आरोग्य विभागाच्या गट 'ड' बरोबर गट 'क' परीक्षेचाही पेपर फुटला?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी

आरोग्य विभागाच्या गट 'ड' परीक्षेचा पेपर मुंबईतील आरोग्य संचलनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच फुटल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणात आरोग्य विभागाचे सह संचालक महेश बोटले यांना बुधवारी (8 डिसेंबर) रात्री उशीरा अटक करण्यात आली.

काल 11 डिसेंबर 2021 रोजी नामदेव करांडे (वय 23 रा. बीड ) आणि उमेश मोहिते ( वय 24 रा. उमरगा, उस्मानाबद ) यांना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींकडे पोलीस चौकशी करत आहेत.

'गट क चा पेपरसुद्धा फुटला होता असं मुख्य आरोपीने पोलिसांच्या तपासात माहिती दिली असल्याचं' सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. त्या अनुषंगाने देखील आता पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. या पेपरफुटीमधील एजंट क्लासचालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच पेपर फोडणाऱ्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तपासातून आणखी दोन नाव समोर आली.

काय आहे प्रकरण?

आरोग्य विभागाच्या 'ड' गटाची परीक्षा 31 ऑक्टोबरला पार पडली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर फुटला असल्याचे समोर आले होते.

बीबीसी मराठीशी बोलताना काही परीक्षार्थिंनी सांगितलं होतं की, दुपारी 2 वाजता होणारा पेपर सकाळी 10च्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ही घटना समोर आल्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पेपर सुरू होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ड गटाचा पेपर पोहचला होता.

तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आत्तापर्यंत 11 जणांना अटक केली होती. बुधवारी रात्री महेश बोटले यांना मुंबईतून अटक करण्यात आली.

पेपर नेमका फुटला कसा?

महेश बोटले हे आरोग्य विभागामध्ये सहसंचालक या पदावर कार्यरत होते. जी समिती पेपर सेट करते त्या समितीमध्ये देखील बोटले हे सदस्य होते. त्यामुळे बोटले यांना पेपर काय आहे हे माहीत होतं.

19 सप्टेंबरला पेपर सेट झाला होता. सेट झालेल्या पेपरमध्ये प्रश्नांबरोबरच त्याची योग्य उत्तरे सुद्धा लिहीण्यात आली होती. ज्या कॉप्युटरवर पेपर सेट करुन ठेवण्यात आला होता, त्या कॉप्युटरचा अॅक्सेस बोटले यांच्याकडे होता. त्यांनी त्या कॉप्युटरवचा पेपर त्यांच्या स्वतःच्या कॉप्युटरवर कॉपी करुन ठेवला होता.

लातूरच्या आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बडगिरे यांचा देखील या रॅकेटमध्ये समावेश होता. बडगिरे यांना याआधीच पोलिसांनी अटक केली आहे. बडगिरेंनी दिलेल्या जबाबातून बोटले यांचे नाव समोर आले. बडगिरे यांनी 31 ऑक्टोबरच्या पूर्वी बोटले यांच्याकडे लातूरहून त्यांच्या चालकाला पाठवले. बोटले यांनी एका पेन ड्राईव्हमध्ये पेपर कॉपी करुन त्या ड्रायव्हरकडे दिला होता. पुढे तो पेन ड्राईव्ह बडगिरे यांना मिळाला.

बडगिरे यांनी ज्यांना हा पेपर दिला त्यांनी पुढे तो क्लासचालक आणि काही जणांकडून पैसे घेऊन त्यांना दिला. पोलिसांच्या चौकशीत आत्तापर्यंत बडगिरेंना 33 लाख रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी देखील पेपर घेतला होता.

पेपर फुटल्याचे लक्षात कसे आले?

ज्या व्यक्तीला पेपर द्यायचा आहे त्याला प्रिंट आऊट दिली जात नव्हती. 2 तास तो पेपर वाचायला दिला जात होता. त्या व्यक्तीने तो पेपर आणि उत्तरं वाचून पाठ करायची आणि पेपर परत करायचा अशा पद्धतीने हे रॅकेट सुरु होते.

डॉ. संदीप जोगदंड हे बीडमधील एक बालरोग तज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या नातेवाईकासाठी पेपर घेतला होता. त्याचबरोबर काम करणाऱ्या एकाला परीक्षेसाठी त्यांनी वाचायला दिला होता. पेपर वाचून परत देणे हा नियम होता. परंतु जोगदंड यांनी ज्याला पेपर वाचायला दिला होता, त्याने तो लिहून काढला. तेथूनच पुढे तो पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला.

पुणे सायबर सेलचे पोलीस निरिक्षक दगडू हाके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली.

हाके म्हणाले, ''मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांपासून फुटलेला पेपर राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला. यात मोठे रॅकेट कार्यरत होते. पुणे सायबर पोलिसांनी महेश बोटले आणि आणखी 11 जणांना आत्तापर्यंत अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून तपासणी करण्यात येत आहे.

''यात अनेक लोक गुंतले असल्याने प्रत्येकापर्यंत पोहचायला वेळ लागणार आहे. परंतु ज्या ठिकाणावरुन पेपर फुटला हे समोर आल्याने तपास वेगाने पुढे गेला आहे. सायबर पोलीस बोटले यांच्याकडे कसून तपासणी करत आहेत.''

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)