You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाविकास आघाडीला धक्का, विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपनं कसा मिळवला विजय?
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून
नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
नागपूरमध्ये भाजपने विजय मिळवताना महाविकास आघाडीची जवळपास 40 मतं फोडल्याचं निकालावरुन दिसतंय.
या निवडणुकीत भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एकच मत मिळाले.
निकालांमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला दुहेरी धक्का दिला आहे. नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत भाजपने आपली मते फक्त राखलीच नाहीत, तर महाविकास आघाडीची 96 फोडली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे समजलं जात आहे.
यावेळी भाजपच्या विजयी उमेदवाराच्या जल्लोषात सामिल होण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला. "मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला, "असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केलेली मतांची आकडेवारी-
विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार निहाय झालेले मतदान,
चंद्रशेखर बावनकुळे-362, डॉ. रवींद्र भोयर- 01, मंगेश सुधाकर देशमुख-186.
एकूण वैध मते- 549, अवैध मते-05. एकूण मतदान- 554
निवडणुकीसाठी ठरलेला कोटा : 275
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले आहे.
अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदार संघातून 109 मतांनी भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले.
या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळविणारे गोपीकिसन बाजोरिया यांचा पराभव भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी केला.
या मतदारसंघात आतापर्यंत भाजपची भूमिका फक्त शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून होती. परंतु आज भाजपने आपला उमेदवार या मतदारसंघात विजयी करून या मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याच दिसतंय.
भारतीय जनता पार्टी चे वसंत खंडेलवाल यांना एकूण 443 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे गोपीकिसन बाजोरिया यांना 334 मते मिळाली 109 मतांनी वसंत खंडेलवाल यांनी अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदार संघावर विजय प्रस्थापित केला आहे.
यावेळी भाजपाचे उमेदवार विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल यांना निवडणूक निरीक्षक दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले
गेल्या विधानसभा निवडणूकीत तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदार संघातून भाजपने उमेदवारी नाकारली होती. गेल्या दोन वर्षांपासून बावनकुळे यांचे पुनर्वसन केले जाईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले होते.
या निवडणूकीतील यशामुळे बावनकुळे हे विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असल्याने फडणवीस यांनी त्यांचे तिकिट कापले अशी टिका विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळेस झाली होती. पण भाजपमध्ये कुठलाही गट नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं.
10 डिंसेबर रोजी विधान परिषद निवडणूक झाली ती भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भाजपने निवडणूकीत दगाफटका होऊ नये म्हणून मतदार असलेल्या नगरसेवकांना दहा दिवसाच्या सहलीला पाठविले होते.
बहुतांश नगरसेवकांना विमानाने नागपूरात आणण्यात आले. तर काहींना नव्या विमान प्रवासाच्या नियमावली मुळे बसने आणण्यात आले. नागपूर मध्ये दाखल झाल्यानंतर या सर्वांना पेंच व्याघ्र प्रकल्पातील एका रिसोर्ट मध्ये नेण्यात आले आहे.
10 डिसेंबर रोजी थेट मतदानालाच या नगरेसवकांना नागपूरात आणण्यात आले. नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेतील ह्या 334 मतदार नगरसेवक या सहलीला नेण्यात आले होते.
गेल्या विधान परिषद निवडणूकीत नागपूर पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणूकीत भाजपचे विशेष काळजी घेतली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)