You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: लॉकडाऊनमध्ये उत्तर प्रदेशातील तीन जिल्ह्यात अझानला परवानगी पण लाऊडस्पीकरला मनाई
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.लॉकडाऊनमध्ये मशिदीतल्या आझानला परवानगी, पण रात्री लाऊडस्पीकर नको - अलाहाबाद हायकोर्ट
अलाहाबाद हायकोर्टाने शुक्रवारी उत्तर प्रदेशातल्या तीन जिल्ह्यांत - गाझीपूर, हथ्रास आणि फारुखाबादमध्ये अझानला परवानगी दिली. गृहमंत्रालयाने लावलेल्या लॉकडाऊनचं कारण देत जिल्हाप्रशासनाने अझानवर बंदी घातली होती. हथ्रासमधल्या नागरिकांच्या वतीने अलीगढचे माजी आमदार झमीरुल्लाह यांनी याविषयीची याचिका दाखल केली होती. 'द हिंदू'मध्ये याविषयीची बातमी आहे.
मशीदीतून अझानला परवानगी देण्यात येत असली तरी रात्री 10 ते सकाळी 6 या काळात लाऊडस्पीकरचा वापर करू नये असंही अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलंय.
2. महिन्याभरात राज्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या रिक्त जागा भरणार - राजेश टोपे
राज्यामधला कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सरकारने राज्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या रिक्त जागा महिनाभराच्या काळात भरण्याचा निर्णय घेतलाय. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी याविषयीची माहिती दिली आहे. 'TV9 मराठी'ने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरच्या परीक्षांच्या आधारे या जागा भरल्या जातील.आरोग्य आणि वैदयकीय शिक्षण विभाग, राज्यातली महापालिका रुग्णालयं यामधल्या जवळपास 30 हजार जागा सध्या रिक्त आहेत.
3.कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला 70 जणांची हजेरी, 9 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह
उल्हासनगरमध्ये 50 वर्षांच्या एका व्यक्तीचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला. पण या कुटुंबाने नियमांचं उल्लंघन करत संपूर्ण रीती पार पाडत अंत्यसंस्कार केले. यासाठी मृतदेहावरचं प्लास्टिक पॅकिंगही हटवण्यात आलं. अंत्यसंस्कारांना तब्बल 70 जणांनी हजेरी लावली. यानंतर आता यापैकी 9 जणांच्या चाचण्यांचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. 'इंडिया टुडे'ने याविषयीची बातमी छापली आहे.
4.EPFO चा दिलासा, पीएफ भरायला उशीर झाल्यास कंपन्यांना दंड नाही
लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा दंड भरायला उशीर झाल्यास त्यावर दंड लावण्यात येणार नसल्याचं EPFO ने म्हटलंय. एरवी कंपन्यांना पीएफ भरायला उशीर झाल्यास त्यासाठी कंपन्यांना दंड केला जातो. पण लॉकडाऊनच्या काळात दंड आकारला जाणार नाही किंवा याला 'डिफॉल्ट'ही मानण्यात येणार नसल्याचं कामगार मंत्रालयाने म्हटलंय. 'बिझनेस स्टँडर्ड'ने याविषयीची बातमी प्रसिद्ध केलीय.
5.कोरोना योद्ध्याचा मृत्यू झाल्यास नंदुरबार जिल्हा परिषद देणार 25 लाखांचं सानुग्रह अनुदान
जिल्हा परिषदेच्या कोरोना योद्ध्याचा कामादरम्यान मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचं नंदुरबार जिल्हा परिषदेने जाहीर केलंय. 'लोकसत्ता'मध्ये याविषयीची बातमी आहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबतच सध्या जिल्ह्यात आशा, अंगणवाडी सेविका आणि अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत आहेत. त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)