मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसनं स्वबळावर लढवावी - भाई जगताप

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं 227 जागा स्वबळावर लढवाव्यात, असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

पुणे भेटीदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

जागावाटप नेहमीच अडचणीचा विषय होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं मला 227 जागा लढायला आवडेल आणि माझा तो प्रयत्न राहिल, असंही जगताप यांनी म्हटलंय.

मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जगताप यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद

शनिवारी (19 डिसेंबर) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं .

नवीन नियुक्त्यांमध्ये मोहम्मद आरिफ नसिम खान यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद, चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे मुंबईचे प्रभारी पद, प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची कमान भाई जगताप यांच्या खांद्यावर असणार आहे.

कोण आहेत भाई जगताप?

अशोक जगताप यांना भाई जगताप या नावाने ओळखलं जातं. ते सध्या काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषदेत आमदार आहेत.

जगताप यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा..)