भारतात दरवर्षी 20 हजारांपेक्षा जास्त गृहिणी आपलं आयुष्य का संपवतात?

महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज

दरवर्षी भारतातल्या हजारो गृहिणी आत्महत्या का करतात?

केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो - NCRBने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी एकूण 22, 372 गृहिणींनी जीव दिला. म्हणजे सरासरी रोज 61 आत्महत्या. दर 25 मिनिटांनी एक आत्महत्या.

2020 वर्षात भारतात एकूण 1 लाख 53 हजार 052 आत्महत्यांची नोंद झाली. यापैकी 14.6 टक्के आत्महत्या या गृहिणींच्या होत्या.

आत्महत्या करणाऱ्या किंवा स्वतःचा जीव देणाऱ्या एकून महिलांच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे.

पण हे फक्त 2020 वर्षात घडलं, असं नाही.

1997 पासून NCRB ने आत्महत्यांची नोंदणी करताना जीव देणाऱ्या व्यक्तीच्या पेशाचीही नोंद करायला सुरुवात केली. दरवर्षी 20 हजारांपेक्षा जास्त गृहिणी स्वतःचं आयुष्य संपवतात.

2009मध्ये हा आकडा 25,092 होता.

'कौटुंबिक समस्या' किंवा 'लग्नाशी संबंधित समस्या' हे या आत्महत्यांमागचं कारण असल्याचं म्हटलं जातं. पण हजारो महिलांनी जीव देण्यामागचं खरं कारण काय आहे?

कौटुंबिक हिंसाचार - डोमेस्टिक व्हायलन्स हे यामागचं मुख्य कारण असल्याचं मानसिक आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

सरकारने नुकत्याच केलेल्या एका पाहणीत सहभागी एकूण महिलांपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी आपल्याला जोडीदाराकडून करण्यात आलेला कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागल्याचं सांगितलं.

कपडे धुण्यासाठी नेणाऱ्या महिला

फोटो स्रोत, Getty Images

वाराणसीमधल्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. उषा वर्मा श्रीवास्तव सांगतात, "महिला खरंतर चिकाटीच्या असतात. पण सहनशक्तीलाही काही मर्यादा असतातच. बहुतेक मुली 18 वर्षांच्या - लग्नाच्या कायदेशीर वयाच्या झाल्या की त्यांचं लग्न लावून दिलं जातं. ती मुलगी एक बायको - सून होते. तिचा सगळा वेळ घर, जेवण, साफसफाई आणि घरातली इतर कामं करण्यात जातो. तिच्यावर संगळी बंधनं लादली जातात आणि स्वातंत्र्य फारसं उरत नाही. तिच्याकडे स्वतःचे असे पैसेही अनेकदा नसतात.

"तिचं शिक्षण किंवा आयुष्याविषयीची तिची स्वप्नं याला महत्त्वं दिलं जात नाही आणि मग तिच्या आकांक्षा हळूहळू मावळायला लागतात. निराशा मनात घर करते आणि मग फक्त जगत राहणं त्रासदायक वाटू लागतं."

पण वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांच्या आत्महत्यांची कारणं वेगळी असल्याचं डॉ. उषा वर्मा श्रीवास्तव म्हणतात.

"मुलं मोठी झाली, घराबाहेर पडली की अनेकजणींना 'एम्प्टी नेस्ट सिंड्रोम' त्रास देतो. अनेकजणींना मॅनोपॉजच्या सुमारास त्रास होतो. याला पेरी-मॅनोपॉजल सिम्प्टम्स म्हणतात. यामुळे डिप्रेशन, रडू येणं अशा गोष्टी होऊ शकतात."

पण असं असलं तरी आत्महत्या टाळणं शक्य असल्याचं त्या सांगतात. "तुम्ही जर कोणाला क्षणभरासाठी थांबवलं तरी ते असं करण्यापासून थांबण्याची शक्यता असते."

भारतीयांद्वारे करण्यात आलेल्या बहुतेक या इम्पलसिव्ह - त्या क्षणी घेतलेल्या निर्णयाच्या असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सौमित्र पाठारे सांगतात. "नवरा घरी येतो, बायकोला मारहाण करतो, ती स्वतःचा जीव देते."

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊनच्या काळात अनेक महिलांच्या वावरण्यावर, व्यक्त होण्यावर कायमची बंधनं आली.

स्वतःचं आयुष्य संपवणाऱ्या महिलांपैकी एक तृतीयांश जणींना घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागल्याचं स्वतंत्र्य अभ्यासातून समोर आल्याचं ते सांगतात. पण NCRBच्या डेटामध्ये डोमेस्टिक व्हायोलन्स वा घरगुती हिंसाचार या कारणाचा उल्लेखही नाही.

बंगळुरूमधल्या मानसोपचार तज्ज्ञ चैताली सिन्हा Wysa नावाचं मेंटल हेल्थ अॅप चालवतात. त्या म्हणतात, "घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागणाऱ्या ज्या महिलांना इतर मार्गांनी थोडाफार आधार मिळतो, त्या मनोधैर्य कायम ठेवू शकतात."

सिन्हा यांनी तीन वर्षं मुंबईतल्या सरकारी मानसोपचार रुग्णालयात काम केलंय. लोकल ट्रेनमधून प्रवास करताना तयार झालेले ग्रुप्स किंवा शेजाऱ्यांसोबतच भाजीला एकत्र जाताना तयार झालेला गट यामधून महिलांना काहीसं पाठबळ मिळत असल्याचं त्यांना आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचं काऊन्सेलिंग करताना जाणवलं.

"त्यांच्याकडे व्यक्त होण्यासाठी इतर कोणताच मार्ग नव्हता आणि अनेकदा फक्त एका व्यक्तीशी बोलता येण्यावरच त्यांची मनःशांती अवलंबून होती."

कोरोनाची जागतिक साथ आणि लॉकडॉनमुळे ही परिस्थिती आणखीन भीषण झाल्याचं त्या सांगतात. "पुरुष कामासाठी घराबाहेर पडले की गृहिणींना मोकळा श्वास घेता यायचा. पण लॉकडाऊनच्या काळात हे बंद झालं. ज्या घरात हिंसाचार घडत होता तिथे महिला त्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीसोबत अडकल्या. त्यांच्या वावरण्यावर आणखीन बंधनं आली. त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी करता येणं कठीण झालं. त्यांचा राग, दुःख, निराशा साचत गेली आणि आत्महत्या हा शेवटचा पर्याय ठरला."

जगभरात आत्महत्यांचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. जगभरात होणाऱ्या आत्महत्यांपैकी 25% भारतीय पुरुष आहेत. तर जगभरातील 15 ते 39 वयोगटाच्या आत्महत्यांमध्ये भारतीय महिलांचं प्रमाण 36% आहे.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

मानसिक आजार आणि आत्महत्या टाळण्याविषयी डॉ. पाठारे यांचा अभ्यास आहे. भारतातली अधिकृत आकडेवारी खरंतर प्रत्यक्षात प्रचंड मोठी असून या अधिकृत आकडेवारीवरून खऱ्या समस्येचं प्रमाण लक्षात येत नसल्याचं डॉ. पाठारे म्हणतात.

"तुम्ही जर मिलियन डेथ स्टडी (ज्यामध्ये 1998 ते 2004 या काळात 24 लाख घरांतल्या 1.4 कोटी लोकांवर लक्ष ठेवलं गेलं होतं.) पाहिलात किंवा लान्सेट संशोधन पाहिलंत तर भारतात होणाऱ्या आत्महत्यांची 30 ते 100 टक्के कमी नोंद होत असल्याचं लक्षात येईल."

"भारतात अजूनही आत्महत्यांविषयी खुलेपणाने चारचौघांत बोललं जात नाही. आत्महत्या एक प्रकारची लाज वा गालबोट समजली जाते आणि अनेक कुटुंब ही गोष्ट लपवण्याच्या प्रयत्न करतात. ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी पोस्टमार्टेम केलं जात नाही तर आत्महत्या हा अपघाती मृत्यू दाखवावा यासाठी श्रीमंत स्थानिक पोलिसांवर दबाव आणतात. आणि पोलीस करत असलेल्या नोंदी कोणी तपासत नाही."

भारतातलं आत्महत्या रोखण्यासाठीचं धोरण एकीकडे ठरवलं जात असताना योग्य प्रकारे आकडेवारी ठेवली जाईल याकडे लक्ष देण्याची गरज डॉ. पाठारे व्यक्त करतात.

"भारतातली आत्महत्येच्या प्रयत्नांची आकडेवारी पाहिलीत तर ती हास्यास्पदरित्या कमी आहे. जगात इतरत्र कुठेही ही आकडेवारी प्रत्यक्ष आत्महत्यांच्या 4 ते 20 पट आहे. म्हणजे गेल्या वर्षी समजा भारतात 1,50,000 आत्महत्यांची नोंद झाली, तर आत्महत्येच्या प्रयत्नांची आकडेवारी 6 लाख ते 60 लाखांदरम्यान असायला हवी."

आत्महत्या रोखण्यासाठीचे प्रयत्न करताना या गटाकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं असल्याचं डॉ. पाठारे म्हणतात. पण पुरेसा डेटा उपलब्ध नसल्याचे त्याचे होणारे परिणाम जगजाहीर असल्याचं ते सांगतात.

"2030 पर्यंत जगभरातल्या आत्महत्यांचं प्रमाण एक तृतीयांशाने कमी करण्याचं युनायटेड नेशन्सचं उद्दिष्टं आहे. पण गेल्या वर्षात आपल्याकडच्या आत्महत्यांचं प्रमाण त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेने 10 टक्क्यांनी वाढलंय. त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण कमी करण्याचं स्वप्न सध्यातरी दूरच दिसतंय."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)