You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमिक्रॉन : कोरोना साथीच्या दोन वर्षांनंतरही अनुत्तरित असलेले 3 प्रश्न
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"आपल्याला जितक्या प्रश्नांची उत्तरे कळतात, तितकेच नवे प्रश्न आपल्यासमोर उभे राहत आहेत."
पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीच्या मायक्रोबायोलॉजी आणि मॉलिक्युलर जेनेटिक्स विषयाच्या प्राध्यापक डॉ. सीमा लकडावाला यांचं हे विधान आहे.
डॉ. सीमा आणि त्यांच्यासारखे इतर अनेक शास्त्रज्ञ 2019च्या डिसेंबर महिन्यापासून कोरोना व्हायरसशी संबंधित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
हा तपास सुरू केल्याच्या दोन वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसवरील लस तसंच त्यावरील औषधही शोधून काढलं आहे.
पण तज्ज्ञांच्या मते, अजूनही काही मूळ प्रश्न जसेच्या तसेच आहेत, ज्यांचं उत्तर मिळणं बाकी आहे.
कोरोना व्हायरसशी संबंधित या रहस्यांवरील पडदा हटला तर कोव्हिड-19 शी सामना करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळू शकतं.
सध्यातरी कोरोनाशी संबंधित या तीन प्रश्नांचं उत्तर मिळणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ते प्रश्न नेमके कोणते ते आपण पाहू.
1. कोरोना व्हायरसचा प्रसार कुठून सुरू झाला?
ब्रिटिश आरोग्य सुरक्षा संस्थेच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा प्रसार नेमका कुठून सुरू झाला, याची माहिती मिळणं अद्याप बाकी आहे.
2021 च्या फेब्रुवारी महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीसंबंधित माहिती मिळवण्यासाठी चीनचा दौरा केला होता.
या पथकाने म्हटलं की, हा व्हायरस वटवाघळामधून माणसांत आला असल्याची शक्यता आहे. पण यासंबंधित आणखी संशोधन करण्याची गरज आहे.
WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस एडनॉम घेब्रेयेसूस यांनी म्हटलं की, चीनकडून आकडेवारी उपलब्ध करण्यात तसंच पारदर्शकतेच्या अभावामुळे तपासावर त्याचा परिणाम झाला.
मात्र कोरोना व्हायरस हा कोणत्याही लॅबमधून मानवापर्यंत पोहोचला, अशी शक्यता नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासात पुढे आलं. तरी, या निष्कर्षापर्यंत पोहोचणं घाईचं होईल, असंही डॉ. टेड्रोस यांनी स्पष्ट केलं.
ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित झालेल्या एका विज्ञान मासिकात त्यांनी म्हटलं, "सबळ पुराव्यांअभावी ही प्रयोगशाळेत घडलेली घटना नाही, असं म्हटलं जाऊ शकत नाही."
याच महिन्यात WHO च्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने नव्या पॅथोजन्सच्या उत्पत्तीशी संबंधित शास्त्रज्ञांचं सल्लागार पथक (SAGO) गठीत केलं.
कोरोना व्हायरस वुहानच्या बाजारपेठेत प्राण्यांमधून माणसांत दाखल झाला की लॅबमधील एखाद्या घटनेमुळे असं झालं, याचा तपास हे पथक करणार आहे. या पथकाने 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात आपली पहिली बैठक घेतली होती.
डॉ. टेड्रोस म्हणाले, "SAGO सारखे पथक प्राण्यांमधून माणसांत व्हायरस पसरण्याच शक्यता कमी करण्यासाठी धोरण बनवण्यात मदत करू शकतात."
गेल्या वर्षी अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांनीही एक अहवाल दिला होता. कोरोना व्हायरस अखेर आला कुठून याची माहिती आपण शोधू शकलो नाही, असंच त्यांनी यामध्ये म्हटलं होतं.
कोरोनाचा वापर एक जैविक शस्त्र म्हणून करण्यात आला का, हेसुद्धा यामध्ये नाकारण्यात आलं आहे.
पण या अहवालात कोरोना व्हायरस पसरण्याचं कारण प्रयोगशाळा अथवा प्राण्यांमधून मानवामध्ये संसर्ग हे असू शकतं, असं म्हटलं गेलं.
पण तरीही आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, असंही या अहवालात स्पष्ट केलं आहे. चीननेही हा व्हायरस प्रयोगशाळेतून लीक झाल्याच्या शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत.
कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनोलॉजी विषयाचे प्रा. जॉन पी मूर यांनी 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात स्टेट न्यूज पोर्टलमध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये ते म्हणतात, "आपल्याला कदाचित कोव्हिड-19 च्या सुरुवातीबाबत कधीच कळू शकणार नाही."
मूर यांच्या मते, या प्रकरणात अनेक शक्यता समोर येत आहेत, ज्यांना आपण दुर्लक्षित करू शकतो. पण सध्यातरी या व्हायरसची उत्पत्ती लॅबमध्ये झाली की नैसर्गिकरित्या प्राण्यांमधून तो मानवात दाखल झाला, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेलं आहे."
2. नेमक्या किती व्हायरस पार्टिकल्सनी संसर्ग होतो?
कोणत्याही व्यक्तीला कोरोना अथवा इतर कोणत्याही व्हायरसचा संसर्ग होण्यासाठी एका ठराविक प्रमाणात त्या विषाणूच्या संपर्कात येणं गरजेचं असतं.
याला इन्फेक्शियस डोस किंवा संसर्गाचं प्रमाण असं म्हटलं जातं. सार्स-कोव्ह-2 च्या बाबतीत मात्र अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
एखाद्या व्यक्तीला याची लागण होण्यासाठी किती प्रमाणात विषाणूचा संपर्क येणं गरजेचं आहे, हे आपल्याला माहिती नाही. अमेरिकेतील CDC संस्थेच्या अहवालातही याबाबत स्पष्ट माहिती नाही.
प्राण्यांवर तसंच संसर्गजन्य आजारांच्या अभ्यासातून व्हायरस मिश्रित हवा श्वासावाटे आत घेतल्यामुळे विषाणू संसर्ग होतो, पण त्यामध्ये म्यूकस मेंब्रेन (उदा. डोळे) यांची किती भूमिका असते याबात स्पष्ट माहिती नाही.
डॉ. लकडावाला बीबीसी मुंडोशी बोलताना म्हणाल्या, "यासंदर्भात एक प्रयोगही करण्यात आला होता. पण त्यातूनही व्हायरस किती प्रमाणात आवश्यक आहे, हे कळू शकलं नाही."
इन्फ्लुएंझा पसरवणाऱ्या विषाणूंच्या बाबतीत एका व्यक्तीला संसर्ग होण्यासाठी दहा पार्टिकल आवश्यक असतात, तर मर्ससारख्या व्हायरसने बाधित होण्यासाठी त्याचा हजारो पार्टिकलशी संपर्कात येण्याची आवश्यकता असते. कोरोना व्हायरसच्या बाबतीत हे अजूनपर्यंत स्पष्ट कळालेलं नाही.
लकडावाला सांगतात, "याबाबत थोडीच माहिती उपलब्ध आहे. तीसुद्धा 229E व्हायरसमधून मिळाली आहे. हा कोरोनाचाच एक प्रकार आहे. यामुळे सर्दी होते. तर याची संसर्गक्षमता इन्फ्लुएंझासारखीच आहे. पण सार्स-कोव्ह-2 बाबत आताच सांगता येऊ शकणार नाही."
3. संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या किती अँटी-बॉडीजची आवश्यकता?
कोव्हिड-19 पासून एखादी व्यक्ती सुरक्षित आहे, असं म्हणण्यासाठी नेमक्या किती अँटी-बॉडी आवश्यक आहेत, याची माहितीही अजूनपर्यंत उपलब्ध नाही.
याला 'कोरिलेट ऑफ प्रोटेक्शन' उपायांच्या स्वरुपात ओळखलं जातं. मानवी शरीर एखाद्या व्हायरसविरोधात लढण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही, हे यातून कळू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला कोरोनापासून सुरक्षित घोषित करण्यासाठी त्याच्या शरिरातील अँटी-बॉडींची संख्या ही महत्त्वाची माहिती ठरू शकते.
न्यूयॉर्क येथील माऊंट सिनाई हॉस्पिटलच्या इकाहन स्कूल ऑफ मेडिसिन येथे फ्लोरियन क्रेमर मायक्रोबायोलॉजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
प्रा. क्रेमर यांनी जुलै 2021 च्या एका विज्ञान मासिकात म्हटलं होतं की सार्स-कोव्ह-2 विरोधात एका प्रोटेक्टिव्ह कोरिलेटची तातडीची आवश्यकता आहे. या लेखात त्यांनी याचं महत्त्वंही पटवून दिलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)