You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश निवडणूक : योगी आदित्यनाथ यांनी '80 विरुद्ध 20' चं गणित 'असं' समजावून सांगितलं
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 'राजपुतांचं राजकारण' करतात का? योगी आदित्यनाथ यांच्या '80 विरुद्ध20' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय होता?
अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं योगी आदित्यनाथ यांनी इंग्रजी वृत्तपत्र 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वरिष्ठ निवासी संपादक सुनिता अॅरॉन यांच्याबरोबरच्या मुलाखतीत दिली आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर राजपुतांचं राजकारण करत असल्याचा आरोप लागल्यानं त्यांना दुःख होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी क्षत्रिय जातीत जन्म घेणं हा काही गुन्हा नाही, आणि त्याचं काहीही दुःख होत नाही, असं म्हटलं.
"क्षत्रिय जातीत जन्म घेणं हा गुन्हा थोडाच आहे. या देशात अशा जाती आहेत, ज्यात देवांनी जन्म घेतले आहेत आणि वारंवार घेतले आहेत. त्यामुळं स्वतःच्या जातीवर प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान असायला हवा," असंही ते म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात त्यांच्या सरकारनं कोणत्याही व्यक्तीची जात, धर्म किंवा मतं यांचा विचार न करता काम केलं आहे असा दावाही केला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केलं. जे लोक जातीबद्दल बोलत आहेत, त्यांनी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच काम केलं आहे, असा आरोप त्यांनी केला.
"आम्ही 43 लाख घरं तयार केली आहे. मला वाटतं त्यात क्षत्रिय 1 टक्काही नसतील. अगदी 1 हजारही नसतील. 43 लाख घरं ही गरीब, दलित, अल्पसंख्याक यांच्यासाठीच तयार झालेली आहेत," असं ते म्हणाले.
'80 विरुद्ध 20' च्या वक्तव्यावर काय म्हणाले आदित्यनाथ?
योगी आदित्यनाथ यांचं '80 विरुद्ध 20' संदर्भातलं वक्तव्य प्रचंड चर्चेत आलेलं होतं. भाजपकडून ट्विट करण्यात आलेल्या एका व्हीडिओमध्ये योगी आदित्यनाथ यांचं हे वक्तव्य आहे.
"मी अत्यंत आत्मविश्वासानं म्हणू शकतो की, ज्यांना गैरसमज झाला आहे आणि जे गणिताचे आकडे राज्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे त्यांची मोठी चूक होणार आहेत. ही निवडणूक 80 विरुद्ध 20 अशी असेल. 80 टक्के पाठिंबा एका बाजूला असेल, तर 20 टक्के पाठिंबा दुसरीकडे असेल," असं ते म्हणाले.
अनेक राजकीय तज्ज्ञ आणि विश्लेषक तसंच नेते या वक्तव्यातील '20 टक्के' याचा संबंध मुस्लिमांशी जोडत आहेत.
या वक्तव्याबाबत सुनिता अॅरोन यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी, 80 टक्क्याचा अर्थ प्रत्येक जाती धर्मातील राष्ट्रहित, विकास आणि सुशासनाचा विचार करतात असे लोक हा असल्याचं सांगितलं. तर, "20 टक्क्यांमध्ये विध्वंसाचं किंवा फुटीचं राजकारण, अराजकता, दंगली, भ्रष्टाचार यावर विश्वास असणाऱ्यांचा समावेश होतो," असं ते म्हणाले.
मागास जातीच्या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानं होणाऱ्या परिणामाचं उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक लोक त्यांच्या पक्षात प्रवेशही करत असल्याचं सांगितलं.
"आमच्याकडेही अनेक लोक आले आहेत. आरपीएन सिंह यांनीही प्रवेश केला आहे. हरिओम यादव हे मुलायम सिंहांचे व्याही, अपर्णा यादव यांनी प्रवेश केला आहे. हे मागास चेहरे नाहीत का?" असं ते म्हणाले.
विरोधकांकडून फुटीचं राजकारण - योगी आदित्यनाथ
भाजप फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी मुलाखतीत फेटाळला. भाजप विकास, सुरक्षा, राष्ट्रवाद आणि सुशासनाचं राजकारण करत असल्याचं योगी म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी सपा, बसपा, काँग्रेसवरच जनतेमध्ये फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोप केला.
"दंगलखोर, गुन्हेगार आणि माफियांना सत्तेचं संरक्षण देऊन आणि पक्षाकडून तिकिट देणं हा फूट पाडण्याच्या राजकारणाचा भाग आहे. समाजवादी पक्ष अशा प्रकारचं राजकारण करत आहे. सपा आणि बसपा दोघंही अशाप्रकारचं राजकारण करत आहेत. त्या दोघांमध्ये यासाठी स्पर्धा लागली आहे," असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
रालोदबरोबर जाण्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी रालोद अध्यक्ष जयंत चौधरी आणि भाजप एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत, याबाबतही योगींना विचारण्यात आलं. त्यावर गहमंत्र्यांकडून ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.
"मला वाटतं राजकारणात तुम्ही कोणतीही शक्यता फेटाळू शकत नाही. तसंच स्पष्टपणे त्याला होकारही देऊ शकत नाही," असं ते म्हणाले.
त्याचबरोबर सपा, बसपा आणि काँग्रेस दंगलखोर आणि माफियांना तिकिट देऊन पश्चिम उत्तर प्रदेशला दंगलींच्या आगीत लोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळं पश्चिम युपीमधील कोणीही अशा पक्षांच्या पाठिशी राहू इच्छित नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
मुलाखतीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कैरानाबद्दलही मत मांडलं. कैरानामधून जे लोक पळून गेले होते, ते आता भाजपमध्ये परत आले आहेत, असंही ते म्हणाले.
मुलाखतीच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा बहुमताचं सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार असल्याचा दावाही केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)