You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Omicron : कोरोनाची लस घेऊनही काहींना कोव्हिड का होतोय?
देशात कोरोना रुग्णांचे आकडे पुन्हा एकदा वाढतायत. यावेळी लशीचे दोन्ही डोस झालेल्यांनाही संसर्ग झाल्याचे दिसत आहे. लस घेऊनही कोव्हिड का होतोय याचा घेतलेला हा आढावा.
शुक्रवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केलं की, देशात आतापर्यंत कोरोना लशीचे 150 कोटी डोस दिले गेलेत. तर याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 19 वर्षांवरील 90% लोकांचे निदान पहिले डोस पूर्ण झाल्याचं सांगितलं होतं. थोडक्यात, देशात लसीकरण मोहीम सध्या जोरात सुरू आहे.
त्याचवेळी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात नवीन रुग्णसंख्याही वाढत आहे. 7 जानेवारीला तर हा आकडा 24 तासात एक लाखाच्या वर गेला.
देशात तिसरी लाट सुरू झाल्याचं हे लक्षण आहे. आणि यावेळी जगभराप्रमाणेच भारतातही ही लाट ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आलेली असू शकते.
अलीकडे वाढणाऱ्या कोरोना संसर्गांचं एक लक्षण म्हणजे यातल्या अनेकांचे लशीचे दोन्ही डोस झालेले होते.
जगभरातही खासकरून ओमिक्रॉन व्हेरियंटच्या बाबतीत हे प्रकर्षाने दिसून आलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शंका आल्याशिवाय राहणार नाही की, लस घेऊनही काहींना कोरोना संसर्ग का होतोय?
लस घेऊनही काहींना कोव्हिड का होतो?
फक्त भारतातच नाही तर जगभरात सध्या नवा उद्रेक बघायला मिळत आहे. अमेरिकेत या आठवड्यात सोमवारी आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 10 लाख रुग्णांचा आकडा पाहायला मिळाला.
दक्षिण आफ्रिका आणि युरोप डिसेंबर महिन्यात आलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येतून नुकताच सावरत आहे.
जगभरातली ही परिस्थिती बघून जागतिक आरोग्य संघटनेला स्पष्ट करावं लागलं की, ओमिक्रॉनचा संसर्ग सौम्य आहे असं समजू नका. ओमिक्रॉनमुळेही जगभर जीव जातायत.
प्रगत देशांमध्ये तर भारताच्याही आधी कोरोना लशी उपलब्ध होत्या, लसीकरणही सुरू झालं होतं. मग अशावेळी लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग का होतोय असा प्रश्न पडला असेल तर आरोग्य परिषदेनं दिलेलं आणखी एक स्पष्टीकरण बघा.
ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या 90% लोकांनी लस घेतली नव्हती.
लस घेतलेली असेल तर आजाराची गंभीरता किंवा लक्षणं सौम्य होतात यावर अजूनही आरोग्य तज्ज्ञ ठाम आहेत.
मुंबईतल्या नेस्को कोव्हिड सेंटरच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे याविषयी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या,
"26 डिसेंबरपासून आमच्याकडे रुग्णांची संख्या वाढली आहे हे खरं आहे. आधी सातच्या आसपास असलेली संख्या एकदम 850च्या घरात जाऊन पोहोचली.
अलीकडे दोन दिवसांत आयसीयुमध्ये भरती होणाऱ्यांची संख्याही त्या मानाने वाढतेय. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यंदा लोकांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडलेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे, आयसीयुमधले 80% रुग्ण हे काही कारणांनी लस न घेतलेले रुग्ण आहेत."
ओमिक्रॉन लशीला जुमानत नाही?
लशीवर संशोधन सुरू होतं तेव्हापासून तज्ज्ञ आपल्याला सांगत होते की, कुठलीही लस ही रोगाविरोधात शंभर टक्के संरक्षण देत नाही.
पण, त्यामुळे आजाराची गंभीरता नक्की कमी होते. लस घेतल्यानंतर कालांतराने मिळणारं संरक्षण कमी होत जातं ते दोन कारणांमुळे.
कमी होत जाणारी रोगप्रतिकारशक्ती
लशीमुळे मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती कालांतराने कमी होते. कोरोनाविरोधात सध्या उपलब्ध असलेल्या लशी या पहिल्या पिढीच्या लशी मानल्या जातात.
म्हणजे सुरुवातीला आढळलेल्या कोरोना व्हायरसला मारून किंवा त्याचा परिणाम सौम्य करून त्याच्या स्पाईक प्रोटिनपासून तज्ज्ञांनी ही लस बनवली.
ती शरीरात गेल्यावर रोगप्रतिकारक यंत्रणा कामाला लागेल आणि कोरोना विरोधी अँटीबॉडीज् तयार होऊन आपल्याला संरक्षण मिळेल असं गणित होतं.
पण, अशारितीने तयार झालेल्या अँटीबॉडीज् काही काळाने कमीही होतात.
सहा ते नऊ महिन्यांनी तर शरीरातली एका विशिष्ट रोगाविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे कमी होते. म्हणूनच तिसऱ्या डोसची किंवा बूस्टर डोसची शिफारस केली जातेय.
कोरोनाचे बदलते व्हेरियंट्स
दुसरं कारण म्हणजे कोरोनाचे बदलते व्हेरियंट्स. - कोरोना व्हायरस सातत्याने बदलतोय. त्यात मोठे जनुकीय बदल होतायत.
त्यामुळे आधी बनलेल्या लशींना नवनवे व्हेरियंट्स गुंगारा देऊ शकतात. जिथे ओमिक्रॉन सर्वांत आधी सापडला तिथे असं दिसलं की ओमिक्रॉन काही प्रमाणात लशींच्या जुमानत नाहीये.
त्यामुळे लस घेतलेले लोक आजारी पडत आहेत, पण त्यांचा आजार गंभीर रूप धारण करत नाहीये. पण कोरोना जसं रूप वेगाने रूप बदलतोय, तितक्याच वेगाने नवी लस आणणंही आवश्यक आहे. संशोधक आता खास ओमिक्रॉन व्हेरियंटवर लस बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.
तिसरा डोस प्रभावी ठरेल का?
आता भारतात हेल्थ वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरी म्हणजे बूस्टर लस सुरू झाली आहे. युकेच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने तिसऱ्या डोसनंतर रुग्णालयात दाखल व्हावं लागणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 81 टक्क्यांनी कमी झाल्याचं म्हटलंय.
तिसरा डोस नेमका किती प्रभावी ठरू शकतो असा प्रश्न आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी महाराष्ट्र प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारला. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला.
"आपण ज्याला बुस्टर डोस म्हणतोय तो आधीच्याच लशीचा तिसरा डोस आहे. तिसरा डोस आणि बुस्टर डोस यामध्ये मूलभूत फरक आहे. बुस्टर डोस हा आधीच्या डोसची ताकद वाढवणारा डोस असतो. सध्या मान्यता मिळालेला तिसरा डोस हा पुन्हा कोरोना अँटीबॉडीज् निर्माण करण्याचं काम नक्की करेल. पण, म्हणून तो ओमिक्रॉनविरोधात संरक्षण देईलच असं सांगता येत नाही. हा डोस घेऊनही संसर्गाची शक्यता राहीलच. पण, लसीकरण आणि अतिरिक्त डोसमुळेही एक गोष्ट होऊ शकेल. आजाराची तीव्रता आणि मृत्यूचं प्रमाण नक्की कमी होईल."
जगभरात काही देशांमध्ये लशीबद्दलच्या गैरसमजुतीही पाहायला मिळाल्या. त्यामुळे लस घेण्यासाठी लोक तयार नाहीएत. पण, शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं, तर सध्याच्या घडीला कोरोनापासून संरक्षण देणारी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे लस. आणि लस शंभर टक्के संरक्षण देत नसली तरी रुग्णालयात दाखल होण्याचा धोका नक्की टाळू शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)