You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे यांना देवेद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, 'श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही'
तुझं माझं न करता नागरिकांच्या भल्यासाठी काम करायला हवंय. खेचाखेची का करायची? या चर्चा करूया. विरोधकांना सांगतो, मेट्रोचं श्रेय तुम्हाला देतो. तुम्ही हा प्रश्न सोडवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी बोलताना केलं.
राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईसाठी, राज्यासाठी मी अहंकारी. मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथे होणार आहे. आरेमध्ये पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्ती वाढवली. कांजुरमार्ग इथे 40 हेक्टर जागा आहे. पर्यावरणीय दृष्टीने पाहिले तर गवताळ, ओसाड प्रदेश आहे. आरेला मेट्रो3 ची कारशेड होणार होती. कांजुरमार्गला तीन मार्गांची कारशेड होऊ शकते. तिन्ही मार्गांचे कारडेपो एकत्र करू शकतो. कांजुरमार्गला कारशेड केली तर पुढची 100 वर्ष पुरू शकेल असा प्रकल्प. राज्यासाठी जे उपयुक्त ते मी करणार."
ते पुढे म्हणाले, "बुलेट ट्रेनसाठी जगातला सगळ्यात महागडा बीकेसी इथली जागा दिली. केंद्राच्या प्रकल्पाला खळखळ न करता जमीन देतो. वाद आहे म्हणून जागा सोडून द्यायची? केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन प्रश्न सोडवायला हवा. जनतेची जागा आहे. तुझं माझं न करता नागरिकांच्या भल्यासाठी काम करायला हवंय. खेचाखेची का करायची? या चर्चा करू. वाद राज्याच्या, जनतेच्या हिताचा नाही. अडवाअडवी योग्य नाही. कद्रूपणा करू नका. विरोधी पक्षांनो सांगू इच्छितो, तुम्ही हा प्रश्न सोडवा. तुम्हाला श्रेय देतो. माझ्य इगोचा मुद्दा नाही. जनतेच्या सेवेसाठी सत्ता मागत असतो."
विरोधकांचा पलटवार
उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला?"
"आरेच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर कामसुद्धा बरेच पुढे गेले आणि 100 कोटी रुपयांचा खर्चही झाला. मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमची एकच विनंती आहे की,आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा,"असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे -
-मुंबईची रचना सखोल अशी आहे. मुंबईची तुंबई हे वर्णन नेहमीचं झालं आहे. पंपिग स्टेशनद्वारे पाणी उपसून समुद्रात सोडतो.
-अनावश्यक गर्दी करू नका. मास्क परिधान करा. हात धुवत राहा.
-युरोपातल्या काही देशांमध्ये कोरोना विषाणूची संरचना बदलली आहे. हा विषाणू अतिशय वेगाने माणसांना संक्रमित करतो. त्यांच्याकडून आपल्याला काही शिकायला हवं.
-नवीन वर्ष येतं आहे. बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. आधीच्या चुका टाळायला हव्यात.
-आपण धोक्याच्या वळणावर आहोत. कायद्याने लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावू शकतो पण कशाने काय होतं, काय होत नाही याची आपल्याला जाणीव आहे. अनेकजण मास्क घालून फिरत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण जे नियम पाळत आहेत त्यांना विनंती की सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी.
-आनंदावर बंधन घालायची गरज आहे. आजारापेक्षा काळजी घेतलेली बरी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा. मास्क हे शस्त्र आहे.
-नवीन वर्षाचं स्वागत करताना सावध राहा. लग्नसराई सुरू झाली. लग्नाला यायचं हं असं म्हटलं जातं. कोरोनाला निमंत्रण देऊ नका. लग्नांमध्ये गर्दी वाढते आहे. फोटोच्या वेळी मास्क काढून
-महाविकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केलं. हे सरकार पडणार असं लोक म्हणत होते. आरोग्य संकटाचा सामना करत, राजकीय हल्ले परतावत, विकास करत एक वर्ष पूर्ण केलं आहे.
-विकासकामाची पाहणी केली. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कामाची पाहणी केली. नागपूर ते शिर्डी हा टप्पा वाहतुकीसाठी उघडतो आहेत. सिंधुदुर्गातला विमानतळ जानेवारीत सुरू करत आहोत.
-कोयनेचं धरण पाहून आलो. कोस्टल रोडची पाहणी केली. मुंबई-पुणे मार्गावरच्या बोगद्याची पाहणी केली. धोरणं जाहीर झाली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यातली झाली आहेत.
-निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भातला पूर अनेक नैसर्गिक संकट आली. याची झळ बसलेल्या नागरिकांना नुकसाभरपाई देण्यात येत आहे.
-अंबरनाथला शिवमंदिर आहे. काही वर्षांपूवी तिथे गेलो होतो. नाकाला रुमाल लावून जावं लागलं. मंदिरांच्या इथे मनात पवित्र भावना निर्माण व्हायला हवी. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सांगितलं. त्यांनी पुढाकार घेतला. आता मंदिर परिसर बदलला आहे.
-शाळा सुरू करायच्या का? काही शिक्षक कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे यासंदर्भात आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.
-आर्थिक चणचण आहे. मान्य केलं पाहिजे. केंद्राकडून धीम्या गतीने पैसे येत आहेत. आपण रडत नाहीयोत. हळूहळू वाटचाल करत आहोत.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी फेसबुक लाईवच्या माध्यमातून संवाद साधला होता. दोन दिवसीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला अनेक मुद्यांवर धारेवर धरलं. मराठा आरक्षण, कांजुरमार्ग आरे कारशेड, कोरोना मदत अशा विविध मुद्यांवर खडाजंगी पाहायला मिळाली. मिशन बिगिन अंतर्गत राज्यात बहुतांश गोष्टी सुरू झाल्या आहेत. देवळं, हॉटेलं, जिम सुरू झालं आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वेसेवा मात्र अजूनही आपात्कालीन सेवांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांपुरतीच मर्यादित आहे. ठराविक वेळांसाठी महिलांना लोकल प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू होणार असल्याचं संकेत मिळत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार का? याकडे चाकरमान्यांचे लक्ष आहे.
मुंबईत दररोज लाखो प्रवासी उपनगरातून मुंबईच्या दिशेने कार्यालयात जाण्यासाठी प्रवास करतात. कोरोना, लॉकडाऊन यामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली. सध्या आपात्कालीन सेवांमधील कर्मचारी रेल्वेने प्रवास करतात. मात्र लाखो चाकरमान्यांना रस्ते मार्गाने कार्यालय गाठण्यासाठी खूप सारा वेळ खर्ची घालावा लागत आहे. त्यांचे पैसे आणि ऊर्जाही व्यतीत होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सर्वसामान्यांनासाठी सुरू करावी असा रेटा वाढतो आहे.
कोव्हिडची साथ येण्याआधी मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून जवळपास 78 लाख लोक दिवसाला प्रवास करत असत. अनेकदा सतराशे ते अठराशे प्रवासी क्षमता असलेल्या ट्रेनमध्ये चार हजारांहून अधिक प्रवासी असतात.
त्यामुळे पूर्ण क्षमतेने लोकल ट्रेन पुन्हा सुरू झाल्या, तर तिथे कोव्हिडचा प्रसारही वेगाने होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतल्या लोकल ट्रेन्स जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.
"मुंबई लोकल जानेवारीमध्ये सर्वांसाठी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कशापद्धतीने मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित असावा यासंदर्भातील सरकारची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा आमचा विचार आहे," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.
आता मुंबई आणि परिसारातली कोरोनाची स्थिती निवळली आहे. त्यामुळे आम्ही आता 15 दिवसांमध्ये आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेऊ असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. शिवाय विनामास्क ट्रेनमध्ये प्रवेश करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना लस सर्वसामान्यांना कशी मिळणार, लस देण्याच्या प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री बोलणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. जगभरात तसंच भारतातही कोरोनावरच्या लशींचं काम वेगवान सुरू आहे. सगळी प्रक्रिया पार पडून ही लस सर्वसामान्यांना कधी उपलब्ध होणार याविषयी घोषणा झालेली नाही. मात्र केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण प्रक्रिया सुरू होऊ शकते असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)