भीमा कोरेगाव : 'बाबांनी आमच्यासाठी एवढं केलं, त्यांच्यासाठी यायला नको का?'

- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, भीमा कोरेगावहून
"बाबांनी आमच्यासाठी एवढं केलं, आपण त्यांच्यासाठी यायला नको का ? म्हणून आलो आम्ही."
भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जालन्यावरून गाडी करून आलेल्या अंतिकाबाई गणकवर सांगत होत्या.
पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा इथल्या विजयस्तंभाला आंबेडकर अनुयायांनी गर्दी केली होती. दरवर्षी 1 जानेवारीला या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येत असतात.
2018 साली झालेल्या हिंसाचारानंतर ही संख्या अधिक वाढली. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनाला येण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. यंदा मात्र नियम घालून परवानगी देण्यात आल्याने राज्याच्या विविध भागातून लोक आले होते.
त्यांच्यातल्याच अंतिकाबाई या एक होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील इतर लोक होते. पांढरी साडी, डोक्यावर पदर आणि कपाळाला कुंकवाचा टिळा असा अंतिकाबाईंचा पेहराव. विजयस्तंभाला अभिवादन केल्यावर आंबेडकरांच्या कार्याची माहिती सांगणारं कॅलेंडर त्यांनी आवर्जून घेतलं.
"बाबांनी आमच्यासाठी एवढं केलं, त्यांच्यासाठी आम्ही इथं येतो. मागच्या वर्षी येता आलं नाही नाहीतर दरवर्षी येतो," अंतिकाबाई सांगत होत्या.
आता कोरोना परत वाढतोय तुम्हाला गर्दीत यायला भीती नाही का वाटत? असं जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "कोरोनाचं काही वाटत नाही. इथे येऊनच अभिवादन करायचं होतं म्हणून आलीय."
"आधीसारखा जातीयवाद आता राहिला नाही, तो कमी झालाय," असंही त्या पुढे म्हणाल्या.

त्यांच्याच गटासोबत लक्ष्मण पटेकर सुद्धा होते. साधारण 80 वर्षांच्या पटेकरांना ऐकू कमी येत होतं. स्वेटर आणि धोतर परिधान केलेले पटेकर, पुढच्या वर्षी अभिवादानाला येता येईल की नाही हा विचार करून अभिवादानाला आले होते. आता तब्येत साथ देतीय तर जाऊन येऊ, असा विचार करून साधरण 400 किलोमीटरचा प्रवास करून पटेकर आले होते.
पटेकर म्हणाले, "याच्या आधी इथे नव्हतो आलो. इथे एकदातरी यायचं होतं. पुढच्या वर्षी असू नसू म्हणून या वर्षी आलो. इथे आल्यावर आनंद वाटला."
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारकडून नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. भीमा-कोरगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येताना गर्दी करू नये, शक्यतो घरूनच अभिवादन करावे असं आवाहन करण्यात आलं होतं.
दरवर्षी असते तशी गर्दी नसली तर हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी भीमा कोरेगावला आले होते. पुण्याकडून पेरणेफाटा येथे वाहतूक थांबवण्यात आली होती. तिथून पुढे पीएमपीएमएल बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

तर अहमदनगरकडून शिक्रापूर येथे वाहतूक थांबवण्यात आली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त भीमा कोरेगाव भागात तैनात करण्यात आला होता. साधारण 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.
सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. 7.15 च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांसह अभिवादन केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवार म्हणाले, "कोरेगाव भीमाच्या शूरांना अभिवादन करतो. इथला इतिहास स्मरणात राहील, कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय."
कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलताना पवार म्हणाले, "कोरोना पुन्हा एकदा खूप वेगाने पसरत आहे.त्यामुळे काही नवीन नियम करण्यात आले आहेत. नागरिकांनी तारतम्य ठेवून वागावे. रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण काय आहे हे पाहून नियम केले जातील, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील. 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना बाधित आहेत."
राज्याला कोरोनामुक्त करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे देखील पवार म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








