नीना गुप्ता-विव्हियन रिचर्ड्स यांची प्रेमकहाणी कधी आणि कशी सुरू झाली?

विव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता

फोटो स्रोत, MAIL TODAY

फोटो कॅप्शन, विव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता
    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नीना गुप्ता या आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. पण त्यापेक्षाही दुसऱ्या एका गोष्टीसाठी त्यांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. ही गोष्ट म्हणजे क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबतचं त्यांचं प्रेम प्रकरण.

नीना गुप्ता आणि विव्हियन रिचर्ड्स यांचं अफेअर नेमकं कधी आणि कसं सुरू झालं, याबाबत विविध प्रकारचे अंदाज लावले जातात.

पण नीना गुप्ता यांनी आपल्या आयुष्यातील ही बाजू सर्वांपासून लपवून ठेवल्याचं पाहायला मिळतं. गेल्या कित्येक वर्षांपासून किंवा दशकापासून याविषयी खूपच कमीवेळा त्या बोलल्या आहेत.

नीना गुप्ता यांनी आपल्या 'सच कहूं तो' या आत्मचरित्रात विव्हियन रिचर्ड्ससोबत त्यांच्या नात्याची सुरुवात नेमकी कशी झाली, याबाबत सांगितलं आहे.

पेंग्विन प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

नीना गुप्ता विव्हियन रिचर्ड्स यांच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र, ऐनवेळी रिचर्ड्स यांनी लग्नाला नकार दिला. त्याचं कारण अजूनही आपल्याला माहीत नाही, असं नीना यांनी सांगितलं आहे.

नीना गुप्ता यांना बालपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं. त्यांनी लिहिलं, "त्या कॉलेजला असताना एखादा क्रिकेट सामना सुरू असेल तर त्या रेडिओवर त्याचं समालोचन मनापासून ऐकत. वर्गातसुद्धा कानात हेडफोन घालून वर स्कार्फ लपटून त्या ऐकत राहत. क्रिकेट सामने थंडीच्या दिवसात व्हायचे. त्यामुळे कुणाला संशयही येत नसे.

सच कहूं तो

फोटो स्रोत, Penguin books

पुढे नीना गुप्ता मुंबईत चित्रपटांमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. तिथं त्यांची बेट विव्हियन रिचर्ड्स यांच्याशी झाली. ते एक सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहेत, ही गोष्ट त्यांना आधीपासूनच माहीत होती.

विव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीबाबत त्या लिहितात, "मी 'बटवारा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. एके दिवशी आमच्या युनिटमधील सगळ्या स्टारकास्टसोबत आम्ही जयपूरच्या महाराणींकडे एका पार्टीत सहभागी होण्यासाठी गेलो. तिथं पाहुण्यांच्या यादीत वेस्ट इंडीज संघाचे तत्कालीन कर्णधार विव्हियन रिचर्ड्स हेसुद्धा होते, तसंच त्यांच्या संघाचे इतरही खेळाडू त्यावेळी उपस्थित होते.

पण, विव्हियन रिचर्ड्स यांच्याशी भेट होण्यामागचं नेमकं कारण काय होतं?

याबद्दल नीना गुप्ता लिहितात, "पार्टीच्या आधी एक दिवस भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये एक क्रिकेट सामना झाला होता. हा सामना भारताने एक किंवा दोन धावांनी गमावला होता. मी तो सामना पाहिला होता. त्यावेळी वेस्ट इंडीज संघाचा जल्लोष सुरू होता. पण मैदानावर कर्णधार रिचर्ड्सची वागणूक अत्यंत शांत आणि सभ्य होती. त्यांच्या डोळ्यात तेव्हा अश्रूही होते. आपण सामना गमावू शकलो असतो, याची जाणीव त्यांना होती."

नीना गुप्ता यांनी विव्हियन रिचर्ड्स यांच्याबाबत त्यावेळी विचार केला.

"किती शानदार व्यक्ती आहे. आपल्या भावना लाईव्ह टीव्हीवर जाहीर करण्याची त्याला भीती वाटली नाही."

नीना गुप्ता बॉलीवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत होत्या. तिथं सगळं काही मायावी आहे, असं म्हटलं जातं. पण रिचर्ड्स यांच्या त्या कृतीने नीना प्रभावित झाल्या. पुढच्याच दिवशी पार्टीत विव्हियन रिचर्ड्स यांची भेट झाल्यामुळे त्या हरखून गेल्या.

विव्हियन रिचर्ड्स यांच्या भेटीचा किस्सा सांगताना त्या लिहितात, "मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. तुमच्या पॅशनचा माझ्यावर खोलवर प्रभाव पडल्याचं त्यांना म्हटलं."

यानंतर दोघांमध्ये काही बातचीत झाली. तसंच एकमेकांना भेटत राहू, असं त्यांनी एकमेकांना म्हटलं.

नीना यांच्या मनावर प्रभाव टाकणारा 'तो' सामना

त्या काळी वेस्ट इंडीज संघाचा सुवर्णकाळ सुरू होता. कर्णधार आणि फलंदाज म्हणून विव्हियन रिचर्ड्स कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर होते.

नीना गुप्ता

फोटो स्रोत, TWITTER/NEENA GUPTA

ते फर्राटेदार इंग्रजी बोलायचे. त्या काळातील ते अत्यंत स्टायलिश क्रिकेटपटू होते.

लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी आपल्या 'आयडल्स' या पुस्तकात रिचर्ड्स यांच्याविषयी लिहिलं आहे.

"विव्ह यांना चांगले कपडे घालायला आवडतं. त्यांच्याकडे नक्कीच एक उत्तम वॉर्डरोब असेल. काऊंटी सिझनमध्येही ते एक टीशर्ट दुसऱ्यांदा घालत नाहीत, असं म्हटलं जातं. प्रत्येकवेळी ते आकर्षक कपड्यांमध्येच दिसून येतात."

नीना गुप्ता यांनी उल्लेख केलेल्या क्रिकेट सामन्याविषयी थोडी माहिती घेऊ.

हा सामना 7 जानेवारी 1988 रोजी नागपूरमध्ये खेळला गेला होता.

या सामन्यात भारतीय संघ फक्त दोन धावांच्या फरकाने पराभूत झाला. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 48.3 षटकांत 196 धावा बनवल्या.

कर्णधार रिचर्ड्स यांनी या सामन्यात फक्त 17 धावा काढल्या. के. श्रीकांत यांच्या 53 धावांच्या बळावर भारत सामना जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण रिचर्ड्स यांनी गोलंदाजी करत धोकादायक ठरू शकणाऱ्या श्रीकांत यांना बाद केलं.

नीना गुप्ता मशाबा

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

हा सामना आणि पार्टी संपल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ सुमारे महिनाभर भारतातच होता. त्यानंतर ते मायदेशी परतणार होते.

नीना गुप्ता यांनी लिहिलं, "रिचर्ड्स यांचा दौरा संपला आणि ते अँटिग्वाला निघून गेले. आमचा काहीच संपर्क होत नव्हता. मला त्यांची कमतरता जाणवू लागली. मी त्यांच्याविषयी विचार करत बसायचे. आम्ही एकमेकांना नंबर दिलेला नव्हता. त्यामुळे संपर्क कसा करावा, हे कळायला मार्ग नव्हता. मी शूटिंगमध्ये बिझी झाले. ते सामन्यांमध्ये बिझी होते."

रिचर्ड्स यांच्याशी पुन्हा संपर्क होईल किंवा नाही, हे नीना यांना माहीत नव्हतं. पण काही योगायोग अनाकलनीय असतात ना...तसंच नीना यांच्यासोबत घडलं.

पुस्तकात त्यांनी लिहिलं, "मी दिल्ली विमानतळावर माझ्या विमानाची वाट पाहत होते. त्यावळी विव्हियन रिचर्ड्स यांच्याबाबत मी विसरून गेले होते. पण अचानक माझ्यासमोर मरून रंगाचे झेंडे दिसले. पाहिलं तर वेस्ट इंडीजचा क्रिकेट संघ लाऊंजमध्ये दाखल होत होता. तिथं विव्हियनसुद्धा होते. तेव्हापासून आमचं नातं सुरू झालं. एक असं नातं जे आता भूतकाळ आहे."

या वळणावर येऊन नीना गुप्ता आपल्या आत्मकथेत थांबतात. त्या लिहितात, "याबाबत खूप काही लिहिलं गेलं. त्यामुळे माझ्या मौनाचा सन्मान राखा. मला ते पुन्हा लिहिण्याची इच्छा नाही. त्यामुळे मी आणि माझी मुलगी पुन्हा लोकांच्या निशाण्यावर येऊ."

विव्हियन रिचर्ड्स यांचं 1980 मध्येच प्रेयसी मरियम हिच्याशी लग्न झालेलं होतं. त्यांना दोन मुलंही होती. याबाबत सुनील गावस्कर यांनी आपल्या 'आयडल्स' पुस्तकात लिहिलं आहे.

त्या लग्नाला संपूर्ण अँटिग्वाचे नागरिक दाखल झाले होते. कुणालाही हे लग्न चुकवायचं नव्हतं.

नीना यांच्यासोबत नातं

पण क्रिकेट संघाच्या दौऱ्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरही झाला. विव्हियन रिचर्ड्स यांनी आपल्या त्या अस्वस्थतेचा उल्लेख 'सर विव्हियन : द डिफिनिटिव्ह ऑटोबायोग्राफी' या पुस्तकात केला आहे.

मशाबा

फोटो स्रोत, STRDEL

ते लिहितात, सातत्याने घरापासून दूर राहिल्यामुळे माझ्या आणि मरियमच्या नात्यावर परिणाम होऊ लागला होता. यादरम्यान मी माझ्या आयुष्यातील दुसरी महिला नीना हिला भेटलो. जयपूरच्या महाराजा पॅलेसमध्ये एका पार्टीदरम्यान आमचा संपर्क आला होता.

विव्हियन रिचर्ड्ससोबतच्या अफेअरदरम्यान नीना गुप्ता गरोदर राहिल्या, हेसुद्धा नीना यांनी आपल्या पुस्तकात सांगितलं आहे. पण त्यांच्या गरोदरपणाबाबत कळलं तोपर्यंत विव्हियन रिचर्ड्स अँटिग्वाला परतले होते.

त्यावेळी नीना गुप्ता यांच्यासमोर आपलं करिअरंच नव्हे तर संपूर्ण जीवन होतं. लोक त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देऊ लागले होते. पण नीना यांनी गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी एके दिवशी रिचर्ड्स यांना फोन केला.

त्या म्हणाल्या, "मी गरोदर आहे. मी गर्भपात करणार नसेन तर तुमची काही हरकत नाही ना?"

"हे ऐकून विव्हियन रिचर्ड्स अत्यंत आनंदी झाले. त्यांनी त्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यावेळी मी योग्य निर्णय घेतल्याची जाणीव मला झाली," असं नीना लिहितात.

मुलगी मसाबा फॅशन डिझायनर

नीना गुप्ता आणि विव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा हिचा जन्म 2 नोव्हेंबर 1989 रोजी झाला. त्या आता एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आहेत.

नीना गुप्ता यांच्याविषयी विव्हियन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं, "नीना अत्यंत टॅलेंटेड आहे. ती बॉलिवूड अभिनेत्री आहे. दिग्दर्शक आहे. आमच्यात रिलेशनशिप तयार झालं. आम्हाला एक मुलगी आहे, त्याचा मला अभिमान वाटतो."

नीना गुप्ता यांनी हेसुद्धा लिहिलं की रिचर्ड्स त्यांच्या मुलीसाठी वेळ काढायचे. सोबत सुट्टी घालवण्यासाठी ते जायचे. रिचर्ड्स यांचं आयुष्य अत्यंत बिझी होतं. त्यांचं स्वतःचं एक कुटुंब होतं. रिचर्ड यांच्यासोबत अनेक चांगल्या-वाईट आठवणी असल्याचं त्या सांगतात.

विव्हियन हे मसाबा आणि नीना यांना भेटण्यासाठी नेहमी भारतात यायचे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते सोबत दिसायचे.

1996 मध्ये आशा भोसले यांच्या 'राहुल अँड आय' या अल्बम लाँचच्या कार्यक्रमावेळीही दोघे सोबत दिसले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)