आरोग्य विभाग भरती परीक्षा : 'कोणत्या पदाची परीक्षा द्यायची हे उमेदवारानं ठरवावं', आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

24 आणि 31 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या क आणि ड गटाच्या परीक्षेसंदर्भात आणखी एक वाद यापूर्वी समोर आला होता.

पदांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा केंद्र आल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला. सोशल मीडियावरून अनेक परीक्षार्थींनी आपली अडचण मांडली होती.

काही विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या पेपरसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतलं परीक्षा केंद्र मिळालं आहे. तर काहींना त्यांनी प्राधान्य दिलेल्या ठिकाणापासून दूर असणारं केंद्र मिळालं. आरोग्य विभागानेही यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

फॉर्म भरताना आपण नागपूर केंद्र निवडलं होतं, पण असं असून सकाळच्या सत्रासाठी ठाणे आणि दुपारच्या सत्रासाठी वाशिम परीक्षा केंद्र हॉलतिकीटवर असल्याचं ट्वीट नितेश दादमल यांनी केलंय.

हीच तक्रार इतर काही विद्यार्थ्यांनीही केली आहे.

वेगवेगळ्या परीक्षा केंद्राच्या तक्रारींविषयी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं की, "आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारानं अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येते, त्याच विभागात उमेदवारास परीक्षा केंद्र दिले गेले आहे."

तर आरोग्य विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं की, "काही उमेदवारांनी 4 ते 5 पदांसाठी अर्ज केला आहे. अशावेळी उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे यापैकी 3 ते 4 पदांसाठी तेच शहर व 1 किंवा 2 पदांसाठी दुसरे शहर दिले गेले आहे."

शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये मिळालेली केंद्रे दूर अंतरावर आहेत, या तक्रारीवर स्पष्टीकरण देताना आरोग्य विभागानं म्हटलंय, "शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मधील अर्ज केलेल्या संवर्गाचे नेमणूक अधिकारी वेगळे असल्यास उमेदवारांना नेमणूक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रानुसार केंद्र दिलं आहे.

"उदाहरणार्थ, शिफ्ट 1 मध्ये नाशिक मंडळातील संवर्गासाठी अर्ज केला असल्यास उमेदवाराला नाशिक मंडळ मिळेल. आणि शिफ्ट 2 मध्ये अकोला मंडळातील संवर्गासाठी अर्ज केला असल्यास उमेदवाराला अकोला संवर्ग मिळेल. अशावेळी उमेदवारानं कोणत्या पदाची परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे."

24 आणि 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट क आणि डची परीक्षा होणार आहे. पण यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज भरल्याने त्यांना वेगवेगळी परीक्षा केंद्र आलेली आहे.

यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी आपलं परीक्षाकेंद्र आणि पिनकोड जुळत नसल्याचंही म्हटलंय.

परीक्षा केंद्र आणि पिनकोड न जुळण्याच्या तक्रारींवर विभागानं निवेदनात म्हटलंय, "काही प्रवेशपत्रांमध्ये पत्ता बरोबर आहे, पण पिन कोड चुकल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यात दुरुस्ती करून नवीन प्रवेशपत्र देण्यास मे. न्यास या संस्थेला सांगितलं आहे."

पण, दोन वेगवेगळ्या संवर्गासाठीच्या परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचा एक पेपर बुडण्याची भीती आहे.

अनेकांनी वैतागून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना टोमणे मारणारी ट्वीट्स केली आहेत.

यापूर्वी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबर रोजी नियोजित परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज परीक्षार्थींना 24 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मिळाले होते. आता पुन्हा एकदा या परीक्षेबद्दल गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

परीक्षेतल्या या गोंधळाबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करणारं ट्वीट केलंय.

"मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय. दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय. मुख्यमंत्री साहेब राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा," असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

सरकार वा आरोग्य विभागाकडून अद्याप या भरती परीक्षांबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. क संवर्गातली 2739 आणि ड संवर्गातील 3466 पदांसाठी या परीक्षा होणार आहेत.

राज्यातल्या 1500 केंद्रांवर या परीक्षा एकाचवेळी होणार असून रविवार असल्याने या दोन्ही दिवशी शाळा उपलब्ध असल्याने 24 आणि 31 ऑक्टोबरची निवड करण्यात आल्याचं नवीन तारखा जाहीर करताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)