Corona Omicron: मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट झाली, कारण...

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट झालेली पाहायला मिळतेय.

ओमिक्रॉनची तिसरी लाट झपाट्याने पसरल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारापार गेली होती. पण, भरमसाठ रुग्णवाढ झाल्यानंतर तीन आठवड्यातच मुंबईतील कोरोनाचा कर्व्ह सपाट (Flat Curve) होताना दिसून येतोय.

महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, "मुंबईत ओमिक्रॉनच्या रुग्णवाढीचा कर्व्ह सपाट (Flat Curve) नक्की होतोय."

मुंबईत कोरोनाचा कर्व्ह सपाट खरंच झालाय? का टेस्टिंग कमी झाल्यामुळे असं झालंय? अनेकांनी होम टेस्ट केल्यामुळे संसर्गाची खरी आकडेवारी दिसून येत नाहीये? या अनेक प्रश्नांवर आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील कोरोनासंसर्गाची आकडेवारी काय सांगते?

मुंबईत डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनासंसर्गाचा झपाट्याने प्रसार होण्यास सुरूवात झाली. ओमिक्रॉनची तिसरी लाट त्सुनामीच्या वेगाने पसरत होती.

  • 20 डिसेंबर 2021- मुंबईत 204 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद
  • 7 जानेवारी 2022- कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढून 20,971 पर्यंत पोहोचली
  • अवघ्या 19 दिवसात कोरोनारुग्णांचा आकडा 100 पटींनी वाढला

तीन आठवड्यातच कोव्हिड-19 च्या संक्रमणात झपाट्याने वाढ झाली. डेल्टा व्हेरियंटच्या दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येचा आकडा केव्हाच पार झाला होता. स्थिती नियंत्रणाबाहेर जातेय का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण, गेल्या चार दिवसांपासून कोरोना आकडे पुन्हा कमी होताना दिसून येत आहेत.

  • 8 जानेवारी- कोरोनाबाधितांची संख्या 20,318
  • 9 जानेवारी- 19,474 कोरोनारुग्णांची नोंद
  • 10 जानेवारी- 13,648 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
  • तर 11 जानेवारीला हा आकडा 11,647 पर्यंत खाली आलाय

मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या या आकडेवारीवरून असं दिसून येतंय की कोरोनासंसर्ग हळूहळू नियंत्रणात येत आहे.

पण बुधवारी मुंबईत केसेसमध्ये थोडी वाढ पाहायला मिळाली. 12 तारखेला 16,420 रुग्ण आढळले. पण 13 जानेवारीला ही संख्या कमी होऊन 13,702 रुग्णांची नोंद झाली.

मुंबईतील कोरोनाचा कर्व्ह खरंच सपाट होतोय?

तज्ज्ञांच्या मते, मुंबईतील कोरोनारुग्णांचे कमी होणारे आकडे दर्शवतात की कोरोना रुग्णवाढीचा कर्व्ह आता सपाट होऊ लागलाय. ज्या तीव्र वेगाने रुग्णसंख्या वाढली, आता रुग्णसंख्येतील वाढ स्थिरावताना दिसून येत आहे.

तज्ज्ञ सांगतात, कोरोनारुग्णवाढीचा कर्व्ह सपाट होण्यामागे प्रमुख पाच कारणं दिसून येत आहेत

  • लक्षणं असलेले रुग्ण टेस्ट करत नाहीयेत
  • अनेकांनी स्वत: ला घरीच आयसोलेट केलंय
  • होम टेस्टिंगमुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा खरा आकडा मिळत नाही
  • टेस्टिंगचं कमी झालेलं प्रमाण
  • कमी झालेला टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट

कोरोना रुग्णसंख्येवरून मुंबईतील कर्व्ह सपाट झालाय? कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, "ओमिक्रॉनच्या रुग्णवाढीचा कर्व्ह सपाट (Flat Curve) नक्की होतोय." मुंबई शहरातील टेस्ट पॉझिटिव्हिटी दर (टेस्टच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणारे रुग्ण) 30 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर येणं अपेक्षित आहे.

मुंबईतील टेस्ट पॉझिटिव्हीटी दर 20 डिसेंबरला 0.66 टक्के होता. ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेत 20 दिवसात टेस्ट पॉझिटिव्हीटी दर 29 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, "दोन दिवसातच मुंबईतील टेस्ट पॉझिटिव्हिटी 30 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत कमी झालीये." दैनंदिन रुग्णसंख्यादेखील 20 हजारापासून कमी होऊन 11 हजार पोहोचलीये.

  • रविवारी टेस्ट पॉझिटिव्हीटी दर होता 28 टक्के
  • सोमवारी हा दर 23 टक्के
  • तर मंगळवारी 18.70 टक्के झाला

मुंबईतील कोरोनाचे आकडे पाहाता ही लाट ओसरताना दिसतेय का? यावर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, " सद्यस्थितीत असं म्हणता येणार नाही. पुढील काही दिवस आपल्याला रुग्णसंख्येवर लक्ष ठेवावं लागेल." तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही.

कोकिलाबेन रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. तनू सिंघल बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "मुंबईत कोरोनारुग्णवाढीचा दर नक्कीच सपाट झालाय." याची त्यांना आढळून आलेली तीन प्रमुख कारणं त्या पुढे सांगतात.

  • रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी झालंय
  • उपचारासाठी रुग्णालयात येणारे आणि फोनवरून चौकशी करणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होणं
  • कमी झालेला पॉझिटिव्हीटी रेट

त्या पुढे म्हणाल्या, दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दिवसभर फोन येत होते. आता ही संख्या खूप कमी झाल्याचं येतंय.

मात्र नानावटी रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसीन तज्ज्ञ डॉ. हर्षद लिमये रुग्णसंख्या खरचं कमी होतेय का? याबाबत साशंक आहेत. "मुंबईत गेल्याकाही रुग्णसंख्या कमी झालीये. पण यामागे काही कारणं असू शकतात. कारण, काही दिवसांपासून टेस्टची संख्या कमी झालीये."

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत फार फरक पडलेला नाही. पण, रुग्णवाढीचा कर्व्ह खराब होत नाहीये, असं डॉ. लिमये पुढे म्हणाले.

टेस्टिंग कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी दिसून येतेय?

तिसऱ्या लाटेतील मुंबईत सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली, त्यादिवशी 72 हजारपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या होत्या. पण, गेल्या चार दिवसात चाचण्यांचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून येतंय.

  • 8 जानेवारी- 71,019 चाचण्यात करण्यात आल्या
  • 9 जानेवारी चाचण्यांची संख्या 68 हजारापर्यंत खाली आली
  • 10 जानेवारीला 59 हजार चाचण्या
  • तर 11 जानेवारीला 62 हजार कोव्हिड चाचण्या झाल्या

डॉ. शशांक जोशी पुढे म्हणाले, "लोक टेस्ट करण्यासाठी पुढे येत नाहीयेत. अनेक लोक घरीच आयसोलेट करून घेत आहेत." हे देखील कोरोनारुग्णवाढीचा कर्व्ह सपाट किंवा फ्लॅट होण्याचं एक कारण दिसून येतंय.

ओमिक्रॉन अत्यंत संसर्गजन्य आहे. घरातील एका व्यक्तीला लागण झाल्यानंतर संसर्ग झपाट्याने पसरतोय. त्यामुळे टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह येऊ या भीतीनेही लोक टेस्ट करत नाहीयेत.

मुंबईत टेस्टची संख्या कमी झालीये. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसून येतेय? यावर डॉ. तनू सिंघल पुढे सांगतात, "हे खरंय की टेस्टिंग कमी झालंय. पहिल्यांदा लोकांमध्ये भीती होती. आता, आजार सौम्य असल्याची भावना आहे." त्यामुळे लोक टेस्ट करण्यासाठी पुढे येत नाहीयेत.

त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की टेस्टिंग आणि रिपोर्टिंग कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसून येत आहे.

होम टेस्टिंगचं रिपोर्टिंग होत नाही?

ओमिक्रॉन हा नाक आणि घशापर्यंत मर्यादीत रहातोय. फुफ्फुसांपर्यंत संसर्ग फार कमी दिसत असल्याने रग्णांना सर्दी, खोकला आणि ताप अशी सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे लोक घरीच कोरोना चाचणीसाठी उपलब्ध किट्सचा वापर करून टेस्ट करत आहेत.

गेल्या काही दिवसात मुंबईत 96 हजार नागरिकांनी होम टेस्ट किट वापरून कोरोना चाचणी केलीये. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "यातील 3000 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत."

कोरोनासंसर्गाचं निदान लवकर व्हावं म्हणून डॉक्टर रुग्णांना होम टेस्ट किटने चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. पण, खरा धोका म्हणजे यातून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीये. रुग्ण माहिती देत नसल्याने रुग्णांचा खरा आकड़ा समोर येत नाहीये.

घरी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेला माहिती न देणाऱ्यांबाबत मुंबईच्या महापौरांनी खरी चिंता व्यक्त केलीये. त्या सांगतात, "घरी पॉझिटिव्ह येणाऱ्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी."

कोव्हिड टेस्ट किट कंपनी मायलॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक हंसमुख रावल बीबीसीशी बोलताना सांगतात, "डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना चाचणीसाठी होम टेस्ट किटची विक्री तब्बल 400 ते 500 पटींनी वाढलीये."

दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि पुण्यात होम किट्सटी मागणी वाढल्याचं केमिस्ट सांगतात.

डॉ. लिमये यांनीदेखील होम किट्सचा मुद्दा उपस्थित केलाय. ते म्हणाले, "अनेक रुग्ण घरीच रॅपिड अॅन्टीजिन टेस्ट करून कोरोनासंसर्ग झालाय का, हे तपासण्याची शक्यता आहे." लक्षणं सौम्य असतील तर ते प्रशासनाला याची माहिती देणारही नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसून येतेय.

केंद्र सरकारच्या टेस्टिंग गाईडलाईन्स?

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने दोन दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट टेस्टिंग कोणी करावी आणि कोणी करू नये, याबाबत गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

  • लक्षणं नसलेल्यांनी टेस्ट करू नये
  • कोरोनारुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्टशिवाय इतरांनी करू नये
  • होम आयसोलेशनच्या प्रोटोकॉलप्रमाणे डिस्चार्ज झालेले रुग्ण
  • रुग्णालयात उपचारानंतर डिस्चार्ज करण्यात आलेले रुग्ण
  • देशांतर्गत प्रवास करणारे लोक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, "सौम्य लक्षणं आणि सतत तीन दिवस ताप नसलेले होम आयसोलेशनमधील रुग्ण, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सात दिवसांनंतर डिस्चार्ज धरले जातील." त्यांना पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाही.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, केंद्राने होम आयसोलेशननंतर सात दिवसात डिस्चार्ज सांगितल्यामुळे घरच्या घरी पॉझिटिव्ह येणारे रुग्णांची आकडेवारी पुढे येत नाहीये. त्यामुळे कोरोनावाढीचा ग्राफ सपाट दिसून येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)