'लाहोर भारतात घेण्याच्या काँग्रेसने तीन संधी गमवल्या' - नरेंद्र मोदी #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. 'लाहोर भारतात घेण्याच्या काँग्रेसने 'या' तीन संधी गमवल्या' - नरेंद्र मोदी

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारसभेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

'त्यावेळी भारतीय सैन्य 6 किलोमिटर पुढे गेलं असतं तर गुरूनानक देव यांची तपोभूमी (लाहोर) भारतात राहिली असती,' असं नरेंद्र मोदी म्हणाले. यासाठी त्यांनी तीन घटनांचा उल्लेख केला. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

देशाची फाळणी, 1965चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि 1971चं बांगलादेश युद्ध या तीन घटनांचा उल्लेख करत ते म्हणाले, "जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा काँग्रेस होती. सीमेपासून 6 किलोमीटर अंतरावर लाहोर येथे गुरुनानक देवजींच्या तपोभूमीला भारतात घेतलं जावं एवढंही काँग्रेसच्या नेत्यांना कळालं नाही का? काँग्रेसच्या लोकांनी पाप केलं आहे. आपल्या भावना दुखावल्या आहेत," असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भारत-पाकिस्तान 1965 साली झालेल्या युद्धाचे उदाहरणही दिले आहे. यावेळी काँग्रेसने दुसरी संधी गमवली असं ते म्हणाले.

"1965च्या लढाईमध्ये भारतीय सेना लाहोरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या हेतूनेच पुढे गेली. यावेळी दोन पावलं आणखी पुढे गेले असते तर गुरुनानक देवजींची तपोभूमी आपल्याकडे असती."असंही ते म्हणाले.

तर तिसरी घटना सांगताना त्यांनी 1971 मधील बांगलादेश युद्धाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले, "बांगलादेशच्या युद्धात 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा दिल्लीत बसलेल्या काँग्रेस सरकारमध्ये हिंमत असती तर ते म्हणाले असते की तुमचे सैनिक तुम्हाला तेव्हाच परत मिळतील जेव्हा आम्हाला गुरुनानक देवजींची तपोभूमि परत मिळेल." असे गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केले.

या तीन घटनांचा संदर्भ देत काँग्रेसने तीन संधी गमवल्या असंही ते म्हणाले.

2. नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात शाब्दिक युद्ध

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसत आहे. बुधवारी (16 फेब्रुवारी) नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली.

"कोण मिलिंद नार्वेकर? तो मातोश्रीवर बॉय म्हणून तो का?" असं राणे भर पत्रकार परिषदेत म्हणाले. यानंतर नार्वेकरांनीही याला प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर असे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित नव्हते. याबाबत राणेंना प्रश्न विचारला.

ते म्हणाले, "कोण मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीवर बॉय म्हणून काम करायचे ते का? माझ्या समोरची गोष्ट आहे. मी पाहिले आहे की बेल वाजली की येस सर, काय आणू म्हणून विचारायचे. तो पुढे नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे." असा खोचक टोला नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांना लगावला. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

राणेंनी आपल्या वैद्यकीय महाविदायलयाच्या परवानगीसाठी किती वेळाआपल्याला फोन केला याची आठवण करून देत मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?"

या ट्वीटनंतर राणेंनी पुन्हा ट्वीट केलं. यावेळी त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय? अशा किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका."

3. महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक?

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याचं सातत्याने अनेक उदाहरणांमधून समोर आलं आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज (17 फेब्रुवारी) महत्त्वाची बैठक होणार असल्याचं समजतं.

काँग्रेसची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

महाविकास आघाडीतील पक्ष आणि विरोधक भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सरकारमधील पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद नको यादृष्टीनेही चर्चा केली जाणार आहे.

10 मार्चनंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. पण पटोलेंना मंत्री व्हायचं असल्याने ते असं बोलत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली.

इतर पक्षांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही विचार नाही, काँग्रेसचा असल्याच आपल्याला कल्पना नाही असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

4. गोव्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण करणारं गोवा हे पहिलं राज्य ठरलं आहे. गोव्यात लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती बुधवारी (16 फेब्रुवारी) देण्यात आली.

18 वर्षावरील 11.66 लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. गोव्यातील निवडणुकांमुळेही लसीकरणावर परिणाम झाला होता. परंतु राज्यात आता 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

लसीकरणामुळे गोव्यातील रहिवासी आणि पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गोव्यातही रुग्णसंख्या वाढली होती. याचा थेट परिणाम गोव्यातील पर्यटन व्यवसायावर झाला होता. त्यामुळे स्थानिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता.

गोव्यातील लसीकरण पूर्ण झाल्याने पर्यटकांची संख्याही वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

5. राज्यांनी आढावा घेऊन निर्बंध शिथिल करावे - केंद्र सरकारची सूचना

देशातील करोनाची रुग्णसंख्या कमी झाली असून दैनंदिन रुग्णसंख्या आणि टेस्टिंगच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे, ते म्हणाले, "21 जानेवारीपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरलेला दिसतो आहे. गेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या 50 हजार 476 नोंदवण्यात आली. तर गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवीन रुग्ण आढळले." लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

जानेवारीपासून अनेक राज्यांनी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नव्याने निर्बंध लागू केले होते. तसंत अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि विमानतळांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. परंतु आता परिस्थिती पाहून पुनर्विचार करावा असं केंद्र शासनाने राज्यांना सुचवलं आहे.

राज्यातील प्रवेशद्वारांवर राज्य सरकारांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवसायाला अडथळा येऊ नये याची काळजी घ्यावी असंही राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)