You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना-भाजपमधला राजकीय सामना हीन पातळीवर पोहोचलाय का?
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसत आहे. बुधवारी (16 फेब्रुवारी) नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलींद नार्वेकर यांच्यावर सडकून आरोप केले आहेत. लागलीच या आरोपांना नार्वेकरांनी ट्वीटरवरून तर कोकणातले खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.
मात्र, गेले काही दिवस भाजपचे नारायण राणे, किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रसाद लाड तर शिवसेनेचे संजय राऊत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर एकमेकांवर जमेल तशी आणि जमेल त्या भाषेतली टीका करताना दिसून आलेत.
प्रत्येकाने एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर राऊतांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांना उद्देशून अपशब्दही काढले. यामुळे राज्याच्या राजकारणाचा स्तर खालावल्याची चर्चा सुरू आहे. हे सगळं का? आणि कसं घडलं? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
गेले काही दिवस सातत्याने भाजप नेते किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तसेच ठाकरेंच्या जवळचे नेते आणि मंत्री अनिल परब, संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.
सोमय्यांच्या या आरोपांची दखल ईडीने घेत तपासालाही सुरुवात केली आहे. अखेर याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी शिवसेना नेत्यांची मोठी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले.
सोमय्यांनी हे आरोप फेटाळत अलिबाग जवळच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी घेतलेल्या 19 बंगल्यांचा मुद्दा कागदपत्रांसह मांडला. राऊत विरुद्ध सोमय्या अशा रंगलेल्या सामन्यात दोन्ही बाजूंनी इतर नेत्यांनी उड्या घेतल्या.
यापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून 'किरीट सोमय्या यांना किलीट तोमय्या म्हणत खिल्ली उडवली आहे.' तसंच त्यांना धडा शिवण्याचीही भाषा करण्यात आली होती.
नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात कशावरून वाद झाला?
राणेंनी राऊत यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी नार्वेकरांनी ट्वीट केलं.
ते या ट्वीटमध्ये म्हणतात की, "बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?" याला लागलीच राणेंनीही ट्वीटरवरून उत्तर दिलं.
सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय? अश्या किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका.
राणे-नार्वेकर वाद एकीकडे सुरू असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे-नितेश राणे पिता पुत्रावर हल्ला केला. त्यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांनी नारायण राणेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचा व्हीडिओ माध्यमांपुढे सादर केला.
शिवसेना-भाजप संघर्ष टोकाला पोहचलाय का?
हे सगळे आरोप - प्रत्यारोप होत असताना व्यक्तीगत पातळीवरची टीका, कुटुंबीयांबद्दल अपशब्द या नेत्यांच्या तोंडी दिसून आले. अखेर यामुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा हीन होतोय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
आम्ही या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडून जाणून घेतलं. देसाई याबद्दल म्हणतात, "नक्कीच हे राजकारण खालच्या स्तरावर पोहचलंय. यापूर्वी देखील राज्यात असं परस्परविरोधी राजकारण घडलं होतं. बॅरिस्टर अंतुले विरुद्ध शरद पवार आणि शंकरराव चव्हाण विरुद्ध पवार अशा राजकीय लढती झाल्या. मात्र, त्यांच्या राजकारणाचा दर्जा खालवला नव्हता. आताची टीका या नेत्यांनी व्यक्तिशः घेतलेली दिसतेय. यातून त्यांनी महिलांवर देखील अपशब्द काढलेत. हे अयोग्य आहे."
ते पुढे म्हणाले, "यापूर्वी असं घडलं नव्हतं. त्यातच येत्या काळात 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आता सुरू झालेला संघर्ष थांबेल किंवा अजून गंभीर होईल अशी भीती आहे. हे महाराष्ट्राला नक्कीच शोभणारं नाही."
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ज्वर वाढताना दिसेल. पण आगामी काही वर्षे राजकारणाची ही पद्धत अशीच दिसून येईल असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात.
"महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या राजकारणाची पातळी खालावली आहे. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती सुरू आहे. हातातली सत्ता गेल्यानंतर भाजपची अवस्था आणि शिवसेनेचं प्रत्युत्तर त्यात हा संघर्ष दिसून येत आहे. या संघर्षाला सुरुवात कोणी केली हा मुद्दा असू शकतो. पण आता ही उलट्या पायाची शर्यत आहे. या राजकारणाला कोणी एक जबाबदार नाही, सगळेच याला जबाबदार आहेत,"
त्यामुळे सेना-भाजपचा हा आमने-सामने सुरू झालेला लढा पुढे किती काळ आणि कसा चालेल हे आता पाहावं लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)