ओमिक्रॉनच्या आकड्यांचा स्फोट, पण किती जणांचा आजार गंभीर?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनासंसर्गाची तिसरी लाट त्सुनामीच्या वेगाने पसरते आहे.

तज्ज्ञ सांगतात, ओमिक्रॅान तीव्र वेगाने पसरत असला तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांना अत्यंत सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनची गरज सद्यस्थितीत भासत नाहीये.

गेल्या सात दिवसात रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोव्हिड रुग्णांची संख्या पाच पटींनी वाढलीये. तिसऱ्या लाटेच्या आधी दिवसाला साधारणतः 20-25 रुग्ण दाखल होत होते. आता ही संख्या 100 पार पोहोचलीये.

कोरोनाचा स्फोट झाल्यामुळे मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1300 टक्क्यांनी वाढलीये.

मुंबईत कोरोनाची आकडेवारी काय सांगते?

मुंबईत कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरियंटची आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या ओमिक्रॉनने मुंबईत डेल्टाची जागा घेतलीये.

  • मुंबईत सोमवारी (3 जानेवारी) 8082 रुग्ण आढळून आले
  • त्यापैकी 7273 रुग्ण लक्षणं विरहित किंवा एसिम्टोमॅटिक
  • सोमवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण 573
  • यातील 71 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्याची गरज

24 डिसेंबरला 1536 दिवसांवर असलेला डबलिंग रेट 3 जानेवारीला 138 दिवस

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल बीबीसीशी बोलताना सांगतात, "मुंबईतील उपलब्ध ऑक्सिजन बेड्सपैकी 90 टक्के बेड्स रिकामे आहेत," मुंबईत रुग्णसंख्या वाढली असली तरी, 89 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणं आढळून आलेले नाहीत.

मुंबईत 24 डिसेंबरला 3227 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण होते. ही संख्या वाढून 2 जानेवारीला 29819 झालीये. तर, एकाच दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 26 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय.

इक्बाल चहल पुढे म्हणाले, "मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी डिसेंबर महिन्यात सात दिवस मुंबईत शून्य रुग्णांचा मृत्यू झालाय."

मुंबईत 20 डिसेंबरला असलेला टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट 0.68 टक्क्यांवरुन आता 13 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांचा आजार सौम्य का गंभीर?

मुंबईत कोरोनासाठी उपलब्ध 30 हजारपेक्षा जास्त बेड्सवर सद्य स्थितीत 3059 रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग सर्वप्रथम आढळून आला. या प्रवाशांना सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.

सेव्हन हिल्स रुग्णालयाचे डीन डॅा बालकृष्ण अडसूळ बीबीसीशी बोलताना म्हणाले, "रुग्णालयात दाखल ओमिक्रॅानबाधितांना अत्यंत सौम्य लक्षणं आहेत," सद्यस्थितीत कोणालाच गंभीर आजार नाहीये.

मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल होणार्यांची संख्या वाढलीये. डॉ. अडसूळ पुढे सांगतात, "गेल्या सहा-सात दिवसात संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याने रुग्ण वाढले आहेत."

सेव्हन हिल्स रुग्णालयात काही दिवसांपूर्वी 20 रुग्ण उपचारासाठी दाखल होत होते. आता दररोज 140 रुग्ण भरती होत आहेत.

"उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणं आहेत. सहव्याधी आणि जास्त वय असलेल्या फक्त 1-2 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते," डॉ. अडसूळ पुढे म्हणाले.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता मुंबई महापालिकेने जंबो रुग्णालयांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील नेस्को जंबो कोव्हिड सेंटरमध्ये गेल्या काही दिवसात दररोज 150 ते 160 रुग्ण दाखल होत आहेत. यांना काय लक्षणं आहेत? आम्ही रुग्णालयाच्या डीन डॅा निलम अंद्रादे यांच्याकडून जाणून घेतलं.

त्या सांगतात, "उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. वॉर्डमध्ये फक्त एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे."

नेस्को सेंटरच्या वॉर्डमध्ये 400 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. "ओमिक्रॉन सौम्य वाटतोय पण, डेल्टा व्हेरियंट अजूनही आहेच," डॉ. अंद्रादे सांगतात.

मुंबईत ओमिक्रॉनने डेल्टाची जागा घेतली आहे. जिमोन सिक्वेंसिंग नमुन्यात 55 टक्के ओमिक्रॅान तर 13 टक्के डेल्टा दिसून आलाय.

डेल्टा व्हेरियंट खूप जास्त जीवघेणा आहे. दुसऱ्या लाटेत डेल्टाने हाहाःकार पसरला होता.

डॅा अंद्रादे पुढे म्हणाल्या, "येणाऱ्या काही दिवसात आपल्याला पहावं लागेल की ICU मध्ये किती रुग्ण जातात आणि किती रुग्णांची स्थिती गंभीर होते."

रुग्णालयात दाखल रुग्ण 40 ते 60 या वयोगटातील आहेत.

बीकेसी जंबो कोव्हिड रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे. रुग्णालयाचे डीन डॉ. राजेश ढेरे म्हणाले, "गेले दोन दिवस 100 पेक्षा जास्त रुग्णांना दाखल करण्यात आलंय. बहुतांश रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणं आहेत." ऑक्सिजनची गरज असलेले 3-4 रूग्णच मध्यम स्वरुपाचा आजार घेऊन आलेत.

जंबो रुग्णालयांनी डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांची भरती पुन्हा सुरू केलीये.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत 328 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 36 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत. आरोग्य अधिकारी डॅा लक्ष्मण गोफणे म्हणाले, "ओमिक्रॅानबाधित रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणं आहेत."

राज्यात ओमिक्रॅानग्रस्त 510 पैकी 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

सहव्याधी असलेल्यांना आजार गंभीर होईल?

ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य दिसून येत असल्याने लोकांमध्ये याबाबतचं गांभीर्य कमी दिसून येतंय.

तज्ज्ञ सांगतात ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य दिसत असली तरी, सहव्याधी असलेल्यांना आणि वयस्कर लोकांना यामुळे गंभीर आजार होऊ शकतो.

नेस्को सेंटरच्या ICU मध्ये सद्य स्थितीत 14 रुग्ण उपचार घेत आहेत.

डीन डॉ. निलम अंद्रादे पुढे सांगतात, "सहव्याधी आणि वय जास्त असलेल्यांना बहुदा ICU ची गरज पडेल असं दिसतंय," पण नक्की काय होतं हे पहाण्यासाठी आपल्याला पुढील काही दिवस परिस्थिती पहावी लागेल.

जगभरात ओमिक्रॉनमुळे होणारा आजार सौम्य दिसत असला तरी, सहव्याधी असलेल्यांना गंभीर आजार होऊ शकतो असं दिसून आलंय.

महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, "ओमिक्रॉनमुळे होणारा आजार सौम्य दिसतोय, रुग्ण रिकव्हर होतायत," पण आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. काही ओमिक्रन रुग्ण गंभीर होतील. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल.

पिंपरी-चिंचवडमध्ये हृदयविकारचा झटका आलेल्या एका व्यक्तींचा मृत्यू झालाय. हा व्यक्ती ओमिक्रॉन पॅाझिटिव्ह होता.

"जगभरातील डेटा सांगतो की ज्या व्यक्तींना सहव्याधी आहेत. त्यांचा मृत्यू ओमिक्रॉनमुळे होण्याची शक्यता आहे," डॉ. जोशी पुढे म्हणाले.

लसीकरणामुळे गंभीर आजार होत नाहीये. आजार सौम्य दिसून येतोय. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल सांगतात, "ज्यांनी लस घेतलेली नाही किंवा सहव्याधी आहेत त्यांना धोका आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)