सुनील गावस्कर जन्मानंतर नजरचुकीने अदलाबदली होऊन एका कोळिणीच्या घरी पोहोचले आणि

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
ही गोष्ट आहे 1949 मधली. दादरचं पुरंदरे नर्सिंग होम. 10 जुलै रोजी त्या मुलाचा जन्म झाला. दुसऱ्या दिवशी जनरल वॉर्डात असलेल्या मायलेकाला भेटायला बाळाचे नानाकाका अर्थात नारायण मसुरेकर आले. तान्ह्या बाळाला हातात घेतल्यानंतर हे आपलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
तान्ह्या बाळाच्या डाव्या कानाला लहानसं छिद्र होतं. ते छिद्र दिसत नसल्याने हे बाळ आपलं नाही हे त्यांनी सांगितलं. लहान बाळांना आंघोळ घातली जाते तेव्हा अदलाबदली झाल्याचं काही वेळात स्पष्ट झालं.
आपलं बाळ शोधण्यासाठी त्यांनी शोध सुरू केला. नर्सिंग होम असल्याने तिथे साहजिकपणे अनेक लहान मुलं होती. मासेमारी करणाऱ्या कोळी समाजातल्या आईच्या इथलं बाळ त्यांना आपलं असल्याचं लक्षात आलं. घोळ लक्षात आल्यानंतर बाळांना आपापल्या मातांकडे सोपवण्यात आलं. जन्मानंतर काही तासात बदली होण्याची ही अनोखी घटना आहे जगविख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची.
'सनी डेज' या आत्मचरित्रात गावस्कर यांनी हा किस्सा विषद केला आहे. काही वर्षांपूर्वी 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' कार्यक्रमात बोलतानाही गावस्कर यांनी ही अनोखी घटना सांगितली होती.
सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या गावस्कर यांचं नशीब त्या अदलाबदलीने पालटलं असतं. त्यांची कारकीर्द क्रिकेटमध्येच घडली असती की नाही माहिती नाही. पण अदलाबदलीचा घोळ वेळीच निस्तरण्यात आला. सुनील यांना त्यांच्या आईकडे सोपवण्यात आलं. बदली झालेला हा मुलगा आईकडे परतून भविष्यात देशाचं नाव उज्ज्वल करेल असं कोणाला वाटलंही नसेल. पण त्या मुलाने क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला.
तंत्रशुद्धतेचा वस्तुपाठ अशा फलंदाजीसाठी सुनील गावस्कर यांचं नाव आदराने घेतलं जातं. आग ओकणाऱ्या गोलंदाजांना हेल्मेटविना निधड्या छातीने केलेला सामना, प्रतिस्पर्ध्यांचा सखोल अभ्यास, संयम, धावांची अविरत भूक यांच्या बळावर सुनील यांनी क्रिकेटविश्वात नवनवे मापदंड प्रस्थापित केले. घरच्या मैदानावर बहुतांश खेळाडू उत्तम कामगिरी करतात.
अत्याधुनिक संसाधनं हाताशी नसताना विदेशातील खेळपट्ट्यांवर त्यांची बॅट तळपत असे. फिरकी असो किंवा वेग, स्विंग असो, डावखुरे गोलंदाज असोत किंवा उजव्या हाताने फेकणारे, बोचरे वारे असोत किंवा तळपणारा सूर्य असो- गावस्कर यांनी सदैव धावांची टांकसाळ उघडली.
शाळा आणि महाविद्यालयात चमक
शाळेसाठी खेळतानाच गावस्कर यांच्या भविष्याची चुणूक दिसली होती. प्रतिनिधित्व करताना गावस्कर यांनी 246,222 अशा तडाखेबंद द्विशतकी खेळी केल्या होत्या. त्याकाळी महाविद्यालयीन क्रिकेटचं महत्त्व प्रचंड होतं.
सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातर्फे खेळताना गावस्करांनी धावांचा रतीब घातला. या कामगिरीच्या बळावर मुंबईच्या रणजी संघात त्यांची निवड झाली.

फोटो स्रोत, Getty Images
कर्नाटकविरुद्धच्या पदार्पणाच्या लढतीत शून्यावर बाद झाल्यानंतर गावस्कर यांच्यावर मामाने घुसवलेला भाचा अशी टीकादेखील झाली.
त्यावेळी गावस्कर यांचे मामा माधव मंत्री मुंबईच्या निवड समितीत होते. परंतु या टीकेने दुर्मखून न जाता गावस्कर यांनी दुसऱ्याच सामन्यात राजस्थानविरुद्ध शतकी खेळी केली.
त्याच हंगामात दोन शतकं झळकावल्यामुळे गावस्कर यांची भारतीय संघात निवड झाली.
विलक्षण पदार्पण
गावस्कर यांचं कसोटी पदार्पण, तत्कालीन प्रतिस्पर्धी संघाची ताकद, जिवंत खेळपट्ट्या यामुळे त्या मालिकेचं वर्णन अद्भुत असं केलं जातं. वेस्ट इंडिजच्या खडतर दौऱ्यासाठी गावस्कर यांना भारतीय संघात स्थान मिळालं होतं. चेंडूला प्रचंड उसळी मिळणाऱ्या खेळपट्ट्या आणि अक्षरक्ष: आग ओकणारे गोलंदाज असं भंबेरी उडणारं आव्हान गावस्कर यांच्यासमोर होतं.
असं म्हणतात दर्जेदार प्रतिस्पर्धी आणि खडतर ठिकाण अशा वातावरणात कौशल्याची खरी परीक्षा होते. पाच फूट पाच इंच या उंचीमुळे गावस्कर यांच्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सामना करणं शारीरिकदृष्ट्याही कठीण होतं.
गावस्कर यांनी पदार्पणाच्या मालिकेत उंचपुऱ्या आणि भेदक गोलंदाजांविरुद्ध खेळताना 774 धावा कुटल्या. मुंबई ते कॅरेबियन बेटं हे संक्रमण गावस्कर यांनी आपल्या बॅटच्या आणि खणखणीत तंत्रकौशल्याच्या बळावर पेललं. पदार्पण करणाऱ्या फलंदाजाने पहिल्याच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही गावस्कर यांच्याच नावावर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जॉर्जटाऊन इथे झालेल्या दुसऱ्याच सामन्यात गावस्कर यांनी शतकी खेळी साकारली. ब्रिजटाऊन इथेही शतक झळकावल्यानंतर चौथ्या आणि अंतिम कसोटीत पोर्ट ऑफ स्पेन इथे गावस्कर यांनी कळसाध्याय गाठला. गावस्कर यांनी पहिल्या डावात 124 तर दुसऱ्या डावात 220 धावांची मॅरेथॉन खेळी केली.
गावस्कर यांच्या द्विशतकी खेळीमुळेच भारताने चौथी कसोटी अनिर्णित राखली आणि मालिका जिंकली. गावस्करांची कामगिरी न भूतो न भविष्यती अशी मानली जाते. 1971 मध्ये झालेली ही मालिका आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं गौरवशाली पर्व आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धची हुकूमत
अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल अशा एकापेक्षा एक गोलंदाजांविरुद्ध गावस्कर यांनी आपली बॅट परजली. जगभरातले फलंदाज चळचळा कापत अशा कर्दनकाळ गोलंदाजांविरुद्ध कशी फलंदाजी करावी याचा वस्तुपाठ गावस्कर यांनी सादर केला.
वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गावस्कर दुसऱ्या स्थानी आहेत. त्याकाळचा वेस्टइंडिजचा संघ अजेय असा होता. प्रतिस्पर्धी संघाना चीतपट करत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार प्रदर्शन यातूनच गावस्करांचं मोठेपण प्रतीत होतं.
नवा चेंडू आणि सलामीचं आव्हान
सलामीवीराची भूमिका अवघडच असते. कारण गोलंदाजांच्या हातात नवा कोरा लाल चेंडू असतो. चेंडूला उसळी मिळते. चेंडू स्विंग होतो. इंग्लंडसारख्या देशात ढगाळ वातावरणात स्विंग गोलंदाजीचा सामना करणं कठीण असतं.
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांमध्ये चेंडू अतिशय वेगाने अंगावर येतो. डावाच्या सुरुवातीला गोलंदाज ताजेतवाने असतात. कसोटी प्रकारात वेळेचं बंधन नसतं. फलंदाजांसाठी सापळा रचून बाद करण्याचा गोलंदाजांचा प्रयत्न असतो.

फोटो स्रोत, Getty Images
नव्या चेंडूचा सामना करत भौगोलिक परिस्थितीला तोंड देत धावा करणं हे गावस्करांचं वैशिष्ट्य होतं. पदार्पणाच्या मालिकेतच जगाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या गावस्कर यांनी कारकीर्दीत सलामीवीराची आव्हानात्मक भूमिका समर्थपणे पेलली.
घरच्या मैदानावर शेर असणाऱ्या अनेक फलंदाजांची विदेशातील खेळपट्ट्यांवर त्रेधातिरपीट उडते. गावस्करांनी सगळ्या देशांमध्ये बॅटची ताकद दाखवली. आजही विदेशात कसं खेळावं यासाठी गावस्करांच्या तंत्रकौशल्याचं उदाहरण दिलं जातं.
हेल्मेटविना वावर
गावस्करांच्या काळात क्रिकेटमध्ये अत्याधुनिक उपकरणं, तंत्रज्ञान नव्हतं. गावस्कर यांनी हेल्मेटविना जगातल्या भल्याभल्या गोलंदाजांना यथार्थपणे सामना केला. गावस्कर यांनी काही काळानंतर स्कल कॅप वापरायला सुरुवात केली.
पाकिस्तानचे अष्टपैलू खेळाडू इम्रान खान यांनी गावस्कर यांना सुरक्षेच्या कारणासाठी कॅप किंवा हेल्मेट वापरण्याची विनंती केली होती. 1983 मध्ये माल्कम मार्शलचा चेंडू गावस्कर यांच्या डोक्यावर जाऊन आदळला होता.
सुनील गावस्कर

फोटो स्रोत, Getty Images
निवृत्तीनंतर गावस्कर यांची स्कल कॅप लॉर्ड्स म्युझियमला देण्यात आली. ही स्कल कॅप घातलेल्या खेळाडूला चेंडू लागला होता का? असं एका ़डॉक्टरांनी विचारलं. तसं झालं असेल तर तो खेळाडू जागीच गतप्राण झाला असता असं डॉक्टरांनी सांगितलं.
हेल्मेट चेंडूचा आघात झेलू शकतं किंवा त्याची तीव्रता रोखू शकतं पण स्कल कॅपमुळे आघातचा परिणाम थेट मेंदूवर व्हायची शक्यता असते. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स कार्यक्रमात गावस्कर यांनी ही आठवण सांगितली होती.
विक्रमांचे मानकरी
भारतीय संघाने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. विश्वचषक विजेत्या भारतीय संघात गावस्कर होते. 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय संघ विजयी ठरला. गावस्कर त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार होते.
भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ झालेले गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज होते. त्यांच्या नावावर कसोटीत तब्बल 34 शतकं आहेत.शंभर झेल टिपणारे ते पहिले भारतीय क्षेत्ररक्षक होते.
का झाले नाही भारतीय संघाचे प्रशिक्षक?
तंत्रशुद्ध फलंदाजी, कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव, खेळातल्या बारकाव्यांची अचूक समज, प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्द असं सगळं नावावर असूनही गावस्कर यांनी भारतीय संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं नाही.
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी यामागचं कारण उलगडलं होतं. मी मैदानाबाहेर फार काळासाठी सामना पाहू शकत नाही. प्रशिक्षकासाठी ही गोष्ट महत्त्वाची असते. खेळत असतानादेखील बाद झाल्यानंतर मी अधूनमधून सामना पाहायचो. मी वाचन करायचो किंवा पत्रांना उत्तरं द्यायचो. गुंडप्पा विश्वनाथ, मामा माधव मंत्री प्रत्येक चेंडू पाहायचे.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्हाला प्रशिक्षक किंवा निवडसमिती प्रमुख व्हायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडू पाहावा लागतो. त्यामुळे मी त्याचा विचार केला नाही असं गावस्करांनी स्पष्ट केलं होतं. 2004 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना गावस्कर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. पण पूर्णवेळ प्रशिक्षकपद त्यांनी स्वीकारलं नाही.
ती संथ खेळी आणि टीकेचा भडिमार
महान फलंदाज म्हणून जगभर ख्याती असलेल्या गावस्कर यांना एकदा अतिसंथ खेळीसाठी टीका सहन करावी लागली होती. पहिल्यावहिल्या विश्वचषकात म्हणजेच 1975 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना गावस्कर यांनी अतिशय कूर्म अशी खेळी केली होती.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 334 धावांची मजल मारली होती. वनडे क्रिकेटमध्ये तीनशे धावांचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला गेला. डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान खेळण्याची आवश्यकता होती. मात्र घडलं भलतंच.
गावस्कर यांनी 174 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या खेळीत एकमेव चौकार होता. गावस्कर नाबाद राहिले, भारतीय संघाने सामना गमावला. गोगलगायीशी साधर्म्य अशा त्या खेळीसाठी गावस्कर यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
रुपेरी पडद्यावरची इनिंग्ज
क्रिकेटच्या मैदानात बॅटने भल्याभल्या गोलंदाजांना नामोहरम करणाऱ्या गावस्कर यांनी रुपेरी पडद्यावर अर्थात चित्रपटामध्ये काम करण्याची किमया साधली. सावली प्रेमाची या चित्रपटात गावस्कर यांनी भूमिका केली होती.
या चित्रपटाला गावस्करांना मैदानावर जे यश मिळतं तसं लाभलं नाही. 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...' असं एक गाणंही गावस्करांनी गायलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पुरस्कार आणि सन्मान
देदिप्यमान प्रदर्शनासाठी गावस्कर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 1994 मध्ये मुंबईचे शेरीफ म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं नाव देण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू अॅन बॉर्डर आणि भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर या दोन दिग्गजांच्या नावाने ही मालिका ओळखली जाते.
2012 मध्ये बीसीसीआयने गावस्कर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला होता. 2017 मध्ये अमेरिकेत लुईसव्हिले इथे एका मैदानाला गावस्कर यांचं नाव देण्यात आलं आहे.
बोलावे नेटके
खेळाडू म्हणून उल्लेखनीय कारकीर्द असणारे गावस्कर गेले तीन दशकं सातत्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांचं समालोचन करत आहेत. खेळातले तांत्रिक तपशील सोप्या भाषेत उलगडून देण्याची त्यांची हातोटी आहे.
खुशखुशीत भाषेत, कोट्या, किस्से यांच्यासह सामन्याचं प्रवाही वर्णन करणारे गावस्कर क्रिकेटविश्वात लोकप्रिय समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत.
भारतीय संघाच्या सामन्यांना ते मुख्यत्वेकरून समालोचनाला असतात. निवृत्तीनंतर समालोचनासाठी त्यांनी जपलेला फिटनेस अफलातून असा आहे. वयाच्या सत्तरीतही ते वर्षातल्या 12 महिन्यांपैकी 10 महिने समालोचन करत असतात. समालोचनादरम्यान ते परखड भाष्य करतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








