You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MHADA Exam: उद्धव ठाकरे सरकार परीक्षा घेण्यात 'फेल' का ठरतंय?
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत.
याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला सोहम घोरपडे मुळचा यवतमाळ जिल्ह्याचा आहे. पण परीक्षांची तयारी करण्यासाठी तो सध्या पुण्यात राहतो.
म्हाडाची रविवारी (12 डिसेंबर) होणारी क्लस्टर-1 ची परीक्षा तो देणार होता. त्याचे परीक्षा केंद्र नागपूर येथे होते. पण परीक्षा ऐनवेळी रद्द झाली.
सोहम म्हणाला, "पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही सरकारी परीक्षांची तयारी सुरू करतो. माझ्यासारखे हजारो मुलं केवळ एकाच परीक्षेसाठी अभ्यास करत नाहीत तर विविध विभागाच्या भरतीसाठी तयारी करत असतात.
"म्हाडाची ही परीक्षा खरं तर नोव्हेंबरमध्ये होणार होती. ती त्यांनी ऐनवेळी पुढे ढकलली. त्यावेळी मी स्टेट सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षांचीही तयारी करत होतो. वारंवार परीक्षेच्या तारखा बदलल्याने इतर परीक्षांवरही त्याचा परिणाम होतो. आमचं नुकसान होतं."
तो पुढे म्हणाला, "परीक्षांमध्ये पारदर्शकता नसेल तर उमेदवारांचा व्यवस्थेवर विश्वास राहत नाही. म्हाडाकडून परीक्षेच्या दोन दिवस आधी काही उमेदवारांना परीक्षा केंद्र आणि सीटिंग अरेंजमेंट बदलल्याचं सांगण्यात आलं.
"कोव्हिड प्रोटोकॉलमुळे बदल केल्याचं कारण त्यांनी दिलं. पण कोव्हिड प्रोटोकॉल पाळायचा हे म्हाडा यंत्रणेला आधी लक्षात आलं नसेल का, त्यामुळे उमेदवारांमध्ये विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित होते," सोहम सांगतो.
परीक्षांमध्ये गोंधळ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलल्याचं जाहीर केलं.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर-फेसबुकवर रात्री 1.54 वाजता व्हीडिओ शेअर करत सांगितलं की, "सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून, काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा या जानेवारीत घेतल्या जातील. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत."
खरं तर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा सरकारी भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका काही तास आधी लीक झाली आणि परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. गेल्या वर्षभरात एमपीएससी, आरोग्य विभाग आणि आता म्हाडा अशा भरती प्रक्रियांमध्ये अशा घटना झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र संताप आहे.
राज्य सरकार परीक्षा घेण्यात अपयशी का ठरत आहे? सरकारी परीक्षा ऐनवेळी रद्द का करण्यात येतात? प्रश्नपत्रिका कशा लीक होतात? प्रशासकीय अनास्था याला जबाबदार आहे की सरकार या परीक्षांबाबत गंभीर नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित होतात.
वर्षभरात कोणकोणत्या परीक्षांचा गोंधळ?
रविवारी (12 डिसेंबर) म्हाडाची सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप-अभियंता आणि सहाय्यक विधी सल्लागार ही परीक्षा होणार होती.
या परीक्षेसाठी 50 हजार उमेदवारांनी अर्ज भरला होता तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होती. 56 हजार उमेदवार ही परीक्षा देणार होते.
परंतु रात्री उशीरा मंत्र्यांनीच परीक्षा पुढे ढकलण्या येत आहे असं जाहीर केलं. यामुळे परीक्षा केंद्रांजवळ पोहचलेल्या उमेदरांना मनस्ताप सहन करावा लागला.
परीक्षा केंद्र घरापासून लांब असल्याने किंवा परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पोहचावं लागत असल्याने एक दिवस आधीच उमेदवार घराबाहेर पडले होते. त्यामुळे परीक्षेच्या काही तास आधी वेळापत्रक बदलल्याने उमेदवारांच्या हाती निराशा आली.
यापूर्वी 14 मार्च 2021 रोजी एमपीएससीनं अशाच पद्धतीने परीक्षा पुढे ढकलण्याचं जाहीर केलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा मार्चमध्ये पुन्हा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या होत्या.
याविरोधात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोष पहायला मिळाला. पुण्यात मोठ्यासंख्येने उमेदवार रस्त्यावर उतरले आणि सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं.
याप्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला आणि परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करू असं त्यांनी सांगितलं.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये एकदा,दोनदा नव्हे तर अनेकदा संभ्रम निर्माण झाला. आरोग्य विभागाची प्रलंबित भरती परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली.
ग्रुप क आणि ड साठी ही परीक्षा होणार होती. परंतु परीक्षेच्या काही तास आधी आरोग्य विभागाने ही परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं.
राज्यभरातील उमेदवार यामुळे निराश झाले. सरकारी भरती प्रक्रियेला आगोदरच विलंब होत असताना ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने गोंधळ उडाला.
मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेले होते. त्यामुळे आरोग्य विभागावर टीका झाली. ही परीक्षा पुढे ढकलून 24 ऑक्टोबरला घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. 24 ऑक्टोबरलाही विविध परीक्षा केंद्रांमधून उमेदवारांच्या तक्रारी समोर आल्या.
या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार केली. बीबीसी मराठीशी बोलताना अनेक उमेदवारांनी प्रश्न आधीच लीक झाल्याचं सांगितलं. तर एका उमेदवाराने परीक्षेच्या काही वेळ आधी त्याला त्याच्या वॉट्सअपवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा केला.
काही उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली तर अनेक परीक्षा केंद्रांवर पेपर उशीरा पोहचल्याचं समोर आलं. अखेर आरोग्य विभागाला अशा उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षेची संधी द्यावी लागली.
प्रशासन आणि कंत्राटदारांचं साटंलोटं?
हजारो उमेदवारांची परीक्षा नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट दिलं जातं अशी सरकारची भूमिका आहे.
पण म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतो की, खासगी कंपनीला लाखो रुपयांचं कंत्राट देऊनही परीक्षा सुरळीत का पार पडत नाहीत? पेपर लीक होतात, ऐनवेळी परीक्षा रद्द होते, पेपर वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहचत नाहीत, उमेदवारांना चुकीचे पेपर दिल्याच्या तक्रारी होतात, एकाच उमेदवाराला अनेक प्रवेशपत्र दिल्याचं समोर येतं, अशी अनेक उदाहरणं आहेत.
म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्याच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने तपास करत असताना क्राइम ब्रांचच्या पथकाने औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे, पुणे परिसरातुन संशयितांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली.
पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "टार्गेट करियर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव यांनी पेपर फोडून औरंगाबाद येथील काही परीक्षार्थींना देण्याची योजना आखली होती. त्याचबरोबर पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडा च्या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थींना पेपर देण्याचे ठरवले होते."
"पोलिसांनी अजय चव्हाण, कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे 3 विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, कोरे चेक आणि आरोग्य विभागाच्या क आणि ड परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या मिळल्या.
"संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांचा मागोवा घेतला असता पोलिसांना त्यांच्या कारमध्ये म्हाडाची परीक्षा ज्या संस्थेच्या मार्फत घेण्यात येणार होती त्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख मिळून आले. देशमुख यांच्या लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या परीक्षेचे पेपर मिळाले. तसंच त्यांच्याकडे असलेल्या लिफाफ्यात पेन ड्राईव्ह आढळले. यात म्हाडा परीक्षेचे पेपर सेट मिळून आले आहेत," कृष्णा जाधव यांनी सांगितले.
यापूर्वीही आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळासाठी खासगी कंपनीवर टीका करण्यात आली होती. बीबीसी मराठीशी बोलताना आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांनी संबंधित कंपनीला नोटीस बजावल्याचं सांगितलं होतं.
म्हाडा परीक्षा पेपरफुटीप्रकरणी एमपीएससी समन्वय समितीच्या सदस्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याचं महेश घरबुडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, "सरकारी भरती परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आम्हाला संशय आहे. राज्यातील मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षेची तयारी करतात आणि ते आमच्या संपर्कात आहेत. आम्ही पोलिसांना आमच्याकडे जी माहिती होती ती दिली. पोलिसांनी तपास करून काही जणांना ताब्यात घेतलं."
"प्रशासन आणि कंत्राटदरांचं साटंलोटं असल्याचा संशय आम्हाला आहे. कारण वारंवार या घटना घडत आहेत. सरकारी परीक्षेसाठी खासगी कंपनीला कंत्राट देण्याला आमचा विरोध आहे.
"कारण या प्रक्रियेत गौडबंगाल असल्याची शंका आम्हाला सातत्याने येते. उमेदवारांकडून तशी माहिती मिळत असते. सरकार कंत्राट देताना कंपनीची पार्श्वभूमी तपासत नाही का? प्रशासकीय अधिकारी काय करतात? असेही प्रश्न मग यामुळे उपस्थित होतात. त्यामुळे सरकारी आस्थापनांकडूनही या परीक्षा व्हाव्या अशी आमची मागणी आहे," असं घुरबुडे सांगतात.
यासंदर्भात आम्ही काही माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही बोललो. माजी आयएएस अधिकारी महेश झगडे सांगतात, "आतापर्यंत महाराष्ट्रात सरकारी भरतीच्या परीक्षा प्रशासनाकडून घेतल्या जात होत्या.
"तंत्रज्ञान आपल्याकडे आलं पण त्याची मदत अंमलबजावणीसाठी व्हायला हवी. पण तसं होताना दिसत नाही. मग खासगी कंपन्यांकडे एवढ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी का द्यायची?
"केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) एकाच वेळी लाखो उमेदवारांच्या परीक्षा घेतं. त्या सुरळीत पार पडतात. आपणही आधी घेत होतो. प्रशासकीय अधिकारी, एमपीएससी आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून परीक्षा घेतल्या जात होत्या. रिक्रूटमेंट बोर्ड शासन ठरवायचं. पण हल्ली खासगी कंपन्यांना ही सर्व जबाबदारी दिली जाते," झगडे सांगतात.
"याला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे असं मला वाटतं. भरती प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांचे आहे. प्रशासकीय यंत्रणेत सुसूत्रता नाही म्हणून असे प्रकार घडतात. अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत किंवा मग त्यांची दुसरी काही कारणं असतील. पेपर लीक न होऊ देणं ही प्राथमिक जबाबदारी आहे. लीक झाला नाही तर पुढचे व्यवहार थांबतात," असं झगडे यांना वाटतं.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गेल्या 20 वर्षांत अशा लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. पण यासाठी आम्ही खासगी कंपनीला कधीही कंत्राट दिलं नाही असं बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मी डीएमईआरमध्ये असताना आम्ही सलग 20 वर्षं लाखो विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेत आलो आहोत. पण कधीही खासगी कंपनीला त्यासाठी कंत्राट दिलं नाही. आम्ही तज्ज्ञांची मदत जरूर घेतली.
शिनगारे सांगतात, "त्यासाठी आम्ही खासगी सल्लागार आणि इंजिनिअर नेमले. परंतु लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य आम्ही कधीही खासगी कंपनीच्या हातात दिलं नाही. या परीक्षा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांना करिअर घडवण्याची संधी देणाऱ्या असतात."
'मंत्री गंभीर नाहीत का?'
एमपीएससी परीक्षांच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्याने पुण्यात तीव्र आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना परीक्षा सुरळीत पार पडतील याचं आश्वासन दिलं होतं. आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबतीत मंत्री राजेश टोपे यांनीही उमेदवारांना अतिरिक्त वेळ देण्यात येईल असं सांगितलं.
म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. पण मुळात नियोजनबद्ध आणि सुरळीत परीक्षा घेण्यात सरकार अपयशी का ठरत आहे असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो.
कोरोना आरोग्य संकटात विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी यावरही मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारी नोकर भरती प्रक्रिया ही तरुणांसाठी महत्त्वाची बनते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी भरतीच्या परीक्षांची तयारी उमेदवार करत असतात.
परीक्षा देण्यासाठी त्यांना आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागतं. कारण ज्या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत त्यासाठी उमेदवारांनी अर्ज केलेला असतो. पण ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप तर सहन करावा लागतोच पण त्यांच्या हातात आलेली संधी गेली अशीही भावना त्यांच्या मनात येते असं उमेदवार सांगतात.
सरकारच्या परीक्षांच्या या गोंधळावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही सरकार परीक्षांना गांभीर्याने घेत नाहीये असा मतप्रवाह असल्याचं दिसून येतं. विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे.
विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, "सरकार सातत्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. आरोग्य सेवकांच्या बाबतीतही असंच झालं. सरकार गंभीर नाही. या परीक्षांच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा संशय येतो. सरकार परीक्षांच्या बाबतीत अपयशी ठरत आहे. भविष्यात मुलांच्या आयुष्याशी खेळ होणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी."
सरकारने उमेदवारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, "आरोग्य खात्यानंतर गृहनिर्माण विभागाने पेपरफुटीची महान परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
"मंत्र्यांना रात्रीत पेपर रद्द करावा लागला. विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड तर बसला शिवाय त्यांचा मानसिक छळ झाला आहे. गावावरून हजारो रुपये खर्च करून पुणे-मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना भरपाई मिळणार का?" असा सवाल चित्रा वाघ विचारतात.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
ते म्हणाले, "पेपर फुटण्यापूर्वीच पोलिसांनी टोळीला पकडलं आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर लगेच पेपर रद्द केला. पेपर फुटला नाही तर त्यापूर्वीच कारवाई करण्यात आली. गोपनीयतेचा भंग कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत."
उमेदवारांची परीक्षा फी माफ केली जाईल आणि पुढील परीक्षेसाठी त्यांच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही असंही आव्हाड म्हणाले.
यापुढे म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका तयार करणार असून पुढील परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)