17 महिलांशी लग्न, कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी कसं पकडलं?

    • Author, संदीप साहू
    • Role, भुवनेश्वरहून, बीबीसी हिंदीसाठी

कधी डॉक्टर तर कधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अधिकारी असल्याची बतावणी करत 17 महिलांना जाळ्यात अडवकवून त्यांच्याशी लग्न करणारा आणि पैशे लुटणाऱ्या ठगाला भुवनेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

66 वर्षांचे रमेशचंद्र स्वाई यांना रविवारी रात्री भुवनेश्वरच्या खंडगिरी परिसरातील एका अपार्टंमेंटमधून अटक करण्यात आली. सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

आपल्या गोड-गोड बोलण्याच्या आधारे महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या रमेशवर 8 राज्यांतील 17 महिलांबरोबर धोक्यानं लग्न करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. या 17 पैकी चार ओडिशामधील, आसाम आणि दिल्लीतील प्रत्येकी तीन, तर मध्य प्रदेश आणि पंजाबमधील दोन-दोन तसंच उत्तर प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे.

भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त उमाशंकर दास यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, रमेश यांनी या 17 महिलांशिवाय इतरही महिलांची फसवणूक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

"17 पैकी तीन महिलांबाबत आम्हाला अटकेनंतर माहिती मिळाली. या तीनपैकी एक ओडिशा एक छत्तीसगड आणि एक आसामच्या आहेत. पण तिघीही उच्चशिक्षित आहेत. आम्ही चौकशी करत असून त्यांनी या 17 शिवाय आणखी कोणाला जाळ्यात अडकवलं आहे का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत," असं त्यांनी म्हटलं.

कोठडीत असलेल्या रमेशकडून त्यांच्या कृत्यांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी भुवनेश्वर येथील महिला ठाण्याच्या प्रभारींच्या नेतृत्वात तीन सदस्यांचं पथक तयार करण्यात आलं आहे. रमेश यांचा फोन फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला जाणार आहे. तसंच त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही माहिती मिळवली जाईल.

पितळ कसं उघडं पडलं

रमेशच्या अटकेबाबत पोलिस उपायुक्त दास यांनी माहिती दिली. "आम्ही अनेक दिवसांपासून या व्यक्तीच्या शोधात होतो. आम्ही त्याला पकडण्यासाठी जाळं रचलं होतं. पण तो अनेक महिन्यांपासून भुवनेश्वरबाहेर होता. त्यानं मोबाईल नंबरही बदलला होता. त्यामुळं त्याला पकडणं शक्य होत नव्हतं. अखेर रविवारी आम्हाला एका सुत्राकडून तो भुवनेश्वरहून आल्याची माहिती मिळाली. आम्ही त्याच रात्री त्याला खंडगिरीमधील अपार्टमेंटमधून ताब्यात घेतलं," असं त्यांनी सांगितलं.

त्याने ठगलेल्या 17 महिलांपैकी एकीनं तक्रार दिली होती. त्याच प्रकरणात भुवनेश्वर पोलिस त्याचा शोध घेत होते. दिल्लीतील एका शाळेतील शिक्षक महिलेनं रमेशची तक्रार केली होती.

रमेशनं आरोग्य मंत्रालयात उपसंचालक असल्याचं सांगत या महिलेशी नातं जोडलं आणि नंतर 2020 मध्ये कुबेरपुरीच्या आर्य समाज मंदिरात त्यांच्याशी लग्न केलं. काही महिने दिल्लीत राहिल्यानंतर रमेश पत्नीला घेऊन भुवनेश्वरला आले आणि खंडगिरीत एका अपार्टमेंटमध्ये ते राहू लागले.

भुवनेश्वरमध्ये असताना या महिलेला रमेश आधीच विवाहित असल्याचं लक्षात आलं. याबाबत पूर्ण माहिती मिळवल्यानंतर त्यांनी 5 जुलै 2021 ला भुवनेश्वरमधील महिला पोलिस ठाण्यात रमेश यांच्या विरोधात तक्रार दिली आणि त्या दिल्लीला परतल्या.

भुवनेश्वर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 498 (A), 419, 468, 471 आणि 494 अंतर्गत रमेशच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि शोध घ्यायला सुरुवात केली. पण रमेशला याबाबत माहिती मिळाली. त्यानं फोननंबर बदलला आणि भुवनेश्वरमधून गायब झाला.

या दरम्यान रमेश गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या त्याच्या दुसऱ्या एका पत्नीबरोबर राहत होते, असं पोलिसांचं मत आहे.

प्रकरण शांत झालं आहे, असं समजून रमेश सात महिन्यांनी भुवनेश्वरला परतले. पण दिल्लीत राहणाऱ्या पत्नीनं त्याठिकाणी हेर त्याच्या मागे लावले होते. रमेश खंडगिरीमधील फ्लॅटमध्ये परत येतात हेरानं पत्नीला माहिती दिली. त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि अखेर अनेक वर्षांपासून महिला आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रमेशला पकडण्यात पोलिसांना यश आलं.

पहिली शिकार

ओडिशाच्या केंद्रापाडा जिल्ह्याच्या पाटकुरा येथील रहिवासी रमेश यांचा पहिला विवाह 1982 मध्ये झाला होता. त्यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. ते तिघंही डॉक्टर असून विदेशात राहतात.

पहिल्या लग्नाच्या 20 वर्षानंतर म्हणजे 2002 मध्ये त्यांनी पहिली शिकार जाण्यात अडकवली होती. पोलिसांमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्या या महिला झारखंडच्या होत्या. ओडिशा येथील पारादीपमध्ये एका खासगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयात त्या डॉक्टर होत्या.

काही दिवसांनी या महिलेची बदली अलाहाबादला झाली तर रमेश तिथं जाऊन पत्नीबरोबर राहू लागले. तसंच महिलेला फसवून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने उकळायला सुरुवात केली.

भुवनेश्वर पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रमेशनं दिल्लीतील शिक्षिका असलेल्या पत्नीकडून 13 लाख आणि सेंट्रल आर्म्ड पोलिसच्या एका अधिकारी महिलेकडून 10 लाख रुपये उकळले होते. त्यांच्या इतर अशा गुन्ह्यांची माहिती सध्या पोलिस मिळवत आहेत.

महिलांना कसं ओढायचा जाळ्यात?

रमेश अत्यंत सावधपणे शिकार निवडत होते. त्यासाठी ते शक्यतो मॅट्रीमॉनियल साइट्सची मदत घेत होते. ज्यांचं वय वाढलेलं असूनही लग्न झालेलं नसेल, घटस्फोट झालेला असेल किंवा पतीपासून विभक्त झालेल्या अशा महिलांची निवड रमेश करायचे. पण महिला नोकरी करणारी असेल किंवा श्रीमंत असेल याची ते शिकार निवडताना काळजी घेत होते.

शिकार ठरल्यानंतर रमेश या मॅट्रीमॉनियल साइटच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर संपर्क वाढवायचे. त्यानंतर त्यांना भेटून त्यांना बोलण्यात अडकवून त्यांचा विश्वास संपादन करायचे.

रमेश स्वतःची ओळख कधी डॉक्टर तर कधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकारी अशी करून द्यायचे. भुवनेश्वर पोलिसांच्या माहितीनुसार ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक बनावट ओळखपत्रंही तयार केलेली होती.

त्याशिवाय रमेश आरोग्य मंत्रालयातील बनावट पत्रांचाही वापर करायचे. त्यांनी बिधुभूषण स्वाईं आणि रमणी रंजन स्वाईं यांच्या नावानंही बनावट ओळखपत्रं तयार केले होते. त्यांच्या अटकेच्या वेळी खंडगिरीमधील फ्लॅटमधून ते जप्त करण्यात आले.

रमेश डॉक्टर नाहीत. पण त्यांनी कोच्चीमधून पॅरा मेडिकल, लॅबोरेटरी टेक्नोलॉजी आणि फार्मसीचा डिप्लोमा केला होता. त्यामुळं उपचारांबाबत त्यांना काहीशी माहिती होती. ही माहिती महिलांना ठगण्यासाठी त्यांना कामी येत होती.

फसवणुकीची इतर प्रकरणं

महिलांशी खोटी लग्नं करत त्यांना ठगण्याशिवाय रमेश यांनी इतरही अनेकांना ठगलं आहे. त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन देत देशातील अनेक तरुणांकडून पैसे उकळले. या प्रकारात त्यांना हैदराबाद पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं अटकही केली होती. पण जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी परत अशी कामं सुरू केली.

याबाबतही भुवनेश्वर पोलिस हैदराबाद पोलिसांकडून माहिती घेत असल्याचं, डीसीपी दास यांनी म्हटलं.

त्याशिवाय रमेश यांनी 2006 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रं देऊन केरळच्या विविध बँकांकडून एक कोटींपेक्षाही अधिक पैसे ठगले होते. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती, पण काही दिवसांनी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

त्याबरोबरच रमेश यांनी एका गुरुद्वाऱ्यालाही मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं आश्वासन देत त्यांच्याकडूनही 13 लाख रुपये उकळले होते.

देशातील अनेक राज्यांमधल्या एवढ्या लोकांना फसवल्यानंतर आणि दोन वेळा अटक झाल्यानंतरही रमेश आतापर्यंत कायद्याच्या कचाट्यात कसे अडकले नाही आणि महिला तसेच लोकांची फसवणूक कशी करत राहिले ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)