पटकावलं होतं. पुढच्याच वर्षी म्हणजे 1963 मध्ये त्यांनी या स्पर्धेचं पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं.

1965 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

1961 मध्ये नाटेकर यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पेट्रोलियम स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाने 2001 मध्ये नाटेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवलं होतं.

'क्रीडागाथा' हे त्यांनी लिहिलेलं पुस्तकही मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)